नागपूर शाखेचे अध्यक्ष प्रफुल फरकसे यांची ग्वाही; लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट

नाटय़ संमेलन हे केवळ ‘गेट टू गेदर न राहता त्यातून नाटय़हित साधले जावे, हा आमचा उद्देश आहे. या उद्देशाच्या पूर्ततेसह विदर्भातील लोककला आणि स्थानिक नाटय़ संस्थांना या नागपुरात आयोजित आगामी संमेलनात प्राधान्य देण्याचा आमचा प्रयत्न आहे, अशी ग्वाही अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या नागपूर शाखेचे अध्यक्ष प्रफुल फरकसे यांनी दिली.

अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलन आयोजित करण्याचा मान ३३ वर्षांनी उपराजधानीला मिळाला आहे.त्यानिमित्ताने नाटय़ परिषदेचे स्थानिक अध्यक्ष प्रफुल फरकसे यांनी लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. त्यावेळी त्यांनी संमेलनाच्या आयोजनाबाबत विविध मते मांडली. फरकसे म्हणाले, १९८५ मध्ये नागपुरात नाटय़ संमेलन झाले. त्यावेळची परिस्थिती आणि कार्यक्रमाचे स्वरूप वेगळे होते. खर्चाचा आवाका त्यावेळी इतका नव्हता. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. मोठा खर्च करावा लागतो. परंतु असा खर्च करताना टीकाही होत असते. त्यामुळे संमेलनातील अवास्तव खर्च टाळण्यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करणार आहोत. नागपूरचे नाटय़ संमेलन इतर संमेलनापेक्षा वेगळे राहील. केवळ मनोरंजन म्हणून नाटय़ संमेलनाकडे न बघता समाजप्रबोधनाचे ते माध्यम आहे या दृष्टीने नियोजन केले जाणार आहे.

संमेलनासाठी सरकारकडून अनुदान मिळत असले तरी देणग्यांची गरज भासतेच. त्यामुळे काही संस्थांची, व्यक्तीची त्यासाठी मदत घ्यावी लागेल. संमेलनाच्या दृष्टीने ज्या गोष्टी करणे आवश्यक आहे त्याच गोष्टीवर खर्च केला जाईल. काही कलावंत संमेलनासाठी मानधन  घेत नाहीत. मात्र काही कलावंतांची जाण्या-येण्याची आणि राहण्याची व्यवस्था करावी लागणार आहे. गिरीश गांधी, प्रवीण दटके आणि मध्यवर्ती शाखेचे उपाध्यक्ष डॉ. नरेश गडेकर यांनी या संमेलनासाठी पुढाकार घेतला. त्यांच्यासोबत नागपूरची शाखा मदतीला आहे.

संमेलनाचे आयोजन करण्यासाठी केवळ एक महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. त्यासाठी विविध समित्या स्थापन करण्यात येणार आहेत. या समितीमध्ये विविध नाटय़ संस्थांच्या प्रतिनिधींसह राजकीय, सामाजिक, धर्मिक आणि साहित्य संस्थांच्या प्रतिनिधींचा समावेश राहणार आहे.

नाटय़ संमेलन जाहीर झाल्यानंतर प्रत्येक कलावंताने सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे. नाटय़ परिषद काही ठरावीक कलावंतांची नाही, ती या शहरातील प्रत्येक कलावंताची आहे.  सुरेश भट सभागृह आणि रेशीमबाग मैदान अशा दोन ठिकाणी हे संमेलन होणार आहे.

उद्घाटनाला मुख्यमंत्री येणार

संमेलनाचे स्वागताध्यक्ष केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राहणार असून उद्घाटनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  येणार आहेत. संमेलनाच्या विशेष आयोजन समितीमध्ये प्रत्येक राजकीय पक्षाच्या नेत्यांचा सहभाग राहणार आहे. म्हणून, संमेलन नागपुरात परिषदेच्या मध्यवर्ती शाखेकडे नाटय़ संमेलन आयोजित करण्यासाठी नऊ प्रस्ताव आले होते. यातील सात संस्थांनी प्रस्ताव मागे घेतल्यानंतर लातूर किंवा नागपूर यातून निवड करायची होती. मराठवाडय़ात दुष्काळग्रस्त परिस्थिती बघता तेथील काही लोकांनी विरोध केला. त्यामुळे लातूरचे नाव गळळे.  नागपूर ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची कर्मभूमी आहे. ही नागपूरसाठी जमेची बाजू होती. त्यामुळे संमेलन आयोजित करण्याचा मान नागपूरला मिळाला आहे.

दोन शाखांमध्ये वाद नाही

नागपुरात नाटय़ परिषदेच्या दोन शाखा असल्या तरी त्यांच्यात वाद नाही. प्रत्येकाला संमेलनात स्थान देण्यात येणार आहे. ज्यांना संमेलनाच्या दृष्टीने काम करण्याची इच्छा आहे त्यांनी स्वेच्छेने समोर यावे आणि काम करावे, असे अवाहनही फरकासे यांनी केले.