एका प्रकरणात आक्षेपार्ह मजकूर असल्याचा आक्षेप

लिंगभेदावर प्रखरतेने प्रकाश टाकणाऱ्या बी.ए. भाग-१मधील एका प्रकरणात आक्षेपार्ह मजकूर असल्याचे काही प्राध्यापकांना वाटत असून, या पुस्तकातील ‘व्हाय आय वॉन्ट अ वाईफ’ हे प्रकरण वगळण्यात यावे, असा कांगावा त्यांनी सुरू केला आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने या वर्षीपासून सत्र परीक्षा पद्धत सुरू केल्यावर अभ्यासक्रम तयार करण्याची मोठी कसरत अभ्यास मंडळांना करावी लागत आहे. त्यात बी.ए. भाग-१ च्या प्रथम सत्राच्या ‘कम्पल्सरी इंग्लिश’ हे पुस्तक अभ्यासाला आहे. त्यातील लघुकथा प्रकारात ‘व्हाय आय वॉन्ट अ वाईफ’ हे प्रकरण शिकवताना आम्हाला संकोच वाटतो. मुलींच्या वर्गावर शिकवताना ती संकल्पना कशी समजावून सांगावी, असा प्रश्न पडतो, असे मत व्यक्त केले आहे.

जुडी ब्रॅडी लिखित या लघुकथेत बायकोने कोणती कामे करावीत, याची जंत्रीच दिली आहे. ‘तिने नवऱ्याच्या सामाजिक जीवनाची, त्याच्या मुलांची काळजी घ्यावी. घर स्वच्छ ठेवावे, त्यांची योग्य तयारी करवून घ्यावी. घरी जर नवऱ्याचे मित्र आले, तर त्यांच्या पिण्याखाण्याची योग्य ती बडदास्त बायकोने ठेवावी, जेणे करून त्यांना अस्वस्थ वाटायला नको. म्हणजे, अगदी घरात वाईन, अ‍ॅस्ट्रे आहे किंवा नाही, याची खबरदारी घ्यावी, खूप मुले नकोत.

लैंगिक सुखासाठी नेहमीच तिने तत्पर रहावे आणि सदैव नवऱ्याप्रती विश्वासू असावे, तसेच तिने माझी लैंगिक गरज ओळखायला हवी आणि एकपतीव्रताचे तिने काटेकोर पालन करायला हवे. शिवाय, तिच्यापेक्षा दुसऱ्या एखाद्या सरस महिलेशी संबंध आल्यास तिचा आक्षेप नसावा’. वगैरे वगैरे अशा प्रकारे आक्षेपार्ह लिखाण असल्याचा कांगावा काही प्राध्यापकांकडून केला जात असतानाच महिलांच्या सक्षमीकरणावर भर द्यावा की, त्यांच्या लैंगिक सुखासंबंधी आम्ही विद्यार्थ्यांना सांगावे, असा त्यांचा आक्षेप आहे.

लघुकथा मस्त!

मात्र, त्याचवेळी इतर अनेक प्राध्यापकांनी या लघुकथेबाबत सकारात्मक मते नोंदवली आहेत. यात स्त्री-पुरुष असमानतेवर चांगला प्रकाश टाकला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. विद्यार्थ्यांना शिकवताना काहीही अडचणी येत नाहीत. उलट, ती मनोरंजनातून शिकवताना समाजातील एका महत्त्वपूर्ण समस्येला हात घातला जातो. आईचा आदर होताना बाईचा आदर का नाकारला जातो, असे प्रश्न आम्ही जेव्हा केवळ विद्यार्थिनींनाच नव्हे, तर विद्यार्थ्यांना विचारतो तेव्हा तेही अवाक्  होतात आणि समाजात ही दरी कायम आहे, हे मान्य करतात. महाविद्यालयीन मुले लहान नाहीत. त्यांना समाजातील चांगल्या वाईट गोष्टींविषयी कळत असल्याने लघुकथा मस्त असल्याचे समर्थन बऱ्याच प्राध्यापकांनी नोंदवले आहे.

कम्पल्सरी इंग्रजी हे पुस्तक फार मेहनतीने लिहिले गेले असून, त्यातील प्रत्येक शब्द न् शब्द संपादकीय मंडळाने पारखून घेतलेला आहे. त्यात एकही चूक नाही. शिवाय, समाजातील समस्या, माणुसकी, मूल्य यावर प्रकाश टाकणाऱ्या गोष्टीही आम्ही अभ्यासक्रमात घेतल्या आहेत. प्राध्यापकांकडे ते कसे शिकवावे याचे कौशल्य हवे. चार ओळी वाचून पूर्ण लघुकथा अयोग्य कशी ठरू शकते? प्राध्यापकांनी मोठे मन करून संबंधित लघुकथेचा अन्वयार्थ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावा

प्राचार्य डॉ. उर्मिला डबीर, केवलरामानी महिला महाविद्यालय