महेश बोकडे

२०१७ मध्ये तयार प्रस्ताव गुलदस्त्यातच; आरटीओ, एफडीए, महापालिकेची टोलवाटोलवी\

मालवाहू व इतर वाहनांमध्ये अवैधरित्या अंतर्गत बदल करून अनेकांनी त्यावर विविध खाद्यपदार्थाचे दुकान थाटले आहे. या वाहनांवरील अन्नपदार्थ सुरक्षित असावे म्हणून प्रादेशिक परिवहन विभागाने २०१७ मध्ये  हा व्यवसाय अधिकृत करण्याबाबत अन्न व औषध प्रशासन विभाग आणि महापालिकेला पत्र पाठवून सल्ला मागितला होता. त्याला अद्याप उत्तर मिळालेले नाही. त्यामुळे नागरिकांना सुरक्षित अन्नपदार्थ कधी मिळणार, हा प्रश्न अनुत्तरितच आहे.

नागपूरसह राज्याच्या कोणत्याही भागात अद्याप फिरत्या खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या कॅन्टिनला मंजुरी नाही. उपराजधानीत एका वाहनाला आरटीओकडून खाद्यपदार्थ विक्रीसाठी वाहनात केलेल्या बदलांबाबत मंजुरी दिली असली तरी या वाहनावर खाद्यपदार्थ तयार करता येत नाही. त्यानंतरही शहरात अनेक वाहनांवर नियमबाह्य़ पद्धतीने खाद्यपदार्थ तयार करून विकले जात आहेत. ही वाहने शहरातील गल्लीबोळीत फिरून खाद्यपदार्थाची विक्री करत असतात. या व्यवसायासाठी वाहनधारक सर्व नियम धाब्यावर बसवून वाहनाच्या अंतर्गत रचनेत मनात येईल तसे बदल करतात. या वाहनांत चुकीच्या हाताळणीमुळे तयार अन्नपदार्थ खावून ग्राहकांच्या आरोग्याला धोका संभवू शकतो.

ही बाब लक्षात घेऊन तत्कालीन प्रादेशिक परिवहन अधिकारी शरद जिचकार यांनी नागरिकांना सुरक्षित अन्नपदार्थ मिळावे म्हणून २०१७ मध्ये या व्यवसायाला अधिकृत करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आणि महापालिकेच्या अग्निशमन दलाला पत्र लिहित या व्यवसायाबाबत सल्ला मागितला होता. या वाहनाबाबत नियम तयार करण्यासाठी जिल्हा परिवहन समितीपुढे विषय आला, परंतु महापालिका आणि एफडीएने या प्रस्तावाला प्रतिसाद दिला नाही. दरम्यान, आजही शहरात सर्वत्र हा अवैध व्यवसाय सुरू असून त्यावरचे पदार्थ खाऊन कुणाला विषबाधा झाल्यास जबाबदार कोण, हा मोठाच प्रश्न आहे. बहुतांश वाहन धारकांकडून अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नियमांचे पालन तर सोडा, साधा व्यवसायाचा परवानाही घेतला जात नाही. त्यामुळे शासनाचा महसूलही बुडत आहे.

या भागात जास्त वाहने

शहरातील फुटाळा तलाव, धंतोली, कमाल चौक, सक्करदरा तलाव, शुक्रवारी तलाव, सदरचे व्हीसीए मैदान, व्हीएनआयटी कॉलेजच्या मुख्य द्वारासमोरील परिसर, बजाजनगर, व्हीआयपी रोड, अमरावती रोडवरील लॉ कॉलेज चौक ते रविनगर व इतरही काही भागात खाद्यपदार्थ विकणारी वाहने जास्त आढळतात.

ही काळजी घेणे आवश्यक

खाद्यपदार्थ तयार करताना प्रशासनाचा परवाना घेऊन स्वच्छता राखणे आवश्यक आहे.

ज्वलनशील पदार्थामुळे स्फोटाचा धोका

शहरात सध्या सुमारे ३०० खाद्यपदार्थ विक्री करणारी वाहने आहेत. त्यात अन्नपदार्थ तयार करण्यासाठी गॅस सिलिंडर, केरोसीन, शेगडीसह इतर ज्वलनशील पदार्थ ठेवले जातात. या ज्वलनशील पदार्थाच्या हाताळणीत थोडीही चूक झाल्यास स्फोट होऊन शहराच्या कोणत्याही भागात जीवितहानीही होऊ शकते. या वाहनांमध्ये आग लागल्यास ती विझवण्यासाठी अग्शिशमन यंत्रही नसतात.

‘‘प्रादेशिक परिवहन विभागाने पाठवलेल्या प्रस्तावाचा पुन्हा एकदा पाठपुरावा करून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली जाईल. या वाहनांबाबत नियम तयार करण्यासाठी वरिष्ठांचा सल्ला घेतला जाईल.’’

– श्रीपाद वाडेकर, प्रादेशिक परिवहन अधिकारी.