२४ बाय ७ योजनेवर नाराजी, कारवाईची मागणी

शहरातील विविध भागांमध्ये निर्माण झालेली पाणी टंचाई, दूषित पाणी आणि टँकर चालकांची मनमानी या  विषयांवर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत घमासान चर्चा झाली. सत्तापक्ष आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांनी जलप्रदाय विभाग आणि ऑरेंज सिटी वॉटर वर्क्‍सच्या कामावर नाराजी व्यक्त करून अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. मात्र टंचाई दूर करण्यासाठी कुठलीही ठोस घोषणा करण्यात आली नाही. केवळ कोरडय़ा चर्चेवर सदस्यांना समाधान मानावे लागले.

अपेक्षेप्रमाणे आज झालेल्या सभेत पाणी प्रश्न पेटला. विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात शहरातील विविध भागातील दूषित पाण्याचा प्रश्न मांडला. त्यानंतर सत्तापक्षाच्या सदस्यांनीही जलप्रदाय विभाग, ओसीडब्ल्यू, टॅकर चालकांची मनमानी या मुद्यांवर अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. काँग्रेसचे  प्रफुल गुडधे यांनी २४ बाय ७ योजनेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. शहरात ८१ हजार ८०६ लोकांना नियमित चोवीस तास पाणी पुरवठा केला जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितले होते.  ही संख्या नेमकी कुठल्या भागातील आहे ते स्पष्ट करावे, अशी मागणी केली. ट्रीपिंगच्या नावाखाली पाणी कपात केली जात आहे. कायम स्वरुपी उपाययोजना करण्यासाठी कुठलेच धोरण नाही. त्यामुळे ओसीडब्ल्यूचा करार रद्द करावा, अशी मागणी त्यांनी केली. सत्ता पक्षाकडून सतीश होले, प्रवीण भिसीकर, दिव्या धुरडे, भारती बुंदे, प्रकाश भोयर, जगदीश ग्वालबंशी, प्रगती पाटील, समिधा देशपांडे, श्रद्धा पाठक तर काँग्रेसकडून पुरुषोत्तम हजारे, भावना लोणारे, रमेश पुणेकर, बसपाकडून जितेंद्र घोडेस्वार, मो. जमाल, विनोद वाल्दे, आभा पांडे आदी सदस्यांनी पाण्याच्या टंचाई आणि दूषित पाण्याच्या प्रश्नावरून ओसीडब्ल्यू अधिकाऱ्यांना दोषी धरले.

वाठोडामध्ये चौवीस तास पाणी पुरवठा असल्याचे मनीषा कोठे यांनी सांगितले मात्र त्यावर वनवे यांनी आक्षेप घेतल्यामुळे आरोप प्रत्यारोप झाले. तानाजी वनवे आणि रमेश पुणेकर यांनी दूषित पाणी असलेल्या बाटल्या महापौर आणि आयुक्तांना दिल्या. दक्षिण, पश्चिम, पूर्व, दक्षिण आणि उत्तर नागपुरातील काही भागात पाणी समस्या अद्याप दूर झालेली नाही. नगरसेवकांनी मागणी केल्यावर टँकर वेळेवर पोहचत नाही. टँकरसाठी स्वतंत्र व्यवस्था असताना खासगी टँकरचालक मनमानी पद्धतीने वागतात. पैसे देऊन पाण्याचे टँकर दिले जात असल्याचा आरोप काँग्रेसच्या सदस्यांनी केला. जलकुंभात  मुबलक पाणी पुरवठा असताना शहरातील विविध भागात अपेक्षेपेक्षा टँकरची संख्या वाढली कशी? असा प्रश्न उपस्थित केला. जलवाहिन्या टाकलेल्या भागात गरज नसताना टँकरच्या फेऱ्या वाढल्या. त्यामुळे एवढे पाणी जाते कुठे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

भाजप नगरसेवकाची महापौरांवर टीका

शहरात पाण्याची टंचाई आणि दूषित पाण्याचा पुरवठा आहे. ओसीडब्ल्यू आणि जलप्रदाय विभागातील अधिकाऱ्यांवर  महापौरांचा वचक नाही, असा आरोप करत भाजपाचे नगरसेवक सतीश होले यांनी महापौर नंदा जिचकार यांना लक्ष्य केले. माजी महापौरांच्या प्रभागात भरपूर पाणी आणि माझ्या प्रभागात पाणी येत नसल्याचे सांगत होले यांनी दटके यांनी प्रभागातील पाणी पळविले, असे सांगितले.

विशेष सभा घेणार

पाणी प्रश्नावर अधिकारी गंभीर नाही. ओसीडब्ल्यूकडून काम करुन अधिकारी काम करून घेत नाही. त्यामुळे शहरातील पाणी टंचाई आणि दूषित पाणी पुरवठा होतो.  प्रत्येक झोनमध्ये येत्या आठ दिवसात पाण्याच्या विषयावर बैठक घेऊन माहिती घ्यावी आणि पाण्याच्या विषयावर विशेष सभा घ्यावी, अशी सूचना सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनी केली आणि महापौर नंदा जिचकार यांनी प्रशासनाला तसे आदेश दिले.