विरोधकांची घोषणाबाजी, माठ फोडले; ओसीडब्ल्यूचा करार रद्द करण्याची मागणी
ऐन उन्हाळ्यामध्ये शहरातील अनेक वस्त्यांमध्ये निर्माण झालेली पाणी टंचाई, पाण्याची वाढीव देयके आणि कर्मचाऱ्यांची मनमानी बघता शहरात पाणी पुरवठा करणाऱ्या ऑरेंज सिटी वॉटर वर्क्‍सचा करार रद्द करण्यात यावा, अशी मागणी करीत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभागृहात गोंधळ घातला. यावेळी सत्तापक्षाच्या विरोधात घोषणा देत सभागृहात महापौराच्या आसनासमोर माठफोडून विरोधकांनी निषेध केला. दरम्यान, पाण्यावरून घोषणा आणि गोंधळ सुरू असताना अन्य विषय मंजूर करून सभा तहकूब करण्यात आली.
महापालिकेची सर्वसाधारण सभा पाण्याच्या विषयावर गाजली. सभेला सुरुवात होताच ओसीडब्ल्यूचा करार रद्द करावा, अशी मागणी करीत विरोधकांनी माठासह सभागृहात प्रवेश करीत घोषणा देणे सुरू केले. पाण्यासाठी मोर्चे आणि आंदोलन कमी झाली असल्याचा दावा सत्तापक्ष आणि प्रशासन करीत असले तरी शहरातील अनेक वस्त्यांमध्ये पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे. टँकरची मागणी करून वस्तींमध्ये पोहचत नाही. शहरातील अनेक भागात कमी दाबाने पाणी पुरवठा केला जातो, असे आरोप विरोधी पक्ष नेते विकास ठाकरे यांनी केला. किशोर गजभिये यांनी ओसीडब्ल्यूचे कंत्राट रद्द करण्याची मागणी केली. वस्तीतील नागरिक नगरसेवकांच्या घरी येऊन आंदोलन करू लागले आहेत. ऑरेज सिटी वॉटर वर्क्‍सच्या कामात अनियमितता असून मोठय़ा प्रमाणात कंपनीने गैरव्यवहार केला आहे. अनेक नगरसेवकांवर पाण्यासाठी गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यानंतर प्रशासन काहीच कारवाई करीत नाही. त्यामुळे आता चर्चा पुरे, तत्काळ ओसीडब्ल्यूबरोबर केलेला करार रद्द करावा, अशी मागणी केली. महापौर प्रवीण दटके आणि सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी यांनी पाण्याच्या प्रश्नावर स्वतंत्र सभा घेऊन त्यावर चर्चा करण्याचे आश्वासन दिले. मात्र, विरोधक आपलीच मागणी पुढे रेटत होते. यावेळी सभागृहात काँग्रेसच्या सदस्यांनी महापौरांच्या आसनासमोर माठ फोडला. जोपर्यंत कंपनीचे कंत्राट रद्द करीत नाही तोपर्यंत सभागृहातील कामकाज होऊ देणार नाही, असा इशारा देत विरोधी पक्षातील सर्व सदस्य महापौरांच्या आसनासमोर आले आणि त्यांनी सत्तापक्षाच्या विरोधात घोषणा देणे सुरू केले. ओसीडब्ल्यूचे कंत्राट रद्द करा, अशा घोषणांनी सभागृह दणाणून गेले. विरोधकांचा हा सभागृहात गोंधळ सुरू असताना दोन वेळा सभा तहकूब करण्यात आली. मात्र, अखेर गोंधळात अन्य विषय मंजूर करून सभा अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आली.

शहरातील अनेक भागात पाण्याची समस्या आजही कायम आहे. ओसीडब्ल्यूवर कारवाई करण्याची मागणी यापूर्वी अनेकदा करण्यात आली आहे. सभागृहात चौकशीचे निर्देश देण्यात आले. मात्र, काहीच कारवाई केली जात नाही. सभागृहात स्टार बस, केबल डक्ट घोटाळ्याबाबत चौकशीचे आदेश दिले मात्र सत्तापक्ष आणि प्रशासन भ्रष्टाचार करणाऱ्यांना पाठीशी घालते. चर्चा करण्याची सूचना केली जाते मात्र चर्चेतून प्रश्न सुटत नाही तर कशाला चर्चा करायची? आयुक्त श्रवण हर्डीकर भ्रष्टाचार करणाऱ्यांना पाठीशी घालत आहे, पाण्याची वाढीव देयके पाठविली जातात, देयके भरली नाही तर उन्हाळ्यात पाणी बंद केले जात आहे ही मनमानी यापुढे सहन केली जाणार नाही. जोपर्यंत ओसीडब्लूचा करार रद्द करणार नाही तोपर्यंत सभागृह चालू देणार नाही.
-विकास ठाकरे, विरोधी पक्ष नेते

सभागृह सुरू झाल्यानंतर पाण्याच्या प्रश्नावर चर्चा करण्याची आमची तयारी होती आणि तशी सूचना केली. मात्र, विरोधी पक्षाचे नेते गोंधळ घालायचाच असे आधीच ठरवून आले होते. त्यांना सभागृहात चर्चा करायची नसल्यामुळे गोंधळ वाढत गेला. पाण्याच्याबाबतीत नागपुरात लातुरसारखी स्थिती नाही. ओसीडब्ल्यूच्या कामाबाबत फारसे समाधानी नाही. बरीच सुधारणा करण्याची गरज असून त्यांचे प्रयत्न सुरू आहे. पाण्याच्या संदर्भात दहा झोनमध्ये बैठकी घेतल्या जात आहेत. पाण्याच्या संदर्भात सर्व काही आलबेल आहे, असे नाही. ओसीडब्ल्यू ज्या ठिकाणी चुकीचे काम करीत असेल त्या ठिकाणी त्याच्यावर कारवाई केली जाते. कोणतेही प्रश्न गोंधळातून नाही तर चर्चेतून सुटतात. त्यामुळे विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सहकार्य करावे. राष्ट्रगीत सुरू असताना काही सदस्यांनी माठ फोडले हे दुर्दैवी असल्याचे सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
-प्रवीण दटके, महापौर