वनखात्यात बदली आणि पदस्थापनेसाठी पैसे घेणारे ‘रॅके ट’ गेल्या दीड-दोन वर्षात सक्रिय झाले होते. तत्कालीन उपवनसंरक्षक शिवकुमार याच्या जाचाला कंटाळून दीपाली चव्हाणने तत्कालीन क्षेत्र संचालक व अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांच्याकडे अर्ज केला होता. त्यांनी बदलीसाठी हात वर केल्यामुळे निराश झालेल्या दीपालीला या ‘रॅकेट’ने हेरले. तिच्याकडून बदलीसाठी पैसे घेतले. परंतु, बदली करणे तर दूरच, पण तिच्या मृत्यूनंतर पैसे परत करण्याचे औदार्य देखील  दाखवले नाही. त्यामुळे तिने दिलेल्या पैशांचे काय झाले, हा प्रश्न कायम आहे.

वनखात्यात साधारण दर तीन वर्षांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जातात. दीपाली मेळघाटात २०१४ पासून कार्यरत होती. सुमारे सात वर्षे तिने मेळघाटात घालवले. मात्र, गेल्या काही वर्षांपासून शिवकु मारकडून दिल्या जाणाऱ्या मानसिक त्रासामुळे ती पूर्ण खचली होती. वरिष्ठांकडे तक्रार करूनही काही होत नसल्याने शेवटी तिने बदलीसाठी अर्ज केला. वरुड, परतवाडा किंवा अमरावती येथे बदली करण्यात यावी, असे तिने विनंती अर्जात नमूद केले होते. बदली आपल्या अधिकारक्षेत्रात येत नाही, असे सांगून तिच्या अर्जाला रेड्डी यांनी के राची टोपली दाखवली. दीपालीला आलेले नैराश्य वनखात्यातील या ‘रॅकेट’ने बरोबर हेरले. दीपालीला नाईलाजाने हा मार्ग पत्करावा लागला. किमान पैसे देऊन बदली झाल्यानंतर तरी आपण शिवकु मारच्या जाचातून मुक्त होऊ, असे तिला वाटले असावे. येथेही तिच्या संयमाचीच परीक्षा घेतली गेली. बदली तर झालीच नाही, पण दीपाली जीव गमावून बसली. हे ‘रॅकेट’  वनखात्यातलेच आहे. गेल्या दीड-दोन वर्षात प्रादेशिकसाठी सात ते आठ लाख रुपये, सामाजिक वनीकरणसाठी चार ते पाच लाख रुपये असा बदलीचा दर आकारला जात असल्याचे बोलले जाते. विनंती बदल्यांसाठी देखील सुमारे २०० जणांकडून पैसे घेण्यात आल्याची माहिती आहे. यातील अनेकांच्या बदल्या तर झाल्याच नाहीत, पण पैसेही परत करण्यात आले नाहीत. तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांनी खात्याची धुरा हाती घेतली तेव्हा बदल्याचे अधिकार स्वत:कडे राखून ठेवले होते. त्यांच्या खासगी सचिवांनी याबाबत काढलेले ३३ पानी पत्र प्रसारमाध्यमांमध्ये चांगलेच गाजले होते. त्याच काळात तर ही यंत्रणा तयार झाली नाही ना आणि या यंत्रणेचा दीपाली बळी ठरली नाही ना, अशीही चर्चा वनखात्यात सुरू आहे.