उद्योगधंद्यांऐवजी वन्यप्राण्यांचीच गर्दी; मोकळ्या रानावर झाडे-झुडपे वाढली

नागपूर : उपराजधानीतील मिहान-सेझ हा परिसर विकासाचा एक दीपस्तंभ ठरेल, जगभरातून लोक येथे प्रगतीचे मॉडेल बघायला येतील, असा दावा सत्ताधारी करीत होते. परंतु त्याच मिहानची वाटचाल आज अभयारण्याच्या दिशेने सुरू झाली आहे. येथे यंत्रांची धडधड ऐकू येण्याऐवजी वाघांच्या डरकाळ्या ऐकू यायला लागल्या आहेत. जिथे टोलेजंग कारखाने उभे राहणार होते, तिथे झाडे-झुडपे वाढलेली दिसत आहेत.

उद्योगधंदे वाढीस लागून विदर्भातील युवकांना रोजगार मिळावे म्हणून वर्धा मार्गावरील हजारो एकर जमिनीवर मिहान-सेझ प्रकल्प सुरू करण्यात आला. १२ वर्षांहून अधिक काळ लोटला मात्र, तेथे हवे त्याप्रमणात उद्योधंदे आले नाहीत. ज्यांनी भूखंड घेतले, त्यांनी उद्योग उभारले नाहीत. त्यामुळे मोकळ्या  जमिनीवर झाडे-झुडपे तयारी झाली आणि आता हा परिसर उद्योगधंद्याऐवजी वन्यप्राण्याचा अधिवास होऊ पाहतो आहे. त्यामुळे मिहान-सेझ हे अभयारण्य म्हणून घोषित करण्याची वेळ येते की काय, अशी भीती निर्माण झाली आहे.

मिहान (मल्टिी मॉडेल इंटरनॅशनल हब एअरपोर्ट एट नागपूर) प्रकल्प आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवासी आणि काबरे हब करण्याची संकल्पना आहे.

तसेच विमानतळाशेजारी बहुविध उत्पादन होणारे विशेष आर्थिक क्षेत्र आहे. या प्रकल्पाला महाराष्ट्र सरकारने ४ जानेवारी २००२ ला मान्यता दिली. भारत सरकारने जानेवारी २००८ ला प्रकल्प मंजूर केला. या प्रकल्पाचा अविभाज्य अंग काबरे हब असून  त्यासाठी किमान दोन धावपट्टय़ा आवश्यक आहेत. त्या तयार होऊ शकलेल्या नाहीत. मिहान प्रकल्पात सेझ आणि नॉन सेझ हे भाग आहेत. या प्रकल्पाकरिता ४ हजार २०० हेक्टरमध्ये जमीन संपादित करण्यात आली. यातील १ हजार ३६० हेक्टर विमानतळासाठी आहे. सेझ सुमारे २ हजार हेक्टर आणि सेझबाहेरील परिसर सुमारे १ हजार हेक्टर आहे.

प्रकल्प सुरू करताना सन २०१८ पर्यंत १ लाख २० हजार तरुणांना थेट नोकऱ्या उपलब्ध होतील, असे सांगण्यात आले होते. पण, सेझमध्ये मोठी गुंतवणूक झाली नाही. अनेक कंपन्यांनी शेकडो एकर जमीन  घेऊन ठेवली. परंतु उद्योग लावले नाहीत. खापरी, शिवणगाव, तेल्हारा, कलकुही या गावाच्या शेतकऱ्यांच्या जमिनींचे अधिग्रहण झाले. पंरतु त्यावर उद्योगधंदे आले नाहीत. त्यामुळे गेल्या दीड दशकात येथे झुडपांचे साम्राज्य वाढले आहे.

‘फेटरी पॅटर्न’चा आधार

काही महिन्यांपूर्वी फेटरी येथेही अशीच परिस्थिती उद्भवली होती. त्यावेळी देखील गावकरी आणि वनखात्याचे अधिकारी, कर्मचारी यांच्यात अनेकदा चर्चा घडून आली. त्यानंतर फेटरी परिसरातील गावांमधील काही प्रमुखांना नागपूर येथे बोलावण्यात आले. सेमिनरी हिल्सवरील वनसभागृहात त्यांना प्रशिक्षण देण्यात आले. वनखाते आणि गावकऱ्यांमधील समन्वयामुळे फेटरीत कोणतीही अनुचित घटना घडली नाही. वाघ देखील जंगलाच्या दिशेने रवाना झाला. याठिकाणी सुद्धा त्याच पद्धतीने वाघाला जंगलाच्या दिशेने पाठवण्याचा वनखात्याचा प्रयत्न सुरू असल्याचे मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते यांनी सांगितले.

सलग पाच दिवसांपासून मिहान परिसरात वास्तव्य करणाऱ्या वाघाने आता बुटीबोरीच्या दिशेने कूच केले आहे. सोमठाणा गावाच्या दिशेने वाघाच्या पाऊलखुणा आढळल्या आहेत. जंगलाकडे जाणारा त्याचा मार्ग गावातून जात असल्याने बुधवारी प्रादेशिक वनविभागाचे उपवनसंरक्षक डॉ. प्रभूनाथ शुक्ल, वनपरिक्षेत्र अधिकारी तसेच वन्यजीव अभ्यासक विनीत अरोरा आणि गावकरी यांच्यात रात्री उशिरापर्यंत बैठक पार पडली. वाटेत अनेक गावे असल्याने बुधवारी सोमठाणा येथे गावकऱ्यांना खबरदारीच्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली.

‘‘युवकांना रोजगार मिळू शकेल, असा कोणताही उद्योग राज्य आणि केंद्र सरकारने पाच वर्षांत मिहानमध्ये आणला नाही. कार्गो हब होऊ शकले नाही. अनेकांनी जमिनी घेतल्या, पण उद्योग लावले नाही. शेकडो एकर जमीन मोकळी ठेवून मिहान-सेझला अभयारण्य बनवण्याचे काम पाच वर्षांत झाले आहे.’’

– नितीन राऊत, काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष.