News Flash

‘चौकीदार’ म्हणून घेऊ नका तर समस्याही सोडवा

अत्यल्प वेतनात १२ तास काम खऱ्या चौकीदारांची व्यथा

(संग्रहित छायाचित्र)

अत्यल्प वेतनात १२ तास काम खऱ्या चौकीदारांची व्यथा

नागपूर : राजकारणासाठी का होईना आज चौकीदार चर्चेत आले आहेत. चौकीदार म्हणून घेताना त्यांच्या समस्यांची जाणीवही असू द्या तरच ‘मी चौकीदार’ या अभियानाला अर्थ, अशी प्रतिक्रिया खऱ्या चौकीदारांनी व्यक्त केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मी देशाचा चौकीदार असे विधान करताच भाजपने ‘मी चौकीदार’ असे अभियान सुरू केले आहे. त्यामुळे वेगवेगळ्या राज्याचे भाजपचे मुख्यमंत्री, केंद्रीय आणि भाजपचे पदाधिकारी ट्विटर स्वत:च्या नावासमोर चौकीदार लिहू लागले आहेत. या अभियानामुळे भाजपला किती राजकीय लाभ मिळेल, हे काळ ठरवेल. परंतु या निमित्ताने खऱ्या चौकीदाराचे प्रश्न ऐरणीवर आले आहेत.

शहरातील अशा चौकीदार (सिक्युरिटी गार्ड) काय अवस्था आहे. हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. शहरात बहुतांश सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय, खासगी आस्थापन, अधिकाऱ्यांचे बंगले, मल्टिप्लेक्स, शॉपिंग मॉल, रेल्वे विभागीय कार्यालय, बँका आदी ठिकाणी हे चौकीदार तैनात आहेत. या आस्थापनांनी सिक्युरिटी एजन्सीकडून सेवा घेतली आहे. शहरातील आणि शहराबाहेर अनेक सिक्युरिटी एजन्सीने चौकीदाराचा ठेका घेतला आहे. ही एजन्सी संबंधित आस्थापनाला चौकीदार पुरवत असते. हे चित्र शहरात सर्वत्र दिसून आले. गरीब, मजबूर चौकीदाराची नोकरीवर गदा येऊ नये म्हणून त्यांची ओळख पटणार नाही, परंतु त्यांच्या समस्या समोर याव्यात म्हणून लोकसत्ता त्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यातील काही चौकीदारांचे मनोगत देत आहे.

या चौकीदाराची आर्थिक स्थिती वाईट आहे. त्यांना सहा ते सात हजार रुपये प्रति महिना वेतन दिले जाते. त्यांना महिन्यात एकदाही सुटी नाही. दिवसाला १२ तास काम करावे लागते. त्यांचे पीएफ देखील जमा केले जात नाही. यासंदर्भात अंबाझरी येथील एका खासगी कंपनीच्या कार्यालयात तैनात ३९ वर्षी चौकीदार म्हणाले, मी तीन-चार वर्षे एमएमएस कंपनीत काम करीत होतो. या कंपनीला बँक एटीएमचे काम होते. मी तीन-चार वर्षे एटीएमसमोर चौकीदारी केली. तेथे मला सहा रुपये वेतन दिले जाते होते. १२ तास काम करवून घेतले जात होते. नोटबंदीनंतर एटीएमची संख्या कमी झाली आणि त्या कंपनीने काढून टाकले. त्यानंतर एका डॉक्टरकडे चौकदारी केली. तेथे दोन वर्षे काम केले. गेल्यावर्षी अंबाझरी येथील कार्यालयात काम करीत आहेत. येथील जुन्या चौकीदाराने काम सोडले. हे मला माहिती झाले. मी येथे आलो आणि मला नोकरी मिळाली. दर महिन्याच्या सात-आठ तारखेला कंपनीचा सुपरव्हायझर सात हजार रुपये देतो, असे ते म्हणाले. सिक्युरिटी एजन्सीचे नाव काय, मालक कोण, पीएफ जमा होते काय. याबद्दल काहीही माहिती नाही, असे या चौकीदाराने सांगितले.

उपजीविकेसाठी गाडय़ाही धुतो

‘‘सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत बारा तास डय़ुटी करतो,  मला महिन्याला पाच हजार रुपये मिळतात. त्यामुळे अधिकचे पैसे कमवण्यासाठी इमारतीमध्ये राहणाऱ्या लोकांची वाहने धुण्याचे काम करतो. यातून दोन हजार रुपये मिळतात.  पण, सरकार चौकीदार असेल तर त्यांनी चौकीदाराचे किमान वेतन निश्चित करावे, अशी प्रतिक्रिया गिट्टीखदान परिसरातील मंजीदाना कॉलनीत एका इमारतीचे चौकीदार असलेल्या शिवचरण उमरे यांनी दिली.’’

‘‘चौकीदार हे सर्वात जबाबदारीचे काम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत:ला चौकीदार म्हणणे हा आमचा सन्मानच असला तरी आमच्या समस्या त्यांनी समजून घ्याव्या.  कुटुंबाचा खर्च भागवण्यासाठी दिवस रात्र डय़ुटी करतो, पण त्याबदल्यात मोबदला अल्प म्हणजे आठ ते दहा हजार रुपये मिळते. त्यामुळे पंतप्रधानांच्या मनातील चौकीदार आम्ही असू शकत नाही. राहुल गांधींनी चौकीदाराला चोर म्हणून आमच्यावरच संशय व्यक्त केला आहे. ’’

      – जॉनी महाडिक 

‘‘सध्या केवळ ५ हजार रुपये मासिक वेतन मिळत असून त्यात कुटुंबाचा उदरनिर्वाह शक्य होत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चौकीदार शब्दावरून राजकारण करण्यास हरकत नाही, परंतु त्यापूर्वी सुरक्षा रक्षकांना किमान वेतन, त्यांच्या भविष्य निवार्ह निधीसाठीच्या रकमेची कपात, त्यांच्या कुटुंबीयांना नि:शुल्क आरोग्यसेवा देण्यासाठी सवलत देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करायला हवे.’’

– नारायण भोयर

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 21, 2019 1:53 am

Web Title: watchman expressed comments on bjp main bhi chowkidar campaign
Next Stories
1 लोकजागर : विद्यापीठीय धुळवड!
2 अल्पवयीन मुलीवर बलात्कार
3 पाच वर्षांनी पिता-पुत्राची गळाभेट!
Just Now!
X