१४ कोटी भरण्यात अपयशी ठरल्याने आत्मसमर्पण; आर्थिक फसवणूक प्रकरणातील आरोपी

जामिनीच्या अटीनुसार १४ कोटी रुपये भरण्यात अपयशी ठरल्याने वासनकर फसवणूक प्रकरणातील आरोपी व ताजश्री होंडाचा मालक अविनाश भुते यांनी गुरुवारी विशेष न्यायालयासमारे आत्मसमर्पण केले. विशेष न्यायाधीश मुनघाटे यांच्या आदेशानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची रवानगी कारागृहात केली.

भुतेने सप्टेंबर ते नोव्हेंबर २०१३ या दरम्यान मेसर्स वासनकर वेल्थ मॅनेजमेंटकडून कोटय़वधींचे कर्ज घेतले होते. त्यानंतर कंपनी डबघाईला आली. पोलिसांनी वासनकर वेल्थ मॅनेजमेंटचे संचालक प्रशांत वासनकर व इतरांविरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली. त्यानंतर पोलिसांनी चौकशी केली असता भुतेने वासनकरकडून घेतलेले कोटय़वधीचे कर्ज परत केले नाही. त्यानंतर पोलिसांनी अविनाश भुते याच्याकडे वासनकर कंपनीचे ९ कोटी ११ लाख ८५ हजार रुपये मूळ थकीत व व्याजासह साडेतेरा कोटी परत करण्याचे आदेश दिले होते. त्याने परत न केल्याने पोलिसांनी त्याच्या आस्थापनांवर छापे टाकले होते व भुतेला अटक केली होती. या अटकेनंतर भुतेने न्यायालयात जामीन अर्ज दाखल करून पैसे भरण्याची तयारी दर्शवली होती. सुरुवातीला दोन कोटी रुपये भरले आणि प्रत्येक महिन्याला दीड कोटी याप्रमाणे कर्जाची परतफेड करण्याचे हमीपत्र न्यायालयात सादर केले होते. त्या आधारावर न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला होता, परंतु जामिनावर सुटल्यानंतर त्याने पैसे भरण्यास असमर्थता दर्शवली. त्यानंतर त्याने विविध याचिका दाखल केल्या. उच्च न्यायालयाने त्याला दिलासा दिला होता. मात्र, पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिले.

सर्वोच्च न्यायालयाने भुतेला जामीन अर्जाच्या अटींची पूर्तता करण्यास सांगितले. त्यानंतर भुतेने पुन्हा विशेष न्यायालयात अर्ज करून रोख रकमेऐवजी संपत्ती तारण ठेवण्याचा अर्ज केला. मात्र, न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळत अटक वॉरंट जारी केला होता. त्यानंतर त्याने केवळ एक कोटी रुपये भरले. उर्वरित रक्कम भरण्यास असमर्थ असल्याने त्याने गुरुवारी विशेष न्यायालयासमोर आत्मसमर्पण केले. पोलिसांनी त्याला अटक केली व न्यायालयाच्या आदेशानंतर त्याची कारागृहात रवानगी केली. प्रकरणाचा तपास उपायुक्त श्वेता खेडकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय निंबाळकर करीत आहेत, तर न्यायालयात सरकारतर्फे अ‍ॅड. नितीन तेलगोटे व भुतेतर्फे अ‍ॅड. देवेंद्र चौहान यांनी काम पाहिले.