राज्यातील सर्व व्याघ्र प्रकल्पात जलसंधारणाची कामे हाती घेण्यात यावी व ती ३१ मे पर्यंत पूर्ण करावीत, असे आदेश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. आज, सोमवारी मंत्रालयात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली व्याघ्रसंवर्धन प्रतिष्ठान नियामक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती.
वाघाच्या जीवितासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींची पूर्तता वेळेत आणि वेगाने पूर्ण करावी अशा सूचना देऊन मुनगंटीवार म्हणाले, व्याघ्र प्रकल्पांसाठी उपलब्ध करून दिलेला निधी पूर्णत्वाने खर्च करावा. तसेच पेंच व्याघ्र प्रकल्पांप्रमाणे इतर व्याघ्र प्रकल्पात तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात यावी. सर्व व्याघ्र प्रकल्पात वन्यजीव व वनखात्याशी संबंधित माहिती देणारे चित्रपट दाखवण्याकरिता चित्रपटगृहाची निमिती करण्यात यावी. त्याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना, विद्यार्थ्यांना वन्यप्राण्यांची, वनसंवर्धनाची, वृक्ष लागवड व पर्यावरण रक्षणाची माहिती दिली जावी, असेही मुनगंटीवार म्हणाले.
पर्यटकांना सर्वच व्याघ्रप्रकल्पात उत्तम सुविधा उपलब्ध करून द्याव्या. तसेच त्या क्षेत्राचा एकात्मिक वनपर्यटन आराखडा तयार करण्यात यावा, व्याघ्रप्रकल्प क्षेत्रातील विकास कामांची माहिती स्थानिक लोकप्रतिनिधींना नियमितपणे देण्यात यावी. व्याघ्रप्रकल्पात राहणाऱ्या वन कर्मचाऱ्यांना राहण्याची उत्तम व्यवस्था आणि सुविधाही देण्यात यावी, व्याघ्र प्रकल्पात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शहरात एखादे वसतीगृह बांधता येईल का, याचाही अभ्यास केला जावा. मानव विकास निर्देशांकाअंतर्गत मिळणारा निधी आणि श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजनेतील निधी या सर्व निधींचा विनियोग करुन जलदगतीने विकास करता येणे शक्य आहे, असे ते म्हणाले.