विदेशात प्रत्येक धर्माची श्रद्धास्थाने आणि त्याकडे जाणारे मार्ग चांगले असताना आपल्याकडील अनेक गावातील मंदिरे आणि इतर धर्माच्या श्रद्धास्थानांचा विकास करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उत्तराखंडसह महाराष्ट्रातील देहू, पंढरपूर, आळंदी या मार्गावरील रस्त्यांचा विकास करण्यात येणार असल्याचे सांगितले.
संत गजानन महाराजांचे निस्सीम भक्त व प्रचारक संतकवी कमलासुत यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी ‘अर्पितो गुरुवंदना’ या सीडीची निर्मिती करण्यात आली असून याचे प्रकाशन नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल, संगीतकार नंदू होनप, महापौर प्रवीण दटके, आमदार सुधाकर कोहळे, रवी पुट्टेवार, गिरीश वराडपांडे उपस्थित होते.
उत्तरांखडमध्ये मोठय़ा प्रमाणात धार्मिक स्थळे आहेत. तेथे महापुरानंतर बरीच मनुष्यहानी झाली होती. रस्ते खराब झाले होते. त्या भागात रस्त्यांची मोठी समस्या असून १२ हजार कोटी रुपये त्या भागातील रस्त्यांवर खर्च करण्यात येणार असून त्यातील ८०० कोटींची कामे सुरू करण्यात आली. महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात वारकरी देहू, आळंदीहून पंढपूरला जातात, त्यामुळे त्या मार्गावर रस्त्यांची कामे करून ती चांगली करण्यात येणार आहेत. आपल्याकडील विविध धमार्ंची श्रद्धास्थाने चांगली असली पाहिजे. त्यासाठी प्रत्येकाने लक्ष देण्याची गरज आहे. चंद्रशेखर वराडपांडे यांचे जीवन गजानन महाराजांसाठी समर्पित होते. सेवाभावी जीवन जगताना त्यांनी धार्मिक साहित्यसंपदा निर्माण केली. अनेक लोक मंदिराचे घर करतात. मात्र, वराडपांडे यांनी घराचे मंदिर केले आणि ते मंदिर हजारो भक्तांना प्रेरणा देत आहे. सेवा हा धर्म समजून सेवा करण्याचे काम करीत आहे. समाजातील दिव्यांगांसाठी साहित्य उपलब्ध करून देणे ही सेवा आहे आणि त्यातून आनंद मिळतो, असेही ते म्हणाले. यावेळी अनुराधा पौडवाल आणि नंदू होनप यांची भाषणे झाली. प्रास्ताविक गिरीश वराडपांडे यांनी केले.