विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेने नुकतेच भारत सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाशी सामंजस्य करार केला आहे. या माध्यमातून ‘व्हीएनआयटी’ पुढील तीन वष्रे शासकीय अधिकाऱ्यांना रस्ते सुरक्षेसाठी प्रशिक्षण देणार आहे. विशेष म्हणजे, यासाठी जागतिक बँक आणि आशियाई विकास बँक अर्थसहाय्य करणार आहे. या  करारामुळे ‘व्हीएनआयटी’च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

मध्य भारतातील अग्रगण्य संस्था असणारी ‘व्हीएनआयटी’ आता रस्ते सुरक्षेच्या कार्यातही मोठी मदत करणार आहे. यासाठी ‘व्हीएनआयटी’ने नागपूर शहरातील काही अपघात प्रवण स्थळ शोधून काढले आहेत. यातील अपघाताचा वर्षभराचा तपशीलही गोळा करण्यात आला आहे. यानुसार एकटय़ा राजीव गांधी चौकात वर्षांकाठी ९० अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ‘व्हीएनआयटी’ने येथील अपघात रोखण्यासाठी प्राथमिक स्तरावर काही उपाययोजना केल्या असता त्यात काही प्रमाणात यश आले आहे. शहराला अपघातमुक्त करण्यासाठी आता ‘व्हीएनआयटी’ने रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाशी सामंजस्य करार करून या कार्यात प्रामुख्याने सहभाग घेतला आहे. अपघातमुक्त अभियानासाठी जागतिक बँक दरवर्षी १४ हजार कोटींचा निधी खर्च करते. यात भारत सरकारच्या महामार्ग मंत्रालयाचाही वाटा असतो. ‘व्हीएनआयटी’ या उपक्रमामध्ये दरवर्षी ८० अधिकाऱ्यांच्या चमूला प्रशिक्षण देणार आहे. वर्षांतून अशा तीन चमूंना प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी ८० लाखांचा निधीही ‘व्हीएनआयटी’ला उपलब्ध होणार आहे. पंधरा दिवसांचे हे प्रशिक्षण राहणार आहे. ‘व्हीएनआयटी’मधील तज्ज्ञ प्राध्यापक यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. अपघातमुक्त रस्त्यांसाठी ‘व्हीएनआयटी’ने घेतलेल्या या पुढाकाराचे सर्वत्र कौतुक होत आहे.

नवउद्योजकांना आर्थिक सहाय्य

नवउद्योजकांना उद्योग सुरू करण्यासाठी  केंद्र सरकारच्यावतीने आर्थिक सहाय्य दिले जाणार असून  यात शैक्षणिक संस्थांना ‘इन्क्युबेशन सेंटर’ उघडण्यासाठी एक कोटीच्या मदतीचाही समावेश आहे. यासाठी ‘व्हीएनआयटी’ने लघु व मध्यम उद्योग विकास संस्था यांच्याशी करार करून नवीन केंद्र सुरू केले आहे. या केंद्राच्या माध्यमातून नवीन उद्योगांना उभारी दिली जाणार आहे. या केंद्राकडे विद्यार्थ्यांनी नवीन उद्योग सुरू करण्यासाठी अर्ज केल्यास त्याच्या उद्योगाची चाचपणी करून १५ लाखांची मदत केली जाणार आहे.