विद्यार्थ्यांनी बसावे कुठे

शहरातील अनेक महापालिका शाळांच्या इमारती जीर्ण झाल्यामुळे त्यातून पाणी गळण्याचे प्रकार सुरू झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या बसण्यासह त्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे महापालिका शाळांचा दर्जा वाढावा, यासाठी प्रशासनाने अनेक योजना जाहीर केल्या असल्या तरी शाळेच्या जीर्ण झालेल्या इमारतीची डागडूजी केली जात नसेल तर शिक्षणाचा दर्जा कसा वाढेल, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

महापालिकेच्या शाळेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा आणि शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी प्रयत्न केले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र गेल्या काही वर्षांत महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे. विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होण्याची कारणे अनेक असली तरी त्यात शाळेच्या इमारती आणि तेथील व्यवस्था हेही एक प्रमुख कारण आहे. गेल्या पाच-सहा दिवसांपासून शहरात पावसाची संततधार सुरू असताना शहरातील विविध भागात पाणी साचले. पूर्व, मध्य आणि दक्षिण नागपुरातील महापालिकेच्या शाळांच्या परिसरात आणि वर्गातही पाणी साचल्याने विद्यार्थ्यांनी बसावे कुठे, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. शहरातील विविध प्रभागात महापालिकेच्या शाळेच्या इमारती असताना ५५ शाळा पटसंख्या नसल्यामुळे बंद पडल्या असून त्यातील काही शाळा सामाजिक संस्थांना देण्यात आल्या आहेत. संबंधित संस्थांनी अशा शाळांच्या इमारतीची डागडूजी केली असली तरी प्रत्यक्षात मात्र ज्या इमारतींमध्ये शाळा सुरू आहे त्याची दुरुस्ती किंवा डागडूजी महापालिका प्रशासनाकडून केली नसल्याचे समोर आले आहे.

नागपुरातील भांडेवाडी, जागनाथ बुधवारी, टेका नाका, कळमना, वर्धमाननगर, नंदनवन, डिप्टी सिग्नल, मंगळवारी, पारडी, शिवणगाव, विश्वकर्मानगर, दत्तात्रयनगर, बिडीपेठ, मानेवाडा, बेझनबाग आणि इंदोरा भागातील महापालिकेच्या शाळेच्या इमारतीमधील वर्गामध्ये पाण्याची गळती होत असल्याचे समोर आले आले. प्रभाग क्रमांक ३९मधील महापालिकेची जुनी मंगळवारी भागातील मराठी प्राथमिक शाळेची इमारत शिकस्त झाल्यामुळे त्या ठिकाणी जीवितहानी होण्याची शक्यता बघता ती शाळा पाडण्यासाठी संबंधित नगरसेवकाने महापालिका प्रशासनाला प्रस्ताव दिल्यानंतर हा विषय येणाऱ्या सभेत आणला जाणार असून त्यानंतर ती इमारत पाडली जाणार आहे. शहरातील विविध प्रभागात अशा जीर्ण इमारत झालेल्या महापालिका शाळेची संख्या मोठय़ा प्रमाणात असताना त्याकडे महापालिका प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष आहे. गेल्यावर्षी दक्षिण नागपुरातील एका शाळेची भिंत पडल्याने त्यात एक विद्यार्थी दगावला होता. उत्तर नागपुरात सुद्धा शाळेची भिंत पडल्याने एक विद्यार्थी जखमी झाला होता मात्र, त्यानंतर महापालिका प्रशासनाने कुठलीच दखल घेतलेली दिसत नाही.

शाळांच्या इमारतीची दुरुस्ती किंवा डागडूजी करण्याची जबाबदारी ही संबंधित भागातील झोन अधिकाऱ्यांची आहे आणि त्यांना शाळा सुरू  होण्यापूर्वी तसे आदेश देण्यात आले होते, परंतु पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे महापालिका शाळांच्या इमारतीची तपासणी करण्यात येणार आहे. ज्या शाळेच्या इमारती जीर्ण झाल्या आहे आणि त्याची डागडूजी करण्याची गरज आहे अशा शाळांसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. शाळांमध्ये पाणी गळतीच्या तक्रारी आल्यास त्या संदर्भात तात्काळ दखल घेण्यात येईल.

– गोपाल बोहरे, शिक्षण सभापती, महापालिका