अनेक रेल्वेमंत्री झाले, पण वंजारीनगर पाण्याची टाकी ते अजनी रेल्वे पुलादरम्यानचा रस्ता होऊ शकला नाही. अखेर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तिसरा डोळा उघडला. त्यामुळे हा रस्ता वास्तवात येत आहे, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

दक्षिण नागपुरातील वंजारीनगर पाण्याची टाकी ते अजनी पुलापर्यंतच्या चार पदरी ओव्हरपास पूल आणि अन्य काही विकासकामांचे भूमिपूजन फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर पालकममंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, आमदार सुधाकर कोहळे होते.

चार वर्षांत नागपूर शहरात जो विकास झाला आहे, त्याचे पडसाद केवळ देशपातळीवरच नव्हे तर जागतिक पातळीवर उमटत आहेत.  इकॉनॉमिक फोरमने सर्वात विकसित शहरांच्या नावांची यादी जाहीर केली आहे. त्या यादीमध्ये सन २०३५ मध्ये नागपूर हे जगात सर्वाधिक विकसित शहर राहणार असल्याचे म्हटले, असा दावाही त्यांनी केला.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गेल्या साडेचार वर्षांत केलेल्या विकासकामांची माहिती दिली.  ७० वर्षांत जेवढे काम झाले नाही, तेवढे विकास काम चार वर्षांत झाले. नागपूर लोकसभा मतदारसंघात ६६ ते ७० हजार कोटींची कामे सुरू आहेत. मिहानमध्ये आतापर्यंत २३ हजार युवकांना रोजगार मिळाले आहेत, असेही ते म्हणाले. गडकरी यांनी एम्स, आयआयएमसारख्या शैक्षणिक संस्था, मेट्रो, उड्डाण पुलांच्या बांधकामांचा उल्लेख करून एकप्रकारे त्यांच्या खासदारकीच्या काळातील कामांचा लेखाजोखा मांडला आणि निवडणूक प्रचाराचे बिगुल फुंकले.

भूमिपूजन

वंजारी नगर पाणी टाकी ते अजनी पुलापर्यंतचा ओव्हरपास ब्रीजचे भूमिपूजन झाले. तसेच एकात्मिक ऊर्जा विकास योजनेअंतर्गत ५७ कोटी रुपये किंमतीचे ३३ के.व्ही. उपकेंद्र व वीजवाहिनी, नागपूर सुधार प्रन्यास अंतर्गत ई-लायब्ररी आणि नागपूर महापालिकेअंतर्गत होत असलेल्या ७५ कोटी रुपये किंमतीच्या सिमेंट रस्त्यांचे ई-भूमिपूजन करण्यात आले.