जंगलातील पाणवठे कोरडे, प्राणी मानवी वस्त्यांकडे

राखी चव्हाण, नागपूर</strong>

जंगलातील पाणवठे आटल्याने तहानेने व्याकूळ झालेले वन्यप्राणी मानवी वस्त्यांकडे धाव घेत असून अशाच प्रकारे पाण्याच्या शोधात भटकणाऱ्या काही प्राण्यांचे मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. पेंच आणि मेळघाटात वाघ आणि रानगव्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

राज्यात यंदा उन्हाळ्याने बराच काळ ठाण मांडल्याने आणि मोसमी पाऊस लांबल्याने तापमानाने अनेक विक्रम केले आहेत. आधीच दुष्काळी परिस्थिती, त्यात नद्या, नाले कोरडे पडले आहेत. त्यामुळे अनेक जिल्ह्य़ांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे, पण आता टँकरसाठी पाणी कुठून आणायचे, असा प्रश्न स्थानिक प्रशासनासमोर आहे. जंगलातील पाणवठय़ांची स्थिती मानवी वस्त्यांपेक्षाही वाईट आहे. नैसर्गिक पाणवठे कधीच कोरडे पडले आहेत. तर कृत्रीम पाणवठय़ांमध्ये पाणी कुठून टाकायचे असा प्रश्न आवासून आहे.

दरवर्षी जंगलातील कृत्रिम पाणवठय़ांची जबाबदारी स्वयंसेवी संस्था घेतात. यावेळचा दुष्काळ तीव्र असल्याने स्वयंसेवी संस्थांचे प्रयत्नही अपुरे पडत आहेत. परिणामी वन्यप्राणी पाण्याच्या शोधात मानवी वस्त्यांकडे धाव घेऊ लागले आहेत. त्यातून मनुष्य-वन्यजीव यांच्यातील संघर्षांच्या घटना वाढू लागल्या आहेत. एकीकडे हे असे चित्र असताना तहानेने तडफडून वन्यप्राण्यांचे मृत्यू होत असल्याने वनखात्याच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ही समस्या दरवर्षी उद्भवत असताना कायमस्वरूपी उपाययोजना का केली जात नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

गेल्या वर्षी गोंदिया जिल्ह्य़ात पाण्याअभावी एकापाठोपाठ एक नऊ रानगव्यांचा मृत्यू झाला होता. या वर्षीही त्याच ठिकाणी रानगवे मृत्युमुखी पडले आहेत. गावातील पाणीसाठे आटल्याने गावकरी त्यांच्या जनावरांना जंगलातील पाणवठय़ांवर आणतात. त्यामुळे रात्री पाणवठय़ांवर येणाऱ्या वन्यप्राण्यांना पाणी मिळत नाही. रानगव्यांना वेळेत पाणी मिळाले नाही तर त्यांना उष्माघात लवकर होतो आणि ते दगावतात. यंदाही तसेच झाले. याच ठिकाणाहून काही अंतरावर माकडांचा एक कळपच मृत्युमुखी पडला होता.

पेंच व्याघ्र प्रकल्पात यावर्षी उन्हाळ्याच्या सुरुवातीला आणि अलीकडेच काही दिवसांपूर्वी पाणवठय़ाजवळच दोन वाघांचा मृत्यू झाल्याचे आढळले. एक वाघ पाण्याच्या शोधासाठी दलदलीत रुतल्याने त्याचा मृत्यू झाला होता तर दुसऱ्या वाघानेही त्याच ठिकाणाजवळ तहानेने तडफडून प्राण सोडल्याचे आढळले.

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातही नैसर्गिक पाणवठय़ावर वाघाचा मृत्यू झाला. पाण्यासाठी भटकंतीत जंगलाबाहेरच नाही तर जंगलातही वन्यप्राण्यांचा मृत्यु होत आहे. त्याचबरोबर पाण्याच्या शोधात रस्ता ओलांडून जाताना वाहनाखाली येऊन वन्यप्राण्यांचा मृत्यु झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या जंगलात प्रामुख्याने असे प्रकार घडत आहेत. गेल्या वर्षी राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्पात पाण्याच्या शोधात भटकणाऱ्या बिबटय़ाचा वाहनाखाली येऊन मृत्यू झाला होता.

मृत्यूस जबाबदार कोण?

या वर्षी वाघांच्या मृत्यूने जंगलातील कोरडय़ा पाणवठय़ाच्या प्रश्नाची भीषणता जाणवू लागली आहे. वनविभाग नैसर्गिक पाणवठय़ाचे पुनरुज्जीवन करण्याऐवजी कृत्रिम पाणवठय़ाच्या निर्मितीवर भर देत आहे. अनेकदा हे कृत्रिम पाणवठय़ांमध्ये पाणी आणले जात नाही. त्यामुळे पाण्याअभावी होणाऱ्या वन्यप्राण्यांच्या मृत्यूची जबाबदारी नेमकी कुणाची असा प्रश्न आहे.