सामाजिक अंतर ठेवण्यासाठी प्रशासनाची सूचना

नागपूर : करोनामुळे शहरात सर्वत्र संचारबंदी लागू आहे. जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी महापालिकेच्या १० झोन अंतर्गत येणाऱ्या सर्व सुरू असलेल्या दुकानांसमोर सामाजिक अंतर ठेवण्यासाठी पांढरी रेषा ओढण्यात आल्या आहेत.

सरकारकडून उद्या औषध व किराणा दुकाने बंद करण्याचे आदेश आले तर काय होईल, या भीतीने सध्या नागरिक दुकानांमध्ये गर्दी करत असून मोठय़ा प्रमाणात किराणा खरेदी करत आहे. पण गर्दीमुळे करोनाचा संसर्ग होण्याची भीती आहे. त्यासाठी महानगरपालिकेने जीवनावश्यक दुकानांसमोर एक मीटरच्या अंतराने पांढऱ्या रेषा ओढल्या आहेत. तसेच दुकानदारांनाही ग्राहकांना सूचनांचे पालन करण्यासाठी सांगण्यात आले आहे.

त्यामुळे मंगळवार सकाळपासून अनेक किराणा दुकानांमध्ये नागरिकांनी एक मीटरचे सामाजिक अंतर ठेवून खरेदी केली. काही दुकानांपुढे नागरिकांच्या हातात असलेली यादी घेऊन त्यांना नंतर सामान घेण्यासाठी देण्यात आल्या. मात्र ठेल्यावर व भाजीपाल्याच्या दुकानांवर मात्र अशाप्रकारचे पांढरे पट्टे नव्हते.

त्यामुळे नागरिकांनी सकाळी  गर्दी केली होती. खामला,देवनगर भागातील नागरिक सुरक्षित अंतर राखताना दिसले.