वकील, मानवाधिकार कार्यकर्त्यांवर पाळतीचा आरोप

नागपूर : ‘व्हॉट्स अ‍ॅप’च्या माध्यमातून इतरांच्या मोबाईलमध्ये घुसखोरी करण्याचा धक्कादायक प्रकार जगात समोर आला असून विदर्भातील दोन वकिलांसह एकूण तिघांवर पाळत ठेवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. यात मानवाधिकार वकील निहालसिंग राठोड, गडचिरोलीतील वकील जगदीश मेश्राम आणि मानवाधिकार कार्यकर्ते विरा साथीदार यांचा समावेश आहे.

इस्रायलच्या ‘एनएसओ’ या कंपनीने जगातील वेगवेगळया देशातील मानवाधिकार कार्यकर्ते व वकिलांच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून ‘पेगॅसस’ नावाचे व्हायरस टाकून त्यांचे मोबाईल हॅक केल्याची माहिती व्हॉट्स अ‍ॅप संचालित करणाऱ्या फेसबूक कंपनीने अमेरिकेतील न्यायालयात दिली. या माहितीने संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. यात विदर्भातील अ‍ॅड. निहालसिंग राठोड, गडचिरोलीतील अ‍ॅड. जगदीश मेश्राम आणि मानवाधिकार कार्यकर्ते विरा साथीदार यांचा समावेश आहे .

यासंदर्भात निहालसिंग राठोड यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, मार्च-२०१९ मध्ये आपल्याला हा प्रकार लक्षात आला. व्हॉट्स अ‍ॅपवर वेगवेगळे संदेश मिळून त्यात अनेक लिंक्स येत होत्या. त्यावेळी आपल्याला शंका आली व त्याची तक्रार व्हॉट्स अ‍ॅप कंपनीकडे केली. तेव्हापासून व्हॉट्स अ‍ॅपकडून कोणेतच उत्तर प्राप्त झाले नाही. शेवटी अमेरिकेत हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर व्हॉट्स अ‍ॅपने गेल्या २९ ऑक्टोबरला आपल्याला संदेश पाठवून इस्रायली कंपनी ‘एनएसओ’ या कंपनीकडून तुमच्या मोबाईलमध्ये घुसखोरी झाल्याची माहिती दिली. हा प्रकार आपल्या मोबाईलमध्ये २०१६ पासून सुरू होता. गडचिरोलीतील अ‍ॅड. जगदीश मेश्राम व मानवाधिकार कार्यकर्ते विरा साथीदार यांच्या मोबाईलमध्येही अशीच घुसखोरी करण्यात आली. जगदीश मेश्राम यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला असून मार्च व मे २०१९ मध्ये त्यांच्या व्हॉट्स अ‍ॅपमध्ये घुसखोरी झाल्याचे सांगितले.

अ‍ॅड. गडलिंगच्या संगणकांमध्येही घुसखोरी?

भीमा-कोरेगाव दंगल प्रकरणी कारागृहात असलेले अ‍ॅड. सुरेंद्र गडलिंग यांच्याही मोबाईलमध्ये अशाप्रकारची घुसखोरी झाल्याची शक्यता असल्याचे सांगत त्याच माध्यमातून त्यांच्या संगणकात विविध दस्तऐवज पेरण्यात आले व माओवादाशी संबंध जोडून त्यांना अटक करण्यात आली असावी, अशी शंका अ‍ॅड. निहालसिंग यांनी व्यक्त केली आहे. मोबाईल घुसखोरी झालेल्या सर्व पीडितांनी एकत्र यावे. हा नागरी सुरक्षेला धोका असून इस्रायली कंपनी ही केवळ विविध देशांच्या सरकारसाठी काम करीत असून आमच्यावर पाळत ठेवण्यामागेही विद्यमान सरकारच असेल, असा आरोप राठोड यांनी केला.