उच्च न्यायालयाची प्रधान सचिवांना विचारणा

नागपूर : नायलॉन मांजावर बंदी घालण्याच्या निर्णयानंतर राज्य सरकारने काय पावले उचलली, यासंदर्भात पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिवांनी सविस्तर प्रतिज्ञापत्र दाखल करावे, असे आदेश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी दिले. या याचिकेवर आता दोन आठवडय़ाने सुनावणी होईल.

संक्रांतीच्या सणानिमित्त मोठय़ा प्रमाणात पतंग उडवण्यात येते. याकरिता  नायलॉन मांजाचा वापर करण्यात येत असून यामुळे आकाशातील शेकडो पक्षी जखमी होऊन मृत्युमुखी पडतात. आता तर नायलॉन मांजाचा धोका मनुष्यजातीलाही झाला असून अनेक दुचाकीस्वारांचा अपघाती मृत्यू होत आहे. १ जानेवारीपासून आतापर्यंत शहरात तिघांचा नायलॉन मांजामुळे मृत्यू झाला. मंगळवारी झालेल्या अपघाताची उच्च न्यायालयाने गांभीर्याने दखल घेऊन नायलॉन मांजामुळे अपघातासंदर्भात जनहित याचिका दाखल करून घेतली. या याचिकेवर गुरुवारी न्या. नितीन जामदार आणि न्या. अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. यावेळी न्यायालयीन मित्र अ‍ॅड. देवेन चौहान यांनी न्यायालयाला सांगितले की, २०१७ मध्ये राष्ट्रीय हरित लवादाने नायलॉन मांजाच्या वापरावर बंदी घातली आहे. त्यानंतर राज्यात नायलॉन मांजाची मोठय़ा प्रमाणात विक्री व वापर करण्यात येत आहे. यातून लोकांचा अपघात होऊन मृत्यू होत आहे.

न्यायालयीन मित्राची बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने हरित लवादाच्या आदेशानंतर राज्य सरकारने नायलॉन मांजासंदर्भात कोणती पावले उचलली, यासंदर्भात दोन आठवडय़ात उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले.

मांजा विक्रेत्यांसह २५० पतंगबाजांवर कारवाई ; ५५ हजारांचा दंड वसूल, ४०४८ पतंग जप्त

नागपूर :  गुरुवारी मकर संक्रांतीच्या दिवशी शहरातील विविध भागात महापालिकेच्या उपद्रवी शोध पथकाने प्लास्टिक पतंग विक्रेत्या व नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाई करीत ५५ हजाराचा दंड व मोठय़ा प्रमाणात प्लास्टिकच्या पतंग जप्त केल्या. विशेष म्हणजे, नायलॉन मांजा वापरणाऱ्या व प्लास्टिकच्या पतंग उडवणाऱ्या २५० पतंगबाजांनाही कारवाईचा दणका बसला.  बंदी असतानाही शहरात नायलॉन मांजावर आणि प्लास्टिक पतंगांची विक्री होत असल्यामुळे आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या आदेशानुसार दहाही झोनमधील उपद्रव शोध पथकाने विविध भागात पतंगांच्या दुकानांवर धाडी टाकल्या. नायलॉन मांजा आणि प्लास्टिक पतंगांची विक्री  करणाऱ्या विक्रेत्यांसह नायलॉन मांजाने आणि प्लास्टिक पतंग उडवणाऱ्या व्यक्तींवरही यावेळी मोठी कारवाई करण्यात आली. दिवसभर ४२४ दुकानांची उपद्रव शोध पथकाने तपासणी केली. यात नायलॉन मांजाची विक्री करणारे आणि प्लास्टिक पतंग विकणारे ५५ दुकानदार कारवाईस पात्र ठरले.

शिवाय नायलॉन मांजाचा वापर करून पतंग उडवणाऱ्या २५० व्यक्तींवर कारवाई करण्यात आली . पतंगबाजांवरील कारवाईमध्ये मंगळवारी झोन अव्वल असून सर्वाधिक ३५ पतंगबाजांवर या झोनमध्ये कारवाई करण्यात आली. या संपूर्ण कारवाईत सुमारे ४०४८ पतंग, १०७ चक्री जप्त करण्यात आल्या. कारवाईत ५५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. नायलॉन मांजा आणि प्लास्टिक पतंगविरोधात उघडलेल्या मोहिमेमध्ये सर्वाधिक ७० दुकाने आशीनगर झोनमध्ये तपासण्यात आली. यापैकी तब्बल २१ दुकानदारांवर कारवाई करण्यात आली.

पोलिसांकडून ड्रोनचा वापर

नायलॉन मांजामुळे अपघाताच्या घटना घडून मृत्यू झाल्यानंतर पोलिसांकडून विक्रेते व वापर करणाऱ्यांविरुद्ध कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली. बुधवारी ४५ आणि गुरुवारी १९ जणांवर पोलिसांनी कारवाई केली. त्याशिवाय संक्रांतीच्या दिवशी पोलिसांनी ड्रोनद्वारा पतंग उडवताना नायलॉन मांजा वापरणारे व अपघातांवर लक्ष ठेवले होते.

२१ जण मेडिकल, मेयोत पोहोचले

पतंगबाजीच्या नादात शहरात मंगळवापर्यंत तिघांचा मृत्यू झाला तर आज गुरुवारी  २१ व्यक्ती मेडिकल, मेयो रुग्णालयात  पोहचले. खासगी रुग्णालयात यापेक्षा जास्त लोकांनी उपचार घेतले. परंतु त्यांची कुठेही नोंद नाही. गुरुवारी रात्री ८ वाजेपर्यंत पतंगाच्या मांजामुळे हात, नाक, कान कापल्यामुळे मेयोत ७ तर मेडिकलला १५ असे एकूण २१ जखमी उपचारासाठी आले. शासकीय रुग्णालयांत रुग्णांची संख्या कमी असली तरी खासगी रुग्णालयांत त्याहून जास्त रुग्ण उपचाराला आल्याची माहिती विविध खासगी रुग्णालयांतील डॉक्टरांकडून मिळाली. दरम्यान, मेडिकलमध्ये आलेल्या रुग्णांत पतंग पकडण्याच्या नादात भिंतीवरून पडून हाड मोडलेला,  मांजा शरीराला अडकून अपघात झालेले रुग्ण यांचा समावेश होता.

मांजाचे घाऊक व्यापारी सोडून छोटय़ा विक्रेत्यांवर कारवाई का? विक्रेत्यांचा महापालिका प्रशासनाला सवाल

नागपूर :  मांजा व पतंग रातोरात शहरात येत नाहीत. दोन- चार महिन्यांपूर्वी त्यांची नोंदणी केल्यावर नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये माल घाऊक व्यापाऱ्यांकडे येतो. जानेवारीच्या सुरुवातील किरकोळ विक्रेते त्याची खरेदी करतात. मात्र आता पतंग व मांजा सर्वत्र पोहचला असून कारवाई केवळ छोटय़ा विक्रेत्यांवर केली जात आहे. महापालिका नायलॉन मांजाच्या नावाखाली आमची झडाझडती घेत असून घाऊक व्यापारी आपल्याकडील माल विकून मोकळे झाले आहेत. त्यांच्यावर कधी कारवाई होणार असा सवाल किरकोळ पतंग व मांजा विक्रेते करू लागले आहेत.

नागपुरात मकरसंक्रांत मोठय़ा उत्साहात साजरी होते. शहरात भल्या सकाळपासून आकाशात पतंगांचा पेचा पहायला मिळतो.  गजानन मंदिर सक्करदरा येथे पतंगांची सर्वात जुनी आणि मोठी बाजारपेठ आहे. येथे निरनिराळ्या आकाराच्या आणि प्रकारच्या आकर्षक पतंग  मिळतात. शहरात उत्तरप्रदेश, बरेली व दिल्ली येथून सर्वाधिक पतंग व मांजाचा पुरवठा होतो. छोटे व्यापारी दरवर्षी कर्ज काढून हा व्यवसाय करतात. यंदाही त्यांनी  गेल्या महिन्यात मोठय़ा प्रमाणात पतंग व मांज्याची खरेदी शहरातील घाऊक व्यापाऱ्यांकडून केली. मात्र मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला एका युवकाचा नायलॉन मांजामुळे गळा चिरून मृत्यू झाला आणि महापालिकेचा जाग आली. गेल्या दोन दिवसांपासून महापालिकेचे पथक शहरातील मुख्य पतंगांच्या बाजारात प्रत्येक पतंग व मांजा विक्रेत्यांची झडाझडती घेत कारवाई करत आहेत. पतंग विक्रेत्यांना या न त्या कारणांवरून दंडात्मक कारवाई केली जात आहे. त्यामुळे बाजारपेठेतील छोटय़ा पतंग विक्रेत्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आधीच पतंग आणि मांजाची ग्राहकसंख्या रोडावली आहे. त्यात मालही जप्त केला जात आहे.

ज्यांनी शहरात नायलॉन मांजा आणला असे घाऊक, मोठे व्यापारी व्यवसाय करून मोकळे झाले असून त्यांच्यावर का कारवाई होत नाही, असा सवाल लहान विक्रेत्यांनी केला आहे. ही दरवर्षीची समस्या असून यंदा युवकाचा मृत्यू झाल्याने आमच्यासारख्या छोटय़ा व्यापाऱ्यांना धारेवर धरले जात असल्याचा आरोप ते करीत आहेत.

नायलॉन मांजाच्या घाऊक विक्रेत्यावर कारवाई झाल्याचे अजूनपर्यंत ऐकलेले नाही. महापालिका केवळ आमच्यासारख्या छोटय़ा व्यापाऱ्यांची झडाझडती घेते. त्यांना दुकानात नायलॉन मांजा मिळाला नाही तरी विविध कारणे सांगत कर्मचारी कारवाई करतात. कोणत्याही विक्रेत्याकडे नायलॉन मांजा मिळाल्यास त्यावर कारवाई झालीच पाहिजे. त्याला आमचा विरोध नाही. मात्र नायलॉन मांजाच्या घाऊक व्यापाऱ्यांवर कारवाई कधी होणार असा आमचा सवाल आहे.

– रूपचंद पतंग विक्रेता, जुनी शुक्रवारी