15 October 2019

News Flash

शहराची दोन वर्षांची पाणी चिंता मिटली

पेंच नदीवरील तोतलाडोह प्रकल्पातून नागपूर शहराला तसेच जिल्ह्य़ातील सिंचन आणि वीजनिर्मिती प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो.

२०१३ नंतर प्रथमच तोतलाडोह भरले सिंचन, वीज प्रकल्पासाठीही पाण्याची सोय

तोतलाडोह सिंचन प्रकल्प २०१३ नंतर प्रथमच पूर्ण क्षमतेने १०१७ दलघमी म्हणजेच १०० टक्के भरल्याने नागपूरला पुढील दोन वर्षे पुरेल एवढा जलसाठा धरणात उपलब्ध झाला आहे. सोबतच १ लाख ४ हजार हेक्टरवरील सिंचनासाठी व वीज प्रकल्पासाठी पाणी उपलब्ध झाले आहे. दरम्यान,  प्रकल्पातून १०० दलघमी पाणी पेंच नदीत सोडण्यात आले आहे.

पेंच नदीवरील तोतलाडोह प्रकल्पातून नागपूर शहराला तसेच जिल्ह्य़ातील सिंचन आणि वीजनिर्मिती प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. हा प्रकल्प महाराष्ट्र व मध्यप्रदेश यांचा संयुक्त प्रकल्प आहे. मागील पाच वर्षांपासून पाऊस कमी येत असल्याने जलसाठय़ात तूट निर्माण होत होती. यातच मध्यप्रदेश सरकारने त्यांच्या हद्दीत पेंच नदीवर चौराई येथे प्रकल्प बांधल्यामुळे या प्रकल्पात येणारा प्रवाह खंडित झाला.

यंदा सुरुवातीला दोन महिने कमी पाऊस झाला. मात्र, सप्टेंबर महिन्यात पावसाने तूट भरून काढली. मध्यप्रदेशमध्येही जोरदार पाऊस झाल्याने चौराई धरण भरले. त्यातून पाणी सोडल्याने तोतलाडोह प्रकल्प प्रथमच पूर्ण क्षमतेने भरला. त्यामुळे यातूनही पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

तोतलाडोहमध्ये नागपूरसाठी १७० दलघमी पाणी राखीव आहे. याशिवाय प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रातील १ लाख ४ हजार हेक्टरवरील सिंचनासाठी ७०० दलघमी तसेच कोराडी व खापरखेडा वीज प्रकल्पासाठी ६० दलघमी पाणी आरक्षित आहे.

मागील वर्षी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात कमी पाऊस झाला तसेच चौराई प्रकल्पातून पाणी न सोडल्यामुळे नागपूर शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालाहोता. या प्रकल्पातील १५० दलघमी मृतसाठय़ातून ९० दलघमी पाण्याचा वापर पिण्याच्या पाण्यासाठी  करण्यात आला होता. त्यामुळे जलविद्युत निर्मितीसुद्धा थांबवण्यात आली होती.

First Published on September 21, 2019 1:29 am

Web Title: water concerns power plant akp 94