11 August 2020

News Flash

भाजपविरोधी लाट कायम

१२ वर्षांनंतर जिल्हा परिषदेवरील भाजपची सत्ता जाऊन आघाडीची सत्ता आली.

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला घवघवीत यश

चंद्रशेखर बोबडे, लोकसत्ता

नागपूर: जिल्ह्य़ात विधानसभा निवडणूककाळात निर्माण झालेली भाजपविरोधी लाट जिल्हा परिषदेच्या वेळी कायम असणे, संपूर्ण जिल्ह्य़ाची निवडणुकीची जबाबदारी एकाही प्रमुख नेत्याने न स्वीकारणे आणि पक्षाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर झालेल्या अन्यायाची धग कायम असणे याचा नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपला जोरदार फटका बसला. मुदत संपल्यावरही भाजपने दोन वर्षांपर्यंत निवडणूक लांबवल्याने निर्माण झालेली नाराजीही पक्षाला भोवली. दुसरीकडे शेतकरी कर्जमाफी, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने एकजुटीने केलेले प्रयत्न, ऐन निवडणुकीच्या दोन दिवस आधी आघाडीच्या दोन नेत्यांना मिळालेली मंत्रिपदे आणि त्यातून कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेला उत्साह याचा फायदा काँग्रेस-राष्ट्रवादीला या निवडणुकीत घवघवीत यश संपादित करताना झाला.

ही निवडणूक नागपूर जिल्ह्य़ापुरती मर्यादित असली तरी त्यांच्या निकालाचे पडसाद भाजप नेते गडकरी, फडणवीस हे नागपूरचे असल्याने संपूर्ण राज्यात उमटणार होते. त्यामुळे सर्वाचे लक्ष या निवडणुकीकडे होते. भाजप विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी अशी चुरशीची लढत येथे झाली. भाजपकडून गडकरी, फडणवीस यांनी, तर आघाडीकडून मंत्रीद्वय सुनील केदार आणि अनिल देशमुख यांनी किल्ला लढवला. या राजकीय युद्धात भाजपचे पानिपत तर आघाडीचा दणदणीत विजय झाला. १२ वर्षांनंतर जिल्हा परिषदेवरील भाजपची सत्ता जाऊन आघाडीची सत्ता आली.

५८ सदस्यीय जिल्हा परिषदेत काँग्रेसने ३१ जागा जिंकून बहुमत मिळवले. मागच्या वेळी त्यांच्या १४ जागा होत्या, त्यात दुपटीपेक्षा अधिक वाढ झाली.

राष्ट्रवादीला १० आणि मित्रपक्षाला एक जागा मिळाली. आघाडीच्या सदस्यांची एकूण संख्या ४२ होते. दुसरीकडे भाजपला केवळ १५ जागांवर समाधान मानावे लागले. मागच्या निवडणुकीत त्यांनी २४ जागा जिंकल्या होत्या. राज्याच्या उपराजधानीच्या जिल्ह्य़ात शिवसेनेला एकच जागा जिंकता आली.

जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता २००७ पासून आहे.

२०१४ मध्ये राज्यात भाजपची सत्ता आली. २०१७ मध्ये जिल्हा परिषदेची मुदत संपत आली असतानाच काही गावांना नगर पंचायती आणि नगरपालिकांचा दर्जा देण्याच्या निमित्ताने भाजपने या निवडणुका दोन वर्षे लांबवल्या. यामुळे ग्रामीण भागात भाजप मतदारांचा हक्क नाकारत असल्याची भावना निर्माण झाली होती. मात्र २०१४ ते २०१९ या काळात झालेल्या सर्वच निवडणुका भाजपने राज्यातील सत्तेच्या आधारावर जिंकल्याने ही नाराजी पक्षापर्यंत पोहोचलीच नाही. लोकसभा निवडणुकीतही जिल्ह्य़ातील दोन्ही लोकसभेच्या जागा युतीने मताधिक्याने जिंकल्या. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपचा दणदणीत पराभव झाला. सहापैकी दोनच जागा पक्षाला जिंकता आल्या.

जिल्ह्य़ात निवडणुकीची जबाबदारी स्वीकारून यंत्रणा राबवणारी यंत्रणा असावी लागते. सत्ता असताना बावनकुळे ती राबवत असत. या निवडणुकीत गडकरी, फडणवीस यांनी सभा घेतल्या; पण त्यानंतरची जबाबदारी एकाही नेत्याने न घेतल्याने भाजपचे पानिपत झाले.

विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला मिळालेल्या यशामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह होता. त्यातच मतदानाच्या दोन दिवस आधी जिल्ह्य़ातील काँग्रेस नेते सुनील केदार आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याने त्यात अधिक भर पडली. दोन्ही पक्षांनी युती केल्याने मतविभाजन टळले. राज्य सरकारच्या कर्जमाफीच्या घोषणेचाही आघाडीला फायदा झाला. काँग्रेसमध्ये प्रथमच सर्व नेत्यांमध्ये एकजूट दिसली. उमरेडमध्ये काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांच्यासोबत तेथील माजी आमदार राजेंद्र मुळक यांनी खांद्याला खांदा लावून काम केल्याने तेथे आघाडीला १० पैकी सात जागा मिळाल्या. देशमुख यांच्या काटोल मतदारसंघात आठ पैकी सहा, तर केदार यांच्या सावनेर मतदारसंघात १३ पैकी १२ जागा जिंकून काँग्रेसने ग्रामीण राजकारणावरील आपली पकड सिद्ध केली. विशेष म्हणजे आघाडीचे दोन्ही मंत्री निवडणूक संपेपर्यंत जिल्ह्य़ात ठाण मांडून बसले होते. काँग्रेसच्या यशात नेत्यांच्या सामूहिक प्रयत्नांचे प्रतिबिंब दिसते.

 

भाजप सैरभैर :  राज्यातून सत्तेबाहेर गेल्यावर भाजप शहरात आणि ग्रामीण भागामध्ये सैरभैर झाल्याचे चित्र आहे. ते तसेच राहिल्यास दोन वर्षांनी होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुका पक्षासाठी कठीण जाण्याची शक्यता आहे.

कमळ का कोमेजले?

’ तत्कालीन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना तिकीट नाकारल्याने मोठय़ा संख्येने जिल्ह्य़ात असलेला तेली समाज भाजपच्या विरोधात गेला. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही नाराजी कायम असल्याचे निकालातून दिसून येते.

’ खुद्द बावनकुळेंच्या कोराडीत आणि कामठीचे भाजप आमदार टेकचंद सावरकर यांच्या धानला गावात भाजपचा पराभव झाला. गडकरींचे मुळगाव धापेवाडा आणि दत्तक ग्राम पाचगावमध्येही हेच चित्र होते.

’ भाजपचे आमदार असलेल्या कामठी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने ९ पैकी पाच, तर हिंगणा मतदारसंघात सातपैकी तीन जागा राष्ट्रवादीने जिंकल्या.

शिवसेनेची परिस्थिती चिंताजनक

शिवसेनेच्या कमी झालेल्या जागा या पक्षासाठी चिंतेचा विषय आहे. रामटेकमध्ये खासदार आणि विधानसभेत आमदार असतानाही पक्षाची संख्या चारवरून एकवर आली आहे. आघाडीत यावे म्हणून सेनेला निमंत्रण होते; पण त्यांनी नाकारून स्वबळाचा नारा दिला. त्यात भाजपने सेनेलाच लक्ष्य केले. त्याचाही फटका बसला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2020 5:06 am

Web Title: wave against the bjp in zilla parishad election in nagpur district zws 70
Next Stories
1 ‘त्या’ वाघांना पकडण्याचे आदेश जारी
2 खुनातील आरोपीस अटक
3 लग्नाचे आमिष दाखवून ४१ लाखांनी फसवणूक
Just Now!
X