News Flash

महिन्याअखेर ‘हुडहुडी’ भरणार

डिसेंबरची अखेर असतानासुद्धा कडाक्याच्या थंडीने पाठ फिरवल्यामुळे थंडीची उत्सुकता असणारे

हवामान खाते व अभ्यासकांचे संकेत
डिसेंबरची अखेर असतानासुद्धा कडाक्याच्या थंडीने पाठ फिरवल्यामुळे थंडीची उत्सुकता असणारे आणि थंडीच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांना अचंभित केले आहे. मात्र, ही प्रतीक्षा आता संपण्याच्या मार्गावर असून डिसेंबरची अखेर का होईना हुडहुडी भरवणाऱ्या थंडीच्या आगमनाचे संकेत हवामान खाते आणि अभ्यासकांनी दिले आहेत. विदर्भात विशेषत: नागपुरात किमान तापमान १० अंश सेल्सिअसच्याही खाली जाण्याचे दाट संकेत आहेत.
दिवाळीनंतर साधारपणे थंडीला सुरुवात होते. नोव्हेंबरच्या मध्यात पहाटेच्यावेळी गुलाबी थंडीचा अनुभव सारेच घेतात आणि रात्रीच्यावेळी थंडीचा कडाकाही अनुभवतात. याच काळात गल्लोगल्ली शेकोटय़ाही पेटलेल्या दिसतात. यावेळी मात्र अजूनपर्यंत असे काहीच चित्र ना नागपुरात दिसून आले, ना विदर्भात असे काही चित्र दिसून आले. त्यामुळे ज्यांना ही हुडहुडी भरवणारी थंडी अनुभवायची असते, त्यांची पार निराशा झाली. डिसेंबरच्या मध्यापासून थंडीचा लपंडाव सुरू आहे. तापमान ११अंशापर्यंत आल्यानंतर पुन्हा तापमानाने उसळी घेतली आणि १८ अंशापर्यंत ते पोहोचले.
थंडीची प्रतीक्षा आता संपायला आली असून थंडीची ही लाट परतण्याचे संकेत हवामान खाते तसेच अभ्यासकांनीही दिलेले आहेत. महाराष्ट्रात पुणे, नाशिक येथे कडाक्याची थंडी पडायला सुरुवात झाली आहे. नाशिकमधील किमान तापमान ६ अंश सेल्सिअसच्याही खाली गेले. हीच थंडीची लाट आता विदर्भातही येऊ घातली असून, किमान तापमान १० अंश सेल्सिअसपेक्षाही कमी होणार आहे. विशेषत: येत्या २६ डिसेंबपर्यंत ही कडाक्याची थंडी अधिकच अनुभवता येणार आहे. त्यामुळे गल्लोगल्ली न पेटलेल्या शेकोटय़ा आता पेटलेल्या बघायला मिळतील. रस्त्यावर जगणाऱ्यांसाठी थंडीपासून बचावाचा तो एकमेव उपाय आहे. तरीही ही शेकोटी आता सर्वानाच हवीहवीशी वाटायला लागली आहे. मोठमोठय़ा घरांमध्येही आता शेगडय़ा पेटवण्याची पद्धत रुढ होऊ पाहात आहे. आतापर्यंत रात्री आणि पहाटे थंडी आणि दिवसा उन्हं असे वातावरणाचे रूप बघायला मिळत होते. आता दिवसाही ऊबदार कपडे घालूनच बाहेर पडावे लागणार आहे.
गेल्या ५० वर्षांत पहिल्यांदाच ‘अलनिनो’चा एवढा मोठा परिणाम जाणवला असून समुद्रातील पाणीही उष्ण आहे. त्यामुळे सारखे बाष्पीभवन आणि वातावरणही ढगाळ झाले आहे. एकूणच जागतिक पातळीवर तापमानात मोठय़ा प्रमाणात बदल घडून आले. चीन आणि रशियातसुद्धा तापमान सात अंश सेल्सिअसपर्यंत आहे.
याकाळात त्या ठिकाणी तापमान उणे २५ इतके असते. रशियात या काळात बर्फ साचायला हवा होता, पण त्याठिकाणी बर्फ वितळत आहे. गेल्या वर्षी चीन आणि रशियात थंडीची वादळे होती. २०१० पासून तापमान सातत्त्याने वाढत असून यावर्षी २०१५ मध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे, असे हवामान अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 24, 2015 8:42 am

Web Title: winter arrival in nagpur
टॅग : Nagpur
Next Stories
1 सहिष्णू देशात काहीही सहन करायचे का?
2 विदर्भ, मराठवाडय़ात उद्योगांना कमी दरात वीज देणार
3 नक्षलवादी साईबाबाचा जामीन उच्च न्यायालयाने फेटाळला
Just Now!
X