News Flash

स्कूल बसचे वर्षभराचे शुल्क भरण्याची ताकीद

राज्य शासनाने दुसऱ्या टप्प्यात इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याच्या सूचना दिल्या.

दंडाचा दणका पडल्यावरही शाळांची मुजोरी कायमच

नागपूर : महापालिका क्षेत्रातील शाळा ८ फेब्रुवारीपासून सुरू करण्याचे आदेश येताच खासगी शाळांनी पुन्हा पैसे उकळण्याचा प्रकार सुरू केला आहे. पाल्यांना शाळेत पाठवायचे असेल तर स्कूल बसचे वर्षभराचे पैसे पाठवा, अशी सक्त ताकीद पालकांना देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, अतिरिक्त शुल्क वसुलीसाठी दंड ठोठावल्यानंतरही शाळांची मुजोरी कायम आहे.

राज्य शासनाने दुसऱ्या टप्प्यात इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याच्या सूचना दिल्या. यानुसार २७ जानेवारीपासून जिल्ह्यातील शाळा सुरू झाल्या असून ८ फेब्रुवारीपासून नागपूर शहरातील शाळा सुरू होणार आहेत. त्यामुळे दहा महिन्यांपासून पालकांना शिक्षण शुल्कासाठी छळणाऱ्या खाजगी शाळांनी आता शाळा सुरू होण्याचे आदेश येताच इतर मार्गांनी वसुली सुरू केली आहे.

शहरातील प्रतिष्ठित अशा नारायणा शाळेने चक्क पालकांना पत्र पाठवत मुलांना शाळेच्या स्कूल बसने शाळेत पाठवायचे असेल तर पालकांनी वर्षभराचे शुल्क जमा करावे, अन्यथा स्वत: पालकांनी त्यांना सोडावे, अशा सूचना दिल्या आहेत. याशिवाय खाजगी वाहनाने येणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

त्यामुळे फेब्रुवारीत शाळा सुरू झाल्यावर व पुढचे केवळ दोन महिने शाळा सुरू राहणार असताना वर्षभराचे स्कूल बसचे पैसे कुठल्या  आधारावर मागितले जात आहेत, असा सवाल पालकांकडून होत आहे. नारायणासह इतर खासगी शाळांकडूनही अशाप्रकारे पत्र पाठवून पालकांना वेठीस धरले जात आहे. त्यामुळे पालकांमध्ये शाळांविरोधात प्रचंड रोष निर्माण झाला आहे.

दंडाचा धाक नाहीच

नारायणा शाळेने पालकांकडून शैक्षणिक शुल्काच्या नावावर अतिरिक्त शुल्क वसुली केल्याचा ठपका ठेवत शाळेवर १ कोटी ७६ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. याच धर्तीवर सांदिपनी शाळेवरही पाच कोटींची वसुली निघण्याबाबत अहवाल जमा करण्यात आला आहे. असे असतानाही खाजगी शाळांची मुजोरी कायम आहे.

अन्यथा, ऑनलाईन वर्गही बंद

करोनामुळे यंदा ऑनलाईन वर्ग सुरू आहेत. मात्र, सेंटर पॉईंट सीबीएसई शाळेकडून पाच दिवसांच्या आत पालकांनी शाळेचे शुल्क जमा न केल्यास ऑनलाईन वर्ग बंद केले जातील, अशी धमकीच देण्यात आली आहे. राष्ट्रीय पालक शिक्षक संघटनेने याचा निषेध करीत कारवाईची मागणी केली आहे. प्रकरण गंभीर असून वस्तुस्थिती तपासून कारवाई केली जाईल. – वैशाली जामदार, उपसंचालक, विभागीय शिक्षण.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2021 2:02 am

Web Title: warning to pay school bus year round fees akp 94
Next Stories
1 बंधारे बांधकामातील गैरव्यवहारात फौजदारी कारवाईला बगल
2 मी थकलोय, पण ‘कार्यकारिणी’च मला सोडत नाही!
3 हात पकडणे, पॅन्टची चेन उघडणे लैंगिक अत्याचार नाही!
Just Now!
X