04 March 2021

News Flash

जंगलांची संलग्नता, वन्यप्राण्यांच्या सुरक्षेचे वन खात्यापुढे आव्हान!

‘मेटिगेशन मेजर्स’वर गांभीर्याने विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून रेडिओ कॉलर केलेल्या वाघिणीने उमरेड-करांडला अभयारण्यात तब्बल ११० किलोमीटरचे अंतर (७०-८० किलोमीटर एरियल) पार करण्याची घटना आणि कोंढाळी-कळमेश्वर वनपरिक्षेत्रातून बोर व्याघ्र प्रकल्पात जात असताना एका वाघाचा झालेला मृत्यू, या दोन्ही घटनांमुळे पुन्हा एकदा जंगलाची संलग्नता आणि वन्यप्राण्यांची सुरक्षा याबाबत वनखात्यापुढे आव्हान उभे केले आहे. या दोन्ही घटनांमध्ये वाघिणीने राज्य महामार्ग आणि इतर अडथळे सुरक्षितरीत्या पार केले तर वाघाला मात्र राष्ट्रीय महामार्ग पार करताना जीव गमवावा लागला. त्यामुळे ‘मेटिगेशन मेजर्स’वर गांभीर्याने विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

एका व्याघ्र प्रकल्पातून दुसऱ्या अभयारण्यात प्रवेश करताना वाघिणीने कालवे, वीज ओळी, वैनगंगा नदी, मानवी वसाहत, राज्य महामार्गच नव्हे तर वीजप्रवाह सोडलेले शेतीचे कुंपण असा धोकादायक प्रवास केला. या वाघिणीला ‘रेडिओ कॉलर’ लावण्यात आली होती. कॉलर केलेल्या वाघाने एवढे लांब पल्ल्याचे स्थलांतरण करणे ही कदाचित पहिलीच घटना आहे. तरीही कॉलर लावले म्हणून स्थलांतरणादरम्यानच्या या धोकादायक प्रवासाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण, श्रीनिवास या कॉलर लावलेल्या वाघाचा मृत्यू होऊनही वनखात्याला माहिती पडले नाही. तर कॉलर लावलेल्या बेपत्ता ‘जय’बाबत (कदाचित मृत) वनखात्याकडे दोन वर्षे पूर्ण होत असूनही उत्तर नाही. त्यामुळे या वाघिणीचे स्थलांतरण सुरक्षित झाले असले तरीही भ्रमणमार्ग, जंगलाची संलग्नता तसेच यादरम्यानचे राज्य, राष्ट्रीय महामार्ग, नद्या, कालवे, रेल्वेलाइन, वीजलाइन आदींचा विचार करून ‘मेटिगेशन मेजर्स’बाबत गंभीर व्हावे लागणार आहे. वाघांच्या सुरक्षिततेबरोबरच त्यांच्या संचारमार्गाची सुरक्षितता याचाही अभ्यास होणे गरजेचे आहे.

वाघ किंवा इतर वन्यप्राणी कोणत्या मार्गावरून जातात याचा अभ्यास करून आम्ही ‘मेटिगेशन मेजर्स’ तयार केले, पण निसर्ग विसरलो.

कारण अनेक गोष्टी अशा आहेत, ज्या आपण ठरवू शकत नाही. सातत्याच्या निरीक्षणातून वन्यप्राण्यांच्या स्थलांतरणाची पद्धती अभ्यास करता येते. तरीही जंगल आणि जंगलाला लागून असे अनेक क्षेत्र आहेत, ज्या ठिकाणाहून वाघ जाणे-येणे करतात, असे वाघ स्थलांतरण अभ्यासक सावन बाहेकर यांनी सांगितले.

वाघ स्थलांतरणाच्या ताज्या घटना

  • २०१०-२०११ न्यू नागझिरा अभयारण्यातील ‘प्रिन्स’ या वाघाने पेंच व्याघ्र प्रकल्पात स्थलांतर केले.फेब्रुवारी २०१३ मध्ये न्यू नागझिरा अभयारण्यातून ‘अल्फा’ या वाघिणीने मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्हय़ातील वारासिवनी येथे स्थलांतर केले.
  • जुलै-ऑगस्ट २०१३ मध्ये नागझिरा अभयारण्यातला ‘जय’ या वाघाने उमरेड-करांडला अभयारण्यात स्थलांतर केले. नोव्हेंबर-डिसेंबर २०१४ मध्ये न्यू नागझिरा अभयारण्यातून नवेगाव अभयारण्यात ‘कानी’ या वाघिणीने स्थलांतरण केले.’ २०१५-१६ मध्ये ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातून नागझिरा अभयारण्यात एका वाघाने स्थलांतर केले.जानेवारी २०१७ मध्ये कळमेश्वर-कोंढाळी या राखीव वनक्षेत्रातून पोहरा-मालखेडच्या जंगलात ‘नवाब’ या वाघाने स्थलांतर केले.
  • कळमेश्वर-कोंढाळी येथूनच बोर व्याघ्रप्रकल्पात एका वाघाने स्थलांतर केले. मे २०१७ मध्ये उमरेड-करांडला अभयारण्यातून ‘बली’ या वाघाने मानसिंगदेव अभयारण्य गाठले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2018 2:41 am

Web Title: wild animal security issue tadoba andhari tiger project
Next Stories
1 वाधवावर फास आवळ्याने ‘एसआयटी’ गुंडाळली?
2 पोलिसांचा चोख बंदोबस्त, सीआरपीएफच्या तुकडय़ा मागवल्या
3 शिधापत्रिकांनाही पोर्टेबिलिटीची सोय
Just Now!
X