डब्ल्यूसीटीची ‘सिटीझन सायन्स’ मोहीम

रस्ते आणि रेल्वेमार्गावरील अपघातांत गेल्या काही वर्षांत भारतात किमान १६ वाघांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. एवढेच नव्हे तर गेल्या आठ-दहा वर्षांत देशातील रेल्वे मार्ग ओलांडताना दीडशेहून अधिक जंगली हत्ती मरण पावल्याचेही निदर्शनास आले आहे. शिकार, वणवा, अधिवासात घट अशा अनेक बाबींनी आधीच वन्यजीवांची संख्या कमी होत असताना रस्ता आणि रेल्वे यासारखे मानवनिर्मित पायाभूत सुविधा प्रकल्प त्यांच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरत आहेत. हे मृत्यू रोखण्यासाठी वाईल्डलाईफ कन्झर्वेशन ट्रस्टने ‘सिटीझन सायन्स’ ही मोहीम सुरू केली आहे.

रस्त्यावर मृत्यू होणाऱ्या ९९ टक्के वन्यप्राण्यांचे मृत्यू नोंदवलेच जात नाहीत. वाघ आणि हत्तीसारख्या मोठय़ा वन्यप्राण्यांच्या मृत्यूची नोंद होते, पण हजारो दुर्मिळ, लुप्त होणारे पक्षी, उभयचर, लहान सस्तन प्राणी आणि सरपटणारे प्राणी मृत्युमुखी पडतात. त्यांची नोंदच केली जात नाही. सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये कोब्रा, अजगर, तर नष्ट होणाच्या मार्गावर असलेले घुबड आणि इतरही प्राणी रस्ते अपघातात मृत्युमुखी पडतात. याशिवाय इतर सस्तन प्राण्यांमध्ये बिबट, अस्वल, रानकुत्रे, माकड, तृणभक्षी प्राण्यांमध्ये हरीण, चितळ, नीलगाय, सांबर या प्राण्यांचे रस्ते अपघातात मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. मानवी लोकसंख्येत होणारी वाढ आणि  प्रगतीमुळे अधिक रस्ते आणि रेल्वेमार्गाची आवश्यकता वाढत आहे. हे वाढणारे रस्ते आणि रेल्वेचे जाळे अनेकदा जंगलातून जातात. त्यामुळे सलग जंगलाचे विभाजन होते आणि या विभाजित जंगलातील एका भागातून दुसऱ्या भागात जाताना कधी रेल्वेखाली, तर कधी वाहनाखाली येऊन हे प्राणी मृत्युमुखी पडतात.

वाईल्डलाईफ कन्झर्वेशन ट्रस्टच्या सिटीझन सायन्स या मोहिमेच्या माध्यमातून नागरिकांकडून  रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्या वन्यजीवांची माहिती गोळा केली जाईल. इतर वन्यजीव संवर्धन संस्थांनीही यात सहभाग घ्यावा, असे आवाहन वाईल्डलाईफ कन्झर्वेशन ट्रस्टचे अध्यक्ष अनिश अंधेरिया म्हणाले.

वन्यजीव रस्त्यात मृत्युमुखी पडण्याचे मुख्य कारण रस्ते आणि रेल्वेमार्गाचा नियोजित विकास आहे. रोडकिल सिटीझन सायन्स मोहिमेच्या माध्यमातून वन्यजीवांचे अशाप्रकारे रस्त्यात होणारे मृत्यू रोखण्यासाठी मदत होईल, असे मिलिंद परिवक्कम म्हणाले.