News Flash

रस्ता रुंदीकरणासह वाहतुकीची शिस्तही अपेक्षित

शहराची धमनी असलेले रस्ते कसे आहेत, यावरून त्या शहराची वाहतूक सुरळीत असते आणि कार्यक्षमतेतही वाढ होते.

वाहने भरपूर, रस्ते अरुंद
शहराची धमनी असलेले रस्ते कसे आहेत, यावरून त्या शहराची वाहतूक सुरळीत असते आणि कार्यक्षमतेतही वाढ होते. मात्र, नागपूर शहरात विशेषत: जुन्या शहरांमध्ये वाहनांची संख्या आणि अरुंद रस्ते यामुळे प्रचंड त्रास पादचारी आणि वाहनचालकांना होत आहे. शहराच्या अनेक भागात अजूनही अर्ध विकसित आणि अविकसित रस्ते आहेत. ‘स्मार्ट सिटी’मध्ये विनाअडथळा रस्त्यावर वाहनांना धावता यावे, यासाठी रस्ता रुंदीकरणासोबतच वाहतूक शिस्त लावले जाणे अपेक्षित आहे.
शहरातून एनएच-७ (वाराणसी-कन्याकुमारी) आणि एनएच-६ (मुंबई-संभलपूर-कोलकाता) हे महत्त्वाचे महामार्ग जातात. शहरात रिंग रोडवर वाहतूक सुरू असून आऊटर रिंग रोडचे अद्याप काम पूर्ण व्हायचे आहे. एका पाहणी अहवालात शहरात बाहेरील भागातील रस्ते रुंद आहेत. बाजाराकडे जाणारे अंर्तगत रस्ते आणि काही इतर रस्ते अरुंद आहेत. या रस्तांवरून वाहतूक मोठय़ा प्रमाणात होते आणि त्यामुळे वाहतूक ठप्प होते. शहरात पादचाऱ्यांसाठी अत्यल्प पदपथ आहेत, तसेच रस्ता ओलांडण्यासाठी पद्धत नियंत्रित आहे. सायकलिंगच्या सुविधेचा अभाव आहे. बाजारपेठेच्या परिसरात रस्त्यांचा दोन्ही बाजूला अनधिकृतपणे वाहने उभी केली जातात आणि हातठेलेचालक आणि दुकानदारांनी रस्त्यांवर अतिक्रमण केले आहे. रस्ते चिन्हांकित केलेले किंवा योग्यप्रकारे मार्किंग केलेले नसल्याने अपघात होत आहेत. १६ टक्के रस्त्यांवरील पदपथ चालण्यासारखे नाहीत आणि १३ टक्के रस्त्यांवर पदपथच नाहीत. ७५ टक्के रस्त्यांवर योग्य प्रकारची आखणी किंवा चिन्हांकित नाहीत. शहरातील ६० टक्के रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात आहेत. या रस्त्यांवर वाहने उभी केली जातात, तसेच विक्रेते, फेरीवाल्यांचे अतिक्रमण आहे.
पायी चालणाऱ्यांना नागपूरचे रस्ते धोकादायक आहेत. शिवाय, सायकल चालवणे देखील जिकरीचे काम आहे. सायकलचालकांशी संवाद साधला असता त्यांनी सायकल चालवताना येणाऱ्या अडचणी सांगितल्या. त्यात प्रामुख्याने वाहतूक मोठय़ा प्रमाण असणे, वाहनांची गती अधिक असणे, वाहनतळ, पादचारी आणि बसस्थानकांचा अडसर, रस्त्यांची वाईट अवस्था, सुयोग्य प्रकारची प्रकाशयोजना नसणे आणि चौक ओलांडताना अडचणी येत असल्याचे सांगितले. तसेच ७६ टक्के सायकलचालकांनी स्वतंत्र ‘सायकल ट्रॅक’ची आवश्यकता अधोरेखित केली.
शहरातील महत्त्वाचे रस्ते
अमरावती मार्ग, घाट रोड, मेडिकल चौकाकडे जाणारा अजनी मार्ग, सेन्ट्रल अव्हेन्यू, मानेवाडा रोड, सुभाष मार्गा, अयाचित मार्ग, अंबाझरी मार्ग, वर्धा रोड, नागरोड, पाचपावली मार्ग शहरात महापालिकेच्या मालकीचे १९४ विकसित रस्ते आहेत. ५५ रस्ते अर्धविकसित आहेत, तर ३८ रस्ते अविकसित आहेत. मंगळवारी झोनमध्ये सर्वाधिक १० झोन अर्धविकसित आहेत आणि लक्ष्मीनगर झोनमध्ये १४ रस्ते अविकसित आहेत. नागपूर सुधार प्रन्यासचे ९ रस्ते विकसित आहेत. ४६ रस्ते अर्धविकसित, तर ५८ रस्ते अविकसित आहेत. मंगळवारी झोनमध्ये सर्वाधिक १३ रस्ते अविकसित आहेत आणि लक्ष्मीनगर झोनमध्ये २२ रस्ते अविकसित आहेत.

व्हरायटी चौकात ३१ हजार लोक
शहरातील बहुतांश रस्ते पदपथविना आहेत. ज्या ठिकाणी त्यापैकी अधिकांक्षा पदपथांवर अतिक्रमणच झालेले आहे. यामुळे नागपुरातील रस्त्यांवर पायी चालणे कठीण आहे. मात्र, मुख्य बाजारपेठ असलेल्या व्हरायटी आणि झांशी राणी चौकात पायी चालणाऱ्यांची सर्वाधिक संख्या आहे. व्हरायटी चौकात दिवसभरात तब्बल ३१ हजार लोक पायी चालतात. झांशी राणी चौकात दिवसभर २६ हजार लोक पायी चालतात. व्हरायटी चौकात ऐन वर्दळीच्या एका तासात ३२०० लोक पायी चालतात.

पायी चालण्यासाठी पदपथ नाहीत, त्यायोग्य रस्तेही नाहीत. तरीही पायी चालत जात असलो तर मागून येणाऱ्या वाहनाची धडक बसेल, अशी भीती कायम मनात घर करून राहते. प्रत्येक वाहनाची गती प्रचंड असते. लोकसंख्या आणि वाहनांची संख्या या प्रमाणात रस्ते फार छोटे झाले आहेत. दुचाकी, चारचाकी वाहनधारकांना रस्त्यावर सायकलचालक नको आहे. सायकल मिळून वाहतुकीची कोंडी होईल किंवा वाहनांची गती कमी होईल, असे त्याला वाटते. सगळ्यांना रस्त्यावरून वाहने हाकताना फार घाई झाल्याचे दिसून येते. त्यामुळे पायी चालणे किंवा सायकल चालवणे शक्य होत नाही.
-आनंद कांबळे, रेल्वे कर्मचारी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 16, 2015 9:40 am

Web Title: widening of the road and traffic discipline expected in smart city
टॅग : Smart City
Next Stories
1 मागील वर्षीच्या घोषणांचे काय?
2 विविध मागण्यांसाठी वडेट्टीवार यांचे उपोषण अस्त्र
3 गोरेवाडा वन्यप्राणी बचाव केंद्राला अखेर मुहूर्त
Just Now!
X