मधुमेह, रक्तदाबासह इतर आजार वाढणार

जागतिक निद्रा दिवस विशेष

व्हॉट्सअप, फेसबुकसह विविध समाजमाध्यमांनी तरुणांसह सर्वच वयोगटातील नागरिकांना आपल्या कवेत घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत ही माध्यमे सोबत बाळगल्याने रात्रीच्या झोपेवर त्याचा दुष्परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले आहे. रात्री उशिरा झोपणे, सकाळी उशिरा उठणे, झोप अपुरी झाली तर दिवसभर आळसावणे, असे हे चक्र सलग पाच ते सात वर्षे राहिल्यास मधुमेह, रक्तदाबासह विविध आजाराचा गंभीर धोका ‘आ’ वासून आपल्यासमोर उभा राहणार हे एका अभ्यासातून पुढे आले आहे. १७ मार्च हा ‘जागतिक निद्रा दिवस’ असून त्यानिमित्ताने घेतलेला हा आढावा.

प्रत्येक माणसाला रात्री किमान ८ तासांची गुणात्मक झोप आवश्यक असते. अशी झोप मिळाली नाही तर मधुमेह, रक्तदाब, यासह कर्करोगासारखे बरेच आजार जडण्याची शक्यता असल्याचे विविध अभ्यासातून पुढे आले आहे. जगभरात ३५ ते ४५ टक्के नागरिकांना निद्रानाशाचा आजार आहे.

झोपेच्या चार अवस्था असतात. त्यात रेम अवस्था महत्त्वाची असून १, २, ३ आणि रेम या चारही अवस्थेचे चक्र ९० मिनिटांचे असते. एक व्यक्ती सरासरी ६ तास झोपली तर तिच्या झोपेची चार चक्र पूर्ण होतात. रेम अवस्थेत मेंदूतल्या पेशी उत्तेजित होतात.

या अवस्थेत जिथे गरज आहे, तिथल्या भागात मेंदूची दुरुस्ती होते, परंतु हल्ली रात्री तरुण पिढीमध्ये व्हॉट्सअप, फेसबुकसह समाज माध्यमांचा वापर वाढला असून त्यामुळे त्यांच्या झोपेवर विपरीत परिणाम होत आहे.

भारतात मध्यरात्री १२ ते ३ वाजेपर्यंत सर्वात जास्त गाढ झोपेची वेळ असते. यावेळी मेंदूत मिलॅटोनीम हार्मोन्सचे प्रमाण वाढते. या हार्मोन्समुळे झोप येते.

या मिलॅटोनीमचा संबंध सूर्याशी असतो. सूर्यास्त झाल्यावर हे हार्मोन्स मेंदूत सक्रिय होतात, परंतु रात्री व्हॉट्सअप, फेसबुकचा जास्त वापर करणाऱ्यांमध्ये हे हार्मोन्स तयार होण्याचे प्रमाण मंदावलेले असते. साहजिकच अशा व्यक्तींमध्ये हळूहळू निद्रानाशाचा आजार बळावू लागतो आणि हेच चक्र सातत्याने पाच ते सात वर्षे सुरू राहिल्यास रक्तदाब, हृदय, कर्करोगासह सगळेच आजार बळकावण्याचा धोकाही वाढतो. शालेय विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक स्पर्धा वाढली आहे. त्यांच्या शाळा, शिकवण्या याबरोबरच वाढलेल्या अभ्यासक्रमांमुळे त्यांची जीवनशैलीही बदलली आहे. तेव्हा या मुलांमध्ये निद्रानाशाचा आजार लहानपणीच सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पर्याप्त झोप घ्या, आजार टाळा -डॉ. सुशांत मेश्राम

प्रत्येकाच्या शरीरात नॅचरल किलर सेल असतात. ते कर्करोगाच्या पेशी नष्ट करतात, पण झोप न झाल्यास यासारखे आजार बळावण्याचा धोका आहे. नियमित झोप घेतल्यास हे धोके टळतात. प्रत्येकाने किमान ८ तासांची आणि वयाची पन्नासी गाठलेल्यांनी किमान ७.३० तासांची झोप घेणे महत्त्वाचे आहे. सर्वत्र वाढणाऱ्या या आजाराच्या माहितीसाठी १७ मार्चला ‘स्लिप अ‍ॅपनीया’ असोसिएशनच्या वतीने सकाळी ११ ते २ वाजेपर्यंत स्लीप डायग्नोस्टिक अ‍ॅण्ड ट्रिटमेंट सेंटर, सहावा माळा, हयात मेडिकेअर बिल्डींग, खरे मार्ग, धंतोली येथे नागरिकांसाठी नि:शुल्क मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती प्राध्यापक डॉ. सुशांत मेश्राम यांनी दिली.

निद्रानाशाची लक्षणे

झोप न येणे

झोपेत श्वास थांबणे

दिवसा खाटेवर पडल्यानंतर त्वरित झोप येणे

झोपेत फिट येणे

झोपेत घोरणे

अचानक काही काळ स्मृतिभ्रंश होणे

दिवसा थकल्यासारखे वाटणे

झोपेतून उठल्यावरही थकवा जाणवणे

कधी आनंदी तर कधी दु:खी असल्याची भावना

संबंध स्थापित करण्याची इच्छा कमी होणे

उठल्याबरोबर डोके, जबडा, कान दुखणे

तोंडाला कोरड पडणे

उदासीनता येणे

सामाजिक व व्यावसायिक कार्यातून दूर राहणे

पायांमध्ये दुखल्यासारखे वाटणे किंवा अस्वस्थ वाटणे

झोपेमध्ये भयानक स्वप्न दिसणे

झोपेत किंचाळणे वा लाथ मारणे

झोप उघडल्यानंतरही पलंगावर पडून राहण्याची इच्छा

लहान मुलांमध्ये अतिक्रियाशिलता किंवा चंचलता वाढणे

झोपेत लघवी करणे

अभ्यासात मन न लागणे

साखर झोपेकरिता महत्त्वाचे

झोपण्याची व उठण्याची वेळ नियमित असावी

दुपारी झोपण्याची सवय असल्यास ती ४५ मिनिटांपेक्षा जास्त नसावी

धूम्रपान व मद्यपान टाळावे

झोपेच्या ६ तासापूर्वी चहा, कॉफी, सोडा यांचे सेवन टाळणे

गोड, तेलकट, तुपकट,मसालेदार पदार्थ झोपेच्या चार तास आधी टाळावे,हलके पदार्थ खाणे

नियमित व्यायाम, परंतु झोपेच्या आधी करू नये

अंथरूण, पांघरूण सोयीस्कर असावे

झोपण्याच्या खोलीचे तापमान सोयीस्कर असावे,खोलीत शुद्ध  हवा खेळती असावी

झोपताना खोलीमध्ये शक्य तितका प्रकाश कमी असावा, झोपमोड होईल असा आवाज नसावा झोपण्याच्या खोलीत कार्यालय, टीव्ही नसावे

रात्री मोबाईल, लॅपटॉपचा वापर कमी करावा