राम भाकरे

पूर्व नागपूर विधासभा मतदारसंघ

भाजपची भक्कम पकड असलेल्या पूर्व नागपूर मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार कृष्णा खोपडे यांच्याविरुद्ध काँग्रेसचा उमेदवार कोण असणार तसेच शिवसेना मित्रपक्षाची भूमिका बजावणार को, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

एकेकाळी काँग्रेसचा दबदबा असलेल्या पूर्व नागपूर मतदारसंघात २००९ मध्ये भाजपचे कृष्णा खोपडे यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते व माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचा पराभव केला. २०१४ ची निवडणूकही त्यांनी मोठय़ा मताधिक्यानेजिंकली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत गडकरी यांना सर्वाधिक मताधिक्य देणारा मतदारसंघ हा पूर्व नागपूरच होता. मुख्यमंत्र्यांच्या दक्षिण-पश्चिमच्या तुलनेत ही आघाडी अधिक होती. यामुळे पक्षाचा आणि पक्षाचे नेते नितीन गडकरी यांचाही खोपडे यांच्यावर विश्वास अधिक वाढला आहे. त्यामुळे त्यांना तिसऱ्यांदा उमेदवारी निश्चित मानली जात आहे. मतदारांशी असलेला थेट संपर्क, तेली समाज आणि हिंदी भाषिकांची साथ या खोपडे यांच्यासाठी जमेच्या बाजू आहेत. मात्र, पक्षातील एक गट त्यांच्या विरोधात सक्रिय आहे. प्रथम मंत्रीपद आणि नंतर महामंडळाचे अध्यक्षपद मिळण्याची शक्यता असतानाही शेवटपर्यंत ते न मिळणे हे त्याचेच प्रतीक मानले जाते. अशोक गोयल, चेतना टांक आणि बाल्या बोरकर ही भाजपमधील इतर इच्छुकांची नावे आहेत. दुसरीकडे काँग्रेसने सक्षम उमेदवार दिल्यास पूर्वमध्ये भाजपपुढे आव्हान उभे केले जाऊ शकते, असे काँग्रेसचे नेते सांगतात. त्यामुळे काँग्रेस नव्या चेहऱ्याच्या शोधात आहे. पक्षाची पारंपरिक मते या भागात मोठय़ा प्रमाणात असली तरी गटबाजी ही काँग्रेससाठी कायम डोकेदुखी ठरली आहे. या भागाचे अनेक वर्षे  प्रतिनिधित्व करणारे सतीश चतुर्वेदी सध्या काँग्रेसमध्ये नाहीत, मतदारसंघातील तेली समाजाच्या मतदारांची संख्या लक्षात घेऊन २००९ च्या निवडणुकीत अभिजित वंजारी यांना पक्षाने संधी दिली होती. ते पुन्हा लढण्यास तयार आहेत. नवीन चेहऱ्याचा विचार केला तर उमाकांत अग्निहोत्री, काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे, नगरसेवक पुरुषोत्तम हजारे, महापालिकेचे विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, अवंतिका लेकुरवाळे, संगीता तलमले, माजी महापौर नरेश गावंडे, श्रीकांत कैकाडे यांच्यापैकी एकाचा विचार पक्ष करू शकतो. दुसरीकडे शिवसेनेनेही या मतदारसंघावर दावा केला आहे. सेनेचा या भागात भाजपला असलेला विरोध सर्वश्रूत आहे. स्मार्टसिटी प्रकल्पग्रस्तांच्या मुद्यावरून या दोन पक्षात परस्परांवर आरोप, प्रत्यारोप सुरू आहेत. माजीमंत्री सतीश चतुर्वेदी यांचे पुत्र दुष्यंत यांनी शिवसेनेत प्रवेश करून येथून लढण्याची इच्छा दर्शवली आहे. शिवसेनेसाठी ही जागा सुटण्याची शक्यता कमीच असली तरी सेनेची साथही भाजपला मिळण्याची खात्री नाही. त्यामुळे सेनेच्या भूमिकेकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

विधानसभा निवडणूक- २०१४  (मिळालेली मते)

कृष्णा खोपडे (भाजप)-  ९९ हजार १३६

अभिजित वंजारी (काँग्रेस)- ५० हजार ५२२

दिलीप रंगारी (बसपा)-  १२ हजार १६४

दुनेश्वर पेठे (राष्ट्रवादी काँग्रेस)- ८ हजार ०६१

अजय दलाल (शिवसेना)- ७ हजार ८१