‘मेट्रो’च्या उद्घाटनाप्रसंगी मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

नागपूर :  नागपूरच्यादृष्टीने महत्त्वाचे असलेले ब्रॉडगेज मेट्रो आणि मेट्रो टप्पा-दोन या प्रकल्पांच्या प्रस्तावांना तातडीने मंजुरी दिली जाईल, राज्याची उपराजधानी नागपूरला विकासात मागे पडू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

मेट्रोच्या ११ किलोमीटरच्या अ‍ॅक्वालाईन (बर्डी ते लोकमान्यनगर) मार्गाचे उद्घाटन मंगळवारी मुंबईहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते तर दिल्लीहून केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास खात्याचे राज्यमंत्री  हरदीपसिंह पुरी यांच्या हस्ते व्हीडीओ लिंकद्वारे करण्यात आले. यावेळी ठाकरे बोलत होते. नागपूरमध्ये  सुभाषनगर स्थानक परिसरात हा उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री अनिल देशमुख, पालकमंत्री नितीन राऊत, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार,  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महापौर संदीप जोशी, केंद्रीय नगरविकास खात्याचे सचिव व्ही.जी. मिश्रा आणि महामेट्रोचे प्रबंध संचालक ब्रिजेशकुमार दीक्षित उपस्थित होते.

उद्घाटनापूर्वी झालेल्या भाषणात देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी यांनी ब्रॉडगेज मेट्रो आणि मेट्रो टप्पा-२ या प्रस्तावांचा उल्लेख केला.  हे प्रस्ताव यापूर्वी राज्य सरकारने मंजूर करून केंद्राकडे पाठवले होते. केंद्राने जुजबी दुरुस्तीसाठी पुन्हा राज्य सरकारकडे परत पाठवले आहे.

एका गाडीत नव्हे, पण एका स्टेशनवर आलो!

आपल्या भाषणादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला टोले लगावले. ‘आपण एका गाडीत बसू शकलो नाही, पण एका स्टेशनवर आलो आहे. यापुढे राज्य व केंद्र सरकारने मिळून काम केले तर महाराष्ट्र-दिल्ली विकासाची मेट्रो सुरू करू शकू’ असे मुख्यमंत्री म्हणाले. नागपूर मेट्रोचे कौतुक खूप ऐकले. लवकरच नागपूरमध्ये येऊन मेट्रोतून प्रवास करणार, असेही ठाकरे म्हणाले. मुंबई-पुणे द्रूतगती महामार्गाच्या कामाबद्दल ठाकरे यांनी गडकरी यांचे कौतुकही केले.