शेअर्स विकण्यासाठी भाग्यश्री वासनकर, राजेश व्यवहारे यांच्यात साटेलोटे?

कोटय़वधी रुपयांनी फसवणूक करणाऱ्या मेसर्स वासनकर वेल्थ मॅनेजमेंट कंपनीकडून गुंतवणूकदारांच्या डोळ्यात धूळफेक सुरूच आहे. कंपनीचा संचालक प्रशांत वासनकरची पत्नी भाग्यश्री वासनकर हिच्याकडून गुंतवणूकदारांच्या डोळ्यात धूळफेक सुरू असून तिने ७ हजार ५०० शेअर्स विक्रीसाठी काढले असून हे शेअर्स खरेदी करण्याची तयारी वासनकर कंपनीत गुंतवणूक करणाऱ्या राजेश व्यवहारे या व्यक्तीने दाखवली आहे. विशेष म्हणजे, डबघाईला निघालेल्या कंपनीचे शेअर्स खरेदी करून पुन्हा स्वत:चे नुकसान करून घेणाऱ्या व्यवहारांच्या भूमिकेवर प्रश्न निर्माण करण्यात येत असून वासनकर आणि व्यवहारे यांचे एकमेकांशी साटेलोटे असून कंपनी जिवंत ठेवण्यासाठी खटाटोप असल्याचा आरोप होत आहे.

दामदुपटीचे आमिष दाखवून मेसर्स वासनकर वेल्थ मॅनेजमेंट कंपनीने शेकडो लोकांना कोटय़वधींनी लुबाडले. या प्रकरणात मे-२०१४ मध्ये अंबाझरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेने केला. या प्रकरणात कंपनीचे संचालक प्रशांत जयदेव वासनकर, भाग्यश्री प्रशांत वासनकर, विनय जयदेव वासनकर, मिथिला विनय वासनकर, सरला जयदेव वासनकर, अभिजित जयंत चौधरी, कुमुद जयंत चौधरी, देवानंद बेनीशाम सातपुते, कुमार बाबुलाल लाखे, जयंत चौधरी, सारिका चंदेल, पायल बत्रा, मीनाक्षी कोव आणि इतर आरोपींविरुद्ध महाराष्ट्र गुंतवणूकदार हित संरक्षण कायदा आणि भादंविनुसार अनेक गुन्हे दाखल केले.

या प्रकरणात आरोपींना अटकही झाली. अनेकजण कारागृहात आहेत, तर भाग्यश्री वासनकर ही जामिनावर कारागृहाबाहेर आहे. कंपनी पूर्णपणे डबघाईला निघाली आहे. कंपनीचे सर्व व्यवहार ठप्प असून पोलिसांनी कंपनीची सर्व संपत्ती जप्त केली असून गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. अशात प्रशांत वासनकर याच्या संगनमताने भाग्यश्री वासनकर ही कंपनी जिवंत ठेवण्यासाठी धडपड करीत आहे. कंपनी जिवंत ठेवण्यासाठी तीन वर्षांत कंपनीच्या शेअर्सची खरेदी- विक्री दिसणे आवश्यक आहे. त्यामुळे भाग्यश्री वासनकरने उच्च न्यायालयात अर्ज करून ७ हजार ५०० शेअर्स विकण्याची परवानगी मागितली. मात्र, कंपनी डबघाईला आली असता कंपनीच्या शेअर्सचे मूल्य शून्य आहे. त्यानंतरही राजेश व्यवहारे या व्यक्तीने एक शेअर ३०० रुपये दराने संपूर्ण शेअर्स खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली. विशेष म्हणजे, व्यवहारे यांनीही कंपनीत गुंतवणूक केली होती. वासनकर कंपनीत त्यांचे पैसे बुडाले, परंतु त्यानंतरही कंपनीत पुन्हा गुंतवणूक करण्याची हिंमत त्यांनी दाखवली आहे. भाग्यश्री वासनकरचा शेअर्स विक्रीचा अर्ज आणि खरेदीदारही सापडल्याने उच्च न्यायालयाने शेअर्स विक्रीची परवानगी दिली. मात्र, वासनकरने शेअर्स विक्रीची परवानगी मागताच, खरेदीदार उपलब्ध होणे म्हणजे कंपनीच्या शेअर्सना किती मागणी असा प्रश्न पडतो. खुल्या बाजारात वासनकर कंपनीच्या शेअर्सना कवडीची किंमत नसताना तेच शेअर्स तीनशे रुपये मोजून खरेदी करणे, हा व्यवहार संशयास्पद आहे. या व्यवहारात नेमके काय दडले आहे, याचा शोध घेणे आवश्यक आहे, अशी मागणी होत आहे.

 

सर्व व्यवहार तपासणार

मेसर्स वासनकर वेल्थ मॅनेजमेंट कंपनीचे शेअर्स नोंदणीकृत नाहीत. बाजारात शेअर्सला शून्य मूल्य आहे. अशातही शेअर्सची खरेदी-विक्री होणे संशयास्पद आहे. या बाबीवर आर्थिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून तपास करण्यात येईल. गुंतवणूकदारांचा पैसा त्यांना परत मिळावा, यासाठी गुन्हे शाखेचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे भाग्यश्री वासनकर आणि राजेश व्यवहारे यांच्यातील व्यवहारांची चौकशी करण्यात येईल.

नीलेश राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त व तपास अधिकारी.