शाळेत जाण्यापूर्वी आणि शाळेतून आल्यावर वडिलांसोबत रस्त्यावर बसून भाजी विकायची आणि त्यातून घराचा उदरनिर्वाह चालवायचा, कुठलीही शिकवणी नाही आणि घरात शैक्षणिक वातावरणही नाही. परंतु अशाही परिस्थितीत नेताजी सुभाषचंद्र बोस शाळेच्या निखिल रितेश नंदनवार या विद्यार्थ्यांने ९० टक्के  गुण मिळवले. त्याला ही सुवार्ता कळली तेव्हाही तो रात्रीच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी भाजीच विकत होता. भरतवाडा परिसरात राहणारा निखिल हा अभ्यासात हुशार असला तरी आर्थिक स्थिती चांगली नसल्यामुळे  महागडय़ा आणि मोठय़ा शाळेत प्रवेश घेऊ शकला नाही.

वडिलांचा भाजी विक्रीचा व्यवसाय. आई गृहिणी. बहीण-भावाचा शिक्षणाचा खर्च वडिलांना झेपत नव्हता. त्यामुळे तो वडिलांसोबत भाजी विकायला लागला. निकाल लागला त्यावेळी  शाळेतील शिक्षक त्यांच्या घरी शाळेतून प्रथम आल्याचे सांगायला गेले त्यावेळी तो रस्त्यावर बसून भाजी विकत होता. कौटुंबिक जबाबदारीसमोर त्याने स्वत:चा निकालही बघितलेला नव्हता.