सणासुदीच्या दिवसांत नागपूरकरांना दिलासा

मध्यप्रदेशातील चौराई धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आल्यानंतर तोतलाडोह धरणात पुरेसा जलसाठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे गेल्या दीड महिन्यापासून सुरू असलेली एक दिवसाआड पाणी कपात १५ सप्टेंबपर्यंत टळली आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या दिवसांत नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. शुक्रवारी  महापालिकेच्या जलप्रदाय विभागाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

शहराला पाणीपुरवठा करणारे तोतलाडोह जलाशय कोरडे पडल्याने महापालिकेने एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय १५ जुलैला घेतला होता. त्यानंतर टप्प्याटप्प्याने वाढ करत ३१ ऑगस्टपर्यंत पाणी कपात केली. दरम्यान, गेल्या आठवडय़ात मध्यप्रदेशात झालेल्या मुसळधार पावसामुळे पेंच नदीवरील चौराई धरण भरले. रविवारी त्याचे सहा दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे तोतलाडोह धरण शुक्रवापर्यंत ३३२ द.ल.घ.मी. म्हणजे ३२.७३ टक्के भरल्यामुळे महापालिकेच्या जलप्रदाय विभागाने पाणी कपात थांबवण्याचा निर्णय घेतला. गेल्यावर्षी याच दिवसात तोतलाडोह धरणात २४.९३ टक्के जलसाठा होता. गेल्यावर्षीच्या तुलनेत जलसाठा वाढल्यामुळे पाणी कपातीचा निर्णय १५ दिवस रद्द करण्यात आल्याची माहिती जलप्रदाय विभागाचे सभापती पिंटू झलके यांनी दिली. सध्या तोतलाडोहमध्ये ३३५ द.ल.घ.मी. आणि नवेगाव खैरीमध्ये ४१.६ द.ल.घ.मी. पाणीसाठा आहे. पाणी कपातीच्या काळात ७.५२ द.ल.घ.मी. पाण्याची बचत करण्यात आली.  १५ दिवसानंतर पुन्हा जलसाठय़ाची पाहणी करून त्यानंतर पुढील निर्णय घेणार असल्याचे झलके यांनी सांगितले.

जलसाठय़ाची स्थिती

नवेगाव खैरी   – २०१८ – ३८.५ टक्के

२०१९ – २८.९२ टक्के

तोतलाडोह  – २०१८ – २४.९३ टक्के

२०१९ – ३२.७३ टक्के