महेश बोकडे

प्रादेशिक मनोरुग्णालयात ‘टाटा ट्रस्ट’च्या वतीने मनोरुग्णांच्या पुनर्वसनाचा पथदर्शी प्रकल्प राबवला जाणार आहे. त्यात मनोरुग्णांना नाश्ता तयार करण्यापासून तो ग्राहकांना वाढण्यापर्यंतचे सर्व प्रशिक्षण दिले जाईल. त्यासाठी अद्ययावत फिरते उपाहारगृह तयार झाले आहे. विशेष म्हणजे, या व्यवसायातून होणारे उत्पन्नही रुग्णांमध्येच वाटले जाणार आहे.

मनोरुग्णांकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन आजही फार काही चांगला नाही. नागपूरच्या प्रादेशिक रुग्णालयातील मानसिक आजारातून बाहेर पडलेल्या दीडशेहून अधिक व्यक्तींना त्यांचे नातेवाईक घरी परत न्यायला तयार नाहीत. समुपदेशनाचाही नातेवाईकांवर परिणाम झालेला नाही. त्यामुळे मनोरुग्णालय प्रशासन आणि टाटा ट्रस्टकडून मनोरुग्णांना आर्थिकदृष्टय़ा सक्षम करण्यासाठी हा प्रकल्प राबवला जाणार आहे. त्यात नागपूरच्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील हॉटेल मॅनेजमेंट आणि कॅटरिंग विभागाची मदत घेतली जाणार आहे. हा विभाग रुग्णांना पोहा, उपमा, नुडल्स, चाय, कॉफी तयार करण्यापासून इतरही कौशल्य शिकवेल.

प्रशिक्षणामुळे रुग्ण ग्राहकांशी चांगल्या पद्धतीने संवाद साधणे, खाद्यपदार्थाचे ऑडर घेणे, योग्यरित्या वाढणे, नाश्ता हाताळण्याचे कसब उत्तमरित्या शिकतील. यासाठी टाटा ट्रस्टकडून साडेसात लाख रुपयांच्या निधीतून अद्ययावत फिरते उपाहारगृह उपलब्ध केले गेले आहे. त्याचे काम शेवटच्या टप्यात आहे. या वाहनासोबत ग्राहकांना नाश्ता करण्यासाठी बसायला चांगल्या दर्जाचे टेबल, खुर्चीही लवकरच पोहचतील. सर्व सोय उपलब्ध होताच काही दिवसांत हे फिरते उपाहारगृह मनोरुग्णालयातील बाह्य़रुग्ण विभागाच्या बाहेर सकाळच्या सत्रात सेवा देताना दिसेल.

रुग्णांच्या नातेवाईकांना सर्वाधिक लाभ

उपराजधानीतील ९६० खाटांच्या प्रादेशिक मनोरुग्णालयात सुट्टीचे दिवस वगळता रोज दाखल रुग्णांसह सकाळी ९ ते दुपारी १ वाजतापर्यंत बाह्य़रुग्ण विभागातही सुमारे २५० ते ३०० रुग्ण तपासले जातात. प्रत्येक रुग्णासोबत किमान दोन ते तीन नातेवाईक असतात. येथील औषध कंपनीचे प्रतिनिधी, कंत्राटी व कायम कर्मचाऱ्यांसह इतर सुमारे १ हजार नागरिकांचा येथे रोजचा वावर असतो. या नातेवाईकांसाठी येथे जवळपास हॉटेल नाही. त्यामुळे या उपक्रमाचा सर्वाधिक लाभ रुग्णांच्या नातेवाईकांना होणार आहे.

मनोरुग्णालयातील बहुतांश रुग्ण हे गरीब कुटुंबातील असतात. ते बरे झाले तरी त्यांना परत नेल्यावर ते काय करणार, हा प्रश्न बहुतांश नातेवाईकांपुढे असतो. टाटा ट्रस्टच्या मदतीने या रुग्णांना अन्न तयार करण्यापासून वाढण्यासह सर्व कौशल्य शिकवून त्यांच्या पुनर्वसनाचा प्रयत्न सुरू आहे. त्यातून हे रुग्ण स्वत:चा व्यवसाय किंवा हॉटेलमध्ये सेवा देऊन आर्थिकदृष्टय़ा सक्षम होऊ शकतील. त्यामुळे निश्चित ते परत आपल्या घरी जाऊ शकणार आहेत.

– डॉ. माधुरी थोरात, वैद्यकीय अधीक्षक, प्रादेशिक मनोरुग्णालय.