हवामान अभ्यासकांचा इशारा
निसर्गाच्या प्रकोपाचे कारण प्रत्येकवेळी तापमान वाढ होऊ शकत नाही, तर विकासाच्या वेगात निसर्गाची केलेली हेळसांड हे निसर्गाच्या प्रकोपाचे कारण आहे. तामिळनाडूतील चेन्नई शहरात पावसाने घातलेला धुमाकूळ आणि त्यामुळे निर्माण झालेली भयावह पूरस्थिती भविष्यात इतरही राज्यांतील शहरांमध्ये उद्भवू शकते, असा धोक्याचा इशारा हवामान अभ्यासकांनी दिला आहे.
चेन्नईतील आताचा पाऊस आणि पूरस्थिती ही कमी दाबाच्या पट्टय़ामुळे असण्याची शक्यता कमीच आहे. मुळातच यापूर्वीही कमी दाबाचे पट्टे निर्माण झाले असताना इतका पाऊस पडल्याची फारशी उदाहरणे अस्तित्त्वात नाही. मुळातच नोव्हेंबरमध्ये चेन्नईमध्ये पाऊस पडून गेला आणि आता ही पावसाची दुसरी फेरी आहे. पाण्याचा निचरा करणारी व्यवस्था विकासाच्या वेगात दडपल्यामुळे चेन्नईला या भयावह परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. ही स्थिती इतर राज्यांतील शहरांमध्येसुद्धा उद्भवू शकते.
नागपूर शहर आणि आसपास ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पावसाने थमान घातले होते. रस्त्यांवरील वाहने पाण्यात बुडालेली होती, तर काही वाहने वाहूनही गेलीत. एवढेच नव्हे तर उड्डाणपुलावर दोन फूट पाणी साचल्याचा अनुभव नागपूरकरांनी घेतला आहे. त्यामुळे तापमान वाढीचा संबंध या पुरस्थितीशी जोडता येणार नाही. मुळातच पूरस्थितीमागे पाणी निचरा करणारी व्यवस्था नसणे, हे एक कारण आहे. महाराष्ट्रात ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात नाही, पण जून ते सप्टेंबरमध्ये कमी दाबाचे पट्टे बरेचदा तयार होतात. अशावेळी पाण्याचा निचारा करणारी व्यवस्था योग्य नसेल, तर चेन्नईसारखा सामना भविष्यात करावा लागू शकतो.
दक्षिण-पश्चिम आणि उत्तर-पूर्व असे दोन मान्सूनचे प्रकार भारतात आहेत. दक्षिण-पश्चिममध्ये जून ते सप्टेंबरदरम्यान दक्षिण भारत सोडला तर सर्वत्र पाऊस पडतो आणि उत्तर-पूर्वमध्ये ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान पाऊस पडतो. यात तामिळनाडू राज्यात वर्षांतून ४८ टक्के पाऊस याच काळात पडतो. उत्तर-पूर्वेदरम्यान पावसाची विविध रूपे पाहायला मिळतात. चेन्नईचा प्रकार हा त्याचाच एक भाग आहे. एलनिनोच्या काळातसुद्धा अशाप्रकारचा पाऊस पडला आहे. मात्र, प्रत्येकवेळी एलनिनोत अशी परिस्थिती उद्भवेल असेही शक्य नाही. त्यामुळे यात संशोधन होणे गरजेचे आहे, असे मत युवा हवामान अभ्यासक अक्षय देवरस यांनी नोंदवले.

दक्षिणेत पाऊस सुरू झाला तर सगळीकडे पावसाची स्थिती बदलते. विदर्भ व महाराष्ट्रात उत्तरेकडून थंड वारे येतात आणि तेव्हाच थंडी पडते. मात्र, कमी दाबाच्या पट्टय़ामुळे वाऱ्याची दिशा बदलते आणि त्याचा थंडीवर परिणाम होतो. त्यामुळे यंदा थंडी उशिराच पडेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.