डॉ. अय्याज तांबोळी यांच्या परिश्रमातून छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये सुसज्ज रुग्णालय

देशभरातील नक्षलग्रस्त जिल्ह्य़ांमध्ये सार्वजनिक आरोग्यसेवेचा पार बोजवारा उडाला असताना शेजारच्या छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्य़ात गेल्या एक वर्षांत सुसज्ज सरकारी रुग्णालय उभे राहिले आहे. देशभरातील तब्बल ३८ डॉक्टर सेवेत असलेल्या या रुग्णालयात सर्व प्रकारच्या उपचाराची सोय असून मूळचे पुण्याचे व सध्या बिजापूरचे जिल्हाधिकारी असलेले डॉ. अय्याज तांबोळी यांच्या परिश्रमातून साकारलेल्या या रुग्णालयाचे ‘डॉक्टर्स विदाऊट बॉर्डर्स’ या आंतरराष्ट्रीय संघटनेने सुद्धा कौतुक केले आहे.

dharmarao baba Atram, Present Evidence, Wadettiwar s Alleged BJP Entry, Press Conference, dharmarao baba Atram Press Conference, vijay Wadettiwar, oppositon leader of maharashtra assembly, congress, ncp, lok sabha 2024, gadchiroli lok sabha seat,
विजय वडेट्टीवार यांच्या भाजप प्रवेशावर धर्मरावबाबा आत्राम उद्या करणार मोठा खुलासा?
flamingo, Solar lights, Navi Mumbai ,
फ्लेमिंगो क्षेत्रात सौरदिवे! पर्यावरणवाद्यांच्या तक्रारींनंतर नवी मुंबई महापालिकेची धावाधाव
Smuggling liquor, Delhi to Mumbai, State Excise Department, Seizes 205 Bottles, Foreign Liquor, Arrests one man, crime, marathi news,
दिल्लीवरून मुंबईत मद्याची तस्करी
Smuggling liquor, Delhi to Mumbai, State Excise Department, Seizes 205 Bottles, Foreign Liquor, Arrests one man, crime, marathi news,
दिल्लीवरून मुंबईत मद्याची तस्करी

गडचिरोलीला लागून असलेला व छत्तीसगडच्या अगदी टोकावर असलेला बिजापूर हा जिल्हा सततच्या नक्षल कारवायांमुळे अतिशय संवेदनशील म्हणून ओळखला जातो. घनदाट जंगलाने वेढलेल्या या जिल्ह्य़ात खासगी सेवा देणारा एकही डॉक्टर अथवा रुग्णालय नाही. जगदलपूर व रायपूर या दोन मोठय़ा शहरापासून शेकडो किमी दूर असलेल्या या जिल्ह्य़ात आजवर एक सरकारी रुग्णालय व त्यात एक डॉक्टर व दहा परिचारिका एवढाच कर्मचारीवर्ग कार्यरत होता. औषधे नाही, तज्ज्ञ व प्रशिक्षित डॉक्टर्स नाहीत, त्यामुळे हे रुग्णालय बंद अवस्थेत असल्यासारखेच होते. वैद्यकीय उपचाराची सोय नसल्याने या जिल्ह्य़ात बालमृत्यूचे प्रमाण प्रचंड आहे. मूळचे डॉक्टर असलेले व सध्या भारतीय प्रशासनिक सेवेत असलेले अय्याज तांबोळी यांनी दीड वर्षांपूर्वी या जिल्ह्य़ात आल्यानंतर हे रुग्णालय सुसज्ज करण्याचा निर्णय घेतला. या दुर्गम भागात चांगल्या डॉक्टरांना आणायचे असेल तर आधी रुग्णालयाची इमारत, डॉक्टरांना राहण्यासाठी चांगल्या सोयीसुविधा निर्माण करणे गरजेचे आहे हे लक्षात घेऊन तांबोळी यांनी केंद्र स्तरावर कार्यरत असलेल्या पब्लिक हेल्थ फाऊंडेशन व युनिसेफकडे मदत मागितली. त्यांनी दिलेल्या निधीतून अवघ्या सहा महिन्यांत सुसज्ज रुग्णालय उभारण्यात आले. शंभर खाटांच्या या रुग्णालयात सर्व प्रकारच्या रुग्णांवर उपचार करता येतील अशी उपकरणे लावण्यात आली. या जिल्ह्य़ात नक्षलवाद्यांसोबत होणाऱ्या चकमकीत जखमी होणाऱ्या जवानांची संख्या जास्त आहे. हे लक्षात घेऊन अत्याधुनिक उपकरणांनी सज्ज असा अतिदक्षता विभाग सुरू करण्यात आला. अवघड व नियमित शस्त्रक्रियांसाठी दोन स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आले. डॉक्टरांच्या निवासाची व्यवस्था व्हावी म्हणून वातानुकूलित वसतिगृह सुरू करण्यात आले. या रुग्णालयात परिचारिका, आरोग्यसेवक व तंत्रज्ञांच्या बहुतेक सर्व जागा रिक्त होत्या. त्या निवड पद्धतीने भरण्यात आल्या व त्यात जाणीवपूर्वक स्थानिकांना प्राधान्य देण्यात आले. शस्त्रक्रियेसाठी गरजेची असलेली ब्लड बँकेची स्वतंत्र इमारत उभी करण्यात आली. स्थानिकांना रक्तदानाचे आवाहन करत या बँकेत भरपूर रक्तसाठा गोळा करण्यात आला. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी येथे काम करण्यास इच्छुक असलेल्या डॉक्टरांचा शोध घेणे सुरू केले. संपूर्ण छत्तीसगडमध्ये शासकीय सेवेत असणाऱ्या डॉक्टरांना ५५ ते ७० हजार रुपये वेतन मिळते. एवढय़ा कमी वेतनात बिजापूरसारख्या ठिकाणी डॉक्टर्स काम करायला तयार होणार नाहीत हे लक्षात आल्यावर जिल्हाधिकारी तांबोळी यांनी वेतनात वाढ करण्याचा निर्णय घेतला. या जिल्ह्य़ाला खनिज विकास निधी मिळतो. त्यातून हे वाढीव वेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला. शल्यविशारद डॉक्टर असेल तर त्याला १ लाख २५ हजार ते २ लाख २५ हजार आणि साधे पदवीधारक डॉक्टर्स असतील तर त्यांना ८४ हजार रुपये महिना असे वेतन निश्चित करण्यात आले. हे ठरल्यानंतर तांबोळी यांनी अनेक वैद्यकीय महाविद्यालयांशी स्वत: संपर्क साधला. वाढीव वेतनाची माहिती सर्वत्र कळवली. त्याचा परिणाम लगेच दिसून आला. सध्या या रुग्णालयात देशभरातील ३५ डॉक्टर्स कार्यरत असून त्यातील १२ शल्यविशारद आहेत. डॉक्टरांची रेलचेल असल्याने अल्पावधीतच हे रुग्णालय अवघ्या पंचक्रोशीत लोकप्रिय झाले असून वैद्यकीय महाविद्यालय असलेल्या जगदलपूर या विभागीय मुख्यालय असलेल्या ठिकाणाहूनसुद्धा येथे उपचारासाठी रुग्ण येतात, असे या रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पराते यांनी सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांनी या रुग्णालयाचा केलेला कायापालट बघून छत्तीसगड सरकारने आता आरोग्यसेवेचे हेच मॉडेल इतर नक्षलग्रस्त जिल्ह्य़ात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाने मनात आणले तर नक्षलग्रस्त भागातसुद्धा चांगली आरोग्यसेवा देता येऊ शकते, हे बिजापूरच्या उपक्रमाने सर्वाना दाखवून दिले आहे.

महाराष्ट्रातील अनेक डॉक्टर छत्तीसगडमध्ये

बिजापूरच्या रुग्णालयात महाराष्ट्रातून वैद्यकीय शिक्षण घेतलेले सहा डॉक्टर कार्यरत आहेत. महाराष्ट्राच्या तुलनेत येथे वेतन जास्त आहे व सोयीसुविधा सुद्धा भरपूर आहेत. त्यामुळे येथे काम करण्याचा निर्णय घेतला असे मूळचे गडचिरोलीचे डॉ. किरण गेडाम व सोलापूरच्या डॉ. ऐश्वर्या रेवाडकर यांनी सांगितले. आता हेच वेतन या राज्यातील इतर नक्षलग्रस्त जिल्ह्य़ात मिळणार असल्याने अनेक डॉक्टर छत्तीसगडमध्ये येत आहेत, असे ते म्हणाले.

डॉक्टर्स विदाऊट बार्डर्स

जिथे आरोग्यसेवा उपलब्ध नाही, अशा ठिकाणी जाऊन सेवा देणारी ही जागतिक संघटना गेल्या चार वर्षांपासून बिजापूरमध्ये रुग्णांवर उपचार करत होती. आता सरकारचे रुग्णालय सुसज्ज झाल्यानंतर या संस्थेने नुकताच बिजापूरचा निरोप घेतला असून जिल्हाधिकारी तांबोळी यांच्या जिद्दीचे कौतुक केले आहे.

कोण आहेत डॉ. तांबोळी?

सध्या छत्तीसगडच्या सेवेत असलेले अय्याज तांबोळी मूळचे पुण्याचे. ज्ञानप्रबोधनी या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली. २००९ च्या तुकडीचे अधिकारी असलेले तांबोळी येथे येण्यापूर्वी छत्तीसगडच्या राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानचे प्रमुख होते. तेथे काम करण्याचा अनुभव येथे रुग्णालय उभारताना कामात आला असे ते आवर्जून सांगतात.

गडचिरोलीची स्थिती

बिजापूरच्या पाश्र्वभूमीवर या जिल्ह्य़ाला खेटून असलेल्या गडचिरोलीची स्थिती भयावह आहे. या जिल्ह्य़ात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या २५० जागा मंजूर आहेत. त्यापैकी तब्बल १२३ रिक्त आहेत. जे कार्यरत आहेत, त्यात एमबीबीएस व एमएस अथवा एमडी डॉक्टरांची संख्या बोटावर मोजण्याएवढी आहे. बारापैकी नऊ ग्रामीण रुग्णालयाला वैद्यकीय अधीक्षकच नाही. महाराष्ट्रात नेमणूक स्वीकारणाऱ्या डॉक्टरांना ६५ हजारापेक्षा जास्त वेतन मिळत नाही. त्यामुळे तज्ज्ञ व प्रशिक्षित डॉक्टर या जिल्ह्य़ात काम करायला तयार नाहीत. शिवाय या जिल्ह्य़ातील रुग्णालये व निवासस्थानांची अवस्था अतिशय वाईट आहे.