News Flash

पावसाळा पूर्व नियोजन का फोल ठरले?

डांबरी रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे निर्देश महापौरांनी दिले होते.

 

मुद्दा ऐरणीवर; पावसाळ्यात समस्या अधिक वाढणार

मंगळवारी झालेल्या पहिल्याच पावसाने शहराची दाणादाण उडाल्यानंतर पुढील पावसाळी दिवसात उद्भवणाऱ्या समस्यांवर महापालिका कोणता मार्ग काढणार, हा मुद्दा आता ऐरणीवर आला आहे.

दरवर्षी पावसाळ्यात निर्माण होणारी पूरपरिस्थिती बघता पावसाळीपूर्व नियोजन करण्यासाठी महापालिका प्रशासनाने दोन महिन्यापूर्वी शहरात नागनदीसह पिवळी आणि पोरा नदीच्या स्वच्छतेवर भर दिला आणि नाला सफाई अभियान राबविले. शहरातील चेम्बर साफ करण्यात आले. पाण्याचा निचरा होण्यासाठी नाल्या सफाईचे अभियान हाती घेतले आणि पावसाळापूर्व नियोजनाचे ८० टक्के काम झाल्याचा दावा प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांकडून केला गेला. तो किती फोल होता हे मंगळवारी झालेल्या दोन तासाच्या पावसाने सिद्ध केले.

ज्या भागात ही कामे झाल्याचा दावा केला गेला त्याच ठिकाणी पाणी साचले होते. डांबरी रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे निर्देश महापौरांनी दिले होते. मात्र त्याचे पालन झाले नाही. पावसाने डांबरी रस्ते उखडले तर काही ठिकाणी खड्डय़ात पाणी साचले होते. गटारी साफ केल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात पूर्व आणि दक्षिण नागपुरातील अनेक वस्त्यांमध्ये गटारी भरून वाहत होत्या व त्यातील घाण पाणी रस्त्यावर आले होते.

सिमेंट रस्त्याची कामे अर्धवट स्थितीत आहेत. वर्धमाननगरात टेलिफोन एक्सचेंज चौक परिसरातील रस्ते तयार केले असले तरी रस्त्याच्या आजूबाजूला मात्र काम अपूर्ण आहे. महापाालिकेने कंत्राटदाराला सांगूनही त्याने काहीच केले नाही.

परिणामी, लोकांच्या घरात पाणी शिरले.  उत्तर नागपुरातील पिवळी नदी परिसरात गेल्या महिन्यात डांबरी रस्ता तयार करण्यात आला होता, परंतु हा रस्ता उखडला होता. नागनदीसह पिवळी आणि पोरा नदीच्या परिसरात अतिक्रमण करून बांधलेल्या घरांचा सफाया करण्याच्या मोहिमेला वेग आणण्याचा कितीही प्रयत्न प्रशासनाने केला तरी राजकीय नेत्यांच्या वरदहस्तामुळे त्यांची अतिक्रमणे वर्षांनुवर्षे कायम आहेत. बेसा-मानेवाडा मार्गावरील नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाला लागून असलेल्या नाल्यावर अनेक लोकांनी अतिक्रमण करून घरे बांधली असून नाला बुजविण्यात आला आहे. त्यामुळे नाल्यात जाणारे पाणी पुलाजवळ अडल्यामुळे पुलाच्या बाजूचा भाग पाण्यात वाहून गेला. नागनदीला लागून असलेली राहतेकर वाडीजवळील भिंत जीर्ण झाली असून ती दुरुस्त करण्याबाबत अनेकदा महापालिका प्रशासनाला सांगण्यात आले होते. मात्र ते काम केले नाही आणि मंगळवारी झालेल्या पावसामुळे ती भिंत पडली.

आयुक्तांकडून आढावा

मंगळवारी शहरात पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती बघता महापालिका आयुक्त अश्विन मुदगल यांनी तात्काळ बुधवारी सकाळी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन अधिकाऱ्यांना धारेवर धरत शहरात सर्व आपात्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यास सांगितले. अति. उपायुक्त यांच्याकडे शहरातील विविध झोनचा आढावा घेण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2017 2:52 am

Web Title: waterlogging in nagpur nagpur municipal corporation
Next Stories
1 पावसामुळे दाणादाण, सर्वत्र पाणीच पाणी!
2 शाळेचा पहिला दिवस पावसात
3 बेसा मार्गावरील नवीन पूल वाहून गेला
Just Now!
X