नियोजनाच्या अभावाचा नागरिकांना फटका

मार्च महिन्यापासून शहरात पाण्याची भीषण टंचाई निर्माण होईल, असे स्पष्ट चित्र दिसत होते. अशात तातडीने पाण्यासाठी उपाययोजना आणि योग्य नियोजन होणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही. परिणामी, आता नागपूरकरांना  पाणी कपातीला तोंड द्यावे लागत आहे. विशेष म्हणजे, शहरवासीयांची तहान भागवण्यासाठी राखीव असलेला गोरेवाडा तलावही कोरडा  पडला आहे.

शहराला नवेगांव खैरी आणि पेंच धरणातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. यंदा पाऊस कमी झाल्याने दोन्ही प्रमुख धरणे पूर्ण क्षमतेने भरली नाहीत. तसेच भूजल पातळीही कमालीची खालवल्याने कूपनलिकांनीही तळ गाठला. ही परिस्थिती मार्च महिन्यातच निर्माण झाली. त्यानंतर तीव्र उन्हाळामुळे धरणातील जलसाठा झपाटय़ाने कमी होत गेला. अशात मध्यप्रदेश सरकारने चौराई धरण बांधल्याने पेंच नदीवरून येणारे पाणी अडवण्यात आले. त्यामुळे सिंचनासोबतच पिण्याच्या पाण्याचे संकट वाढले. एप्रिलमध्ये पाण्याचा अभाव भासत असताना कोणतीच ठोस पावले उचलण्यात आली नाहीत. सर्व धरणे कोरडी पडण्याच्या मार्गावर असताना राज्य सरकारने पाण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक होते. मध्यप्रदेश सरकारकडे पाण्यासाठी बोलणी झाली होती. मात्र, कमी पावसामुळे चौराई धरणही पूर्ण क्षमतेने भरले नसल्याने मध्यप्रदेशने पाणीपुरवठा करण्यास नकार दिला. नवेगांव खैरी धरणाच्या पंिपग हाऊसमध्ये विजेची समस्या निर्माण झाल्याने शहराला पाणीपुरवठा करता आला नाही. शहराला दररोज ६४० दशलक्ष पाणीपुरवठा करण्यात अडचणी येत होत्या. अनेक ठिकाणी दिवसाआड पाणी मिळत होते. अशा स्थितीत गोरेवाडा तलावातील राखीव पाणी शहराला पुरवण्यात आले. मात्र, आता गोरेवाडा तलावही कोरडा पडला आहे. त्यामुळे शहरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ओसीडब्ल्यू आणि महापालिकेनेही कोणतीच विशेष काळजी घेतली नसल्याने पाण्याचे नियोजन झाले नाही. आता संपूर्ण मदार पावसावर अवलंबून आहे.

दूषित विहिरींकडेही दुर्लक्ष

शहरात ४५० सार्वजनिक विहिरी आहेत. या सर्व विहिरींमध्ये पाणी आहे. मात्र, त्या दूषित झाल्या आहेत. अशात महानगरपालिकेने संभाव्य पाण्याची टंचाई लक्षात घेता या दूषित विहिरी साफ करून त्यातील पाणी वापराबाबत जनजागृती करणे अपेक्षित होते. नागरिकांनी या विहिरीच्या पाण्याचा वापर इतर कामांसाठी केला असता तर मोठय़ा प्रमाणावर पाण्याच्या टंचाईवर मात करता आली असती. मात्र, महापालिकेने त्याकडेही दुर्लक्ष केले.