|| अविष्कार देशमुख

तब्बल ३७७ किमीच्या जलवाहिन्याचे काम रखडलेले 

उपराजधानीत तीस लाख जनतेसाठी मुबलक पाणी असल्याचा दावा नागपूर महापालिका आणि ओसीडब्ल्यूकडून केला जात असला तरी शहरातील तब्बल तीस टक्के भागात जलवाहिन्याच नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे  त्या भागातील नागरिकांना टँकरवरच तहान भागवावी लागत आहे. काही भागात जलवाहिन्या टाकून दहा वर्षे झाली तरी त्यातून पाणीपुरवठा होत नाही. वाठोडा, दिघोरी, हुडकेश्वर या सीमावर्ती भागासह अनेक प्रभागात नागरिकांना गेल्या पाच वर्षांपासून जलवाहिन्याची प्रतीक्षा आहे.

झपाटय़ाने विकसित होणारे शहर म्हणून अलीकडच्या काळात नागपूरची ओळख निर्माण झाली आहे. शहरात राबवण्यात येणाऱ्या चोवीस बाय सात पाणीपुरवठा योजनेचेही खूप कौतुक झाले, मात्र वास्तविक चित्र विदारक आहे. पालिकेच्या हद्दीतील १५ प्रभाग आणि शेकडो वस्त्यांमध्ये  अजूनही जलवाहिन्या टाकण्यात आल्या नाहीत. ऑरेंज सिटी वॉटर वर्क्‍स आणि पालिकेच्या संयुक्त उपक्रमाच्या माध्यमातून चोवीस बाय सात योजनेची अमंलबजावणी २०१२ साली करण्यात आली. पुढील पाच वर्षांत शहराच्या प्रत्येक भागाला सुरळीत पाणीपुरवठा होईल, असा दावा तेव्हा करण्यात आला होता. मात्र, तब्बल सहा वर्षे उलटूनही अनेक भागात जलवाहिन्या टाकण्यास मुहूर्त मिळाला नाही. शहराचा ३० टक्के भाग विना जलवाहिन्यांचा आहे. त्यामुळे शहरात मुबलक पाणी असतानाही दररोज विविध वस्त्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.  शहरालगतच्या भागात पाणीपुरवठय़ासाठी केंद्र सरकारने अमृत पाणीपुरवठा योजना आणली. मात्र, त्या योजनेला कंत्राटदार मिळत नाही. धिम्या गतीने निर्णय घेणाऱ्या प्रशासनाचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे. शहरात ३७७ किलोमीटर जलवाहिनीचे काम रखडले आहे. सर्व वस्त्यांना सुरळीत पाणीपुरवठय़ासाठी ४३ जलकुंभांची गरज आहे.

अमृत योजना रखडली

२७३ कोटींच्या अमृत पाणीपुरवठा योजनेची २०१६ मध्ये घोषणा झाली. महापालिकेने आतापर्यंत सहा वेळा निविदा काढल्या. मात्र, अधिक किंमतीच्या निविदा आल्याने त्या मंजूर करण्यात आल्या नाही.

जलवाहिनी गायब

प्रभाग क्रमांक २६ वाठोडामध्ये २००८ साली जलवाहिन्यांची कामे झाली. पुढील दोन वर्षांत प्रत्येक घराला पाणीपुरवठा केला जाईल, असा दवा त्यावेळी करण्यात आला. त्यासाठी प्रत्येक प्लॉटनुसार दहा ते पंधरा हजार रुपयांचा विकास निधी घेण्यात आला. मात्र, काम पूर्ण न झाल्याने जलवाहिन्या चोरीस गेल्या.  त्यामुळे कामाक्षी लेआऊट परिसरात जवळपास दीड  हजार घरांना दररोज टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. विशेष म्हणजे, या परिसरात टँकर श्रीरामनगरच्या नावाने जात आहे. या भागात दररोज चाळीस टँकरची मागणी आहे.

या भागात जलवाहिन्या नाहीत

वाठोडा, दाभा, हुडकेश्वर,भरतवाडा, नरसाळा, जयतळा, टेका नाका, गोरेवाडा, झिंगाबाई टाकळी, इंदोरा, पारडी, दिघोरी, पिपळा, पारडी, लष्करीबाग.

शहरालगतच्या पाणीपुरवठा होत नसलेल्या भागासाठी केंद्र सरकार पुरस्कृत अमृत योजनेचा आराखडा तयार झालेला आहे. याचे सर्व काम भारत सरकारची नोडल एजंसी वाप्कोस लिमिटेडकडे देण्यात आले आहे. पुढील पंधरा दिवसात निविदा काढण्याची प्रक्रिया पूर्ण होईल आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाईल.     – पी.एस. राजगिरी, कार्यकारी अभियंता (प्रकल्प) जलप्रदाय विभाग, मनपा नागपूर

अमृत योजनेचा तपशील

  • प्रशासकीय मान्यता – २७३.७८ कोटी
  • केंद्र शासन अनुदान – ३३.३३% – ९१.२५ कोटी
  • राज्य शासन अनुदान – १६.६७% – ४५.६४ कोटी
  • स्वराज्य संस्थेचा सहभाग ५०% – १३६.८९ कोटी
  • योजनेअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या टाक्या – ४३.
  • मुख्य फिडर जलवाहिनी – ५८.७१९ किमी.
  • वितरण व्यवस्था जलवाहिनी – ३७७.८३ किमी.