सुरक्षेचा आढावा घेतल्यानंतर पोलीस आयुक्तांची ग्वाही

नागपूर : न्यायमंदिरात वकिलाकडून न्यायाधीशावर झालेल्या हल्ल्याची दखल घेऊन पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी जिल्हा व सत्र न्यायालयाला भेट देऊन परिसरातील सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीशांशी चर्चा करून परिसरातील अधिक कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यासाठी कर्मचारी वाढवण्याची ग्वाही दिली.

तीन दिवसांपूर्वी दीपेश पराते या सरकारी वकिलांनी वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश के. आर. देशपांडे यांना मारहाण केली. तेव्हा न्यायमंदिर परिसरातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले. त्यामुळे शुक्रवारी दुपारी ३.३० वाजता पोलीस आयुक्तांनी न्यायमंदिर परिसरातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. त्यांच्यासोबत  अतिरिक्त पोलीस आयुक्त बी.जी. गायकर, ग्रामीण पोलीस अधीक्षक राकेश ओला, उपायुक्त चिन्मय पंडित, गुन्हे शाखा उपायुक्त संभाजी कदम, उपायुक्त गजानन राजमाने, सहाय्यक आयुक्त विजय मराठे आदी अधिकारी उपस्थित होते. यावेळी पोलीस आयुक्त  इमारतीच्या चारही बाजू बघितल्या. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोरेश्वर बारापात्रे, प्रदीप डोंगरे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. बी. सावळे यांच्यासोबत सातव्या मजल्यावर आढावा बैठक घेतली. त्यावेळी न्यायाधीशांकरिता दोन स्वतंत्र लिफ्ट असून एक बंद आहे. त्यामुळे एकाच लिफ्टचा वापर सुरू असून त्यामध्येही वकिलांचे अतिक्रमण होत असल्याचा प्रकार समोर आला. त्यावेळी न्या. सावळे यांनी काही ठराविक वेळेत ती लिफ्ट न्यायाधीशांकरिताच असावी, अशी विनंती केली.

आरोपींना थेट न्यायमंदिरापुढे आणण्याचा प्रयत्न

कारागृहांमधून दररोज शेकडो आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येते. त्यांना घेऊन येणारी वाहने न्यायमंदिर इमारतीच्या दर्शनी भागात रस्त्यावर थांबतात व पोलीस पायी आरोपींना न्यायालयात घेऊन जातात. यावर आयुक्तांनी चिंता व्यक्त करून आरोपींवर बाहेर हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी शंका उपस्थित करून आरोपींना न्यायालयात घेऊन येणाऱ्या पोलिसांची वाहने थेट आतमध्ये दाखल होतील, याची व्यवस्था करण्याचे निर्देश संबंधितांना दिले.

पोलीस ठाण्यांत वातानुकूलित यंत्र

पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांची सेवा बारा तास असते. बाहेरून आल्यावर विश्रांतीसाठी पोलीस कर्मचारी पोलीस ठाण्यात येतात. पोलीस ठाण्यात एक खोली अधिकारी व कर्मचाऱ्यांना बसण्याकरिता असते व महिलांकरिता स्वतंत्र खोली असते. या खोल्यांमध्ये वातानुकूलित यंत्र (एसी) बसवण्यात येईल, असे पोलीस आयुक्तांनी सांगितले.