औषध दुकानातून ‘रेमडेसिवीर’ विक्रीवर प्रशासनाने बंदी घालत ते कोविड रुग्णालयातच देणे सुरू केले आहे. त्यानंतरही लस मिळत नसल्याने शहरातील अनेक रुग्णांचे नातेवाईक कुणा डॉक्टर वा औषध दुकानातून छुप्या पद्धतीने एक लसीसाठी १० ते २० हजार रुपयांपर्यंत मोजत आहेत. त्यामुळे रेमडेसिवीरच्या काळाबाजारावर नियंत्रण कधी? हा प्रश्न अनुत्तरित आहे. दुसरीकडे रुग्णालयांतून लसीच्या निर्णयापूर्वी काही औषध विक्रेत्यांनीही या लसीसाठी अवास्तव दर उकळले, हे विशेष.

नागपूर जिल्ह््यातील करोना स्थिती गभीर वळणावर आहे. येथील सर्व खासगी व शासकीय रुग्णालयांतील व्हेंटिलेटरसह ऑक्सिजन असलेल्या खाटा रुग्णांनी भरल्या असून काही रुग्णांना उपचारासाठी अमरावतीच्या रुग्णालयांत हलवले गेले. गंभीर रुग्ण वाढल्याने अचानक जिल्ह््यात रेमडेसिवीर लसींचा वापर वाढला. औषधांचा काळाबाजार रोखण्याच्या नावावर प्रशासनाने पुढे या लसी थेट रुग्णालयांतच रुग्णांच्या संख्येनुसार उपलब्ध करणे सुरू केले. परंतु उपलब्ध लसींच्या तुलनत रुग्णालयांत रुग्ण जास्त असल्याने त्या कमी पडत असल्याचे सांगत आजही बरेच रुग्णालये नातेवाईकांना बाहेरून लस आणायला लावत आहेत.

लसीसाठी नातेवाईक फिरत असताना त्यांना कुणी डॉक्टर तर कुणी औषध विक्रेता छुप्या पद्धतीने भेटत १ लस उपलब्ध करण्यासाठी १० ते २० हजार रुपयापर्यंत मागणी करतो. रामदासपेठमधील एका रुग्णालयात दाखल रुग्णासाठी नातेवाईकाला दोन दिवसांपूर्वी १५ हजारात ही लस घ्यावी लागली. धंतोलीतील रुग्णासाठी सोमवारी एकाने २० हजारात एक लस खरेदी केली. तर मंगळवारीही एका जरीपटका परिसरात दाखल रुग्णाने ७,५०० रुपयांत लस घेतल्याचे खुद्द नातेवाईकांनी नाव न टाकण्याच्या अटीवर सांगितले.

दरम्यान, शहरातील काही नावाजलेल्या रुग्णालयांत डे केअर सुविधेत रुग्णांना ही लस दिली जात आहे. तेथे या लसीसह रुग्णालयातील शुल्क म्हणून प्रत्येक रुग्णाकडून १५ ते २० हजार रुपये उकळले जात असल्याच्याही नातेवाईकांच्या

तक्रारी आहेत. त्यामुळे रेमडेसिवीरच्या काळाबाजारामुळे

सुरू असलेली नातेवाईकांची लूट थांबणार कशी? हा प्रश्न नातेवाईक विचारत आहेत. त्यातच ही लस देतांना कुणालाही देयक दिले जात नाही.

कोविड रुग्णालय म्हणून नोंदणी असलेल्या रुग्णालयांनाच तेथे दाखल रुग्णसंख्येनुसार रेमडेसिवीर लसी दिल्या जात आहेत. कुणी गैरकोविड रुग्णालयात करोनाग्रस्त दाखल असल्यास त्यांना ती देता येत नाही. परंतु आता रेमडेसिवीरचा पुरवठा हळूहळू सुरळीत होत असल्याने स्थिती लवकरच सामान्य होईल, अशी माहिती रेमडेसिवीर पुरवठा सनियंत्रण समितीचे अधिकारी शेखर गाडगे यांनी दिली.

कोविड- गैरकोविड रुग्णालयाच्या नावाने रुग्णांची अशीही फरफट

नवीन निर्णयानुसार एकीकडे महापालिका व जिल्हा प्रशासनाच्या यादीवर असलेल्या कोविड रुग्णालयातच रुग्णांच्या संख्येनुसार रेमडेसिवीर लस उपलब्ध केली जात आहे. तर दुसरीकडे रुग्णालयांत खाटा मिळत नसल्याने गंभीर रुग्ण मिळेल त्या रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेत आहेत. सक्करदरा परिसरातील एका रुग्णालयात एका एचआरसीटीचा १४ गुणांक असलेल्या रुग्णावर उपचार सुरू आहे. या रुग्णासाठी लसीच्या चार मात्रा नातेवाईकांनी खूप परिश्रम घेत कशातरी मिळवल्या. आणखी शिल्लक लशींसाठी रुग्णाची पत्नी व मुली शहरातील विविध औषध दुकाने दोन ते तीन दिवसांपासून पिंजून काढत आहे. परंतु त्यांना ती मिळाली नाही. तर एका परिचिताने रेमडेसिवीर पुरवठा सनियंत्रण समितीच्या अधिकाऱ्यांना मदत मागितली असता त्यांना संबंधित रुग्णालयाला कोविडमध्ये नोंदणी करण्यासाठी सांगण्यात आले. त्याशिवाय पुरवठा होणार नसल्याचे त्यांचे म्हणने होते. तर रुग्णालयाकडून ते कोविड रुग्णालय असल्याचे सांगण्यात येत होते. त्यामुळे नातेवाईकांची अशीही फरफट होत आहे.