पावसामुळे गारठा वाढला; फुटाळा तलावावर तरुणाईची गर्दी

उपराजधानीत गुरुवारी सकाळी महाबळेश्वर, चिखलदऱ्यासारखी दाट धुक्याची चादर पसरली होती. बुधवारी रात्री झालेल्या पावसामुळे दिवसभर हवेत गारठा जाणवत होता. त्यामुळे थंड हवेच्या पर्यटनस्थळासारखी सुखद जाणीव नागपूरकरांना होत होती.

पावसाळ्याची सुरुवात यावर्षी उशिरा झाली आणि अखेरच्या काही दिवसात पाऊस धो-धो कोसळला. त्यामुळे दिवाळीनंतरच थंडी पडणार हे अपेक्षित होते. डिसेंबरच्या उत्तरार्धात गुलाबी थंडीची चाहूल लागली असतानाच वातावरण अचानक बदलले. वातावरणातील गारठा वाढत असताना आणि थंडीचा पारा कमीकमी होत असतानाच अचानक वातावरण बदलले. बुधवारी दुपारपासूनच वातावरणात बदल सुरू झाला होता. ढगाळी वातावरण आणि सगळीकडे अंधार पसरला. सायंकाळी सहा वाजल्यापासूनच शहरातील अनेक भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. आज गुरुवारी पहाटे पावसाने चांगलाच वेग घेतला. सकाळी सात-आठच्या सुमारास पाऊस थांबला, पण महाबळेश्वर, चिखलदरा या पर्यटनस्थळासारखे वातावरण नागपुरात तयार झाले. सगळीकडे धुक्याची चादर पसरली. दाट धुक्यात पायवाटांसह रस्तेही हरवल्याचे जाणवत होते. हवेत चांगलाच गारठा होता. पावसामुळे सकाळच्या प्रहरी फिरायला जाणाऱ्यांना घरीच थांबावे लागले. काहींनी मात्र बदललेल्या वातावरणाचा आनंद घेतला. दाट धुके आणि सुखद गारठय़ाने अनेकांची पावले फुटाळा चौपाटीकडे वळली. विशेषकरून तरुणाई या बदललेल्या वातावरणाचा आनंद घेताना दिसून आली. हे बदललेले वातावरण काही काळ सुखावणारे असले तरी आरोग्यावर या वातावरणाचा वाईट परिणाम होण्याचीही शक्यता आहे.

गार वाऱ्यांचा परिणाम

शहरातील वातावरणात गारठा जाणवत असला तरीही किमान तापमान मात्र २०.६ अंश सेल्सिअस इतके होते. काही दिवसांपूर्वी शहरातील किमान तापमान १० ते ११ अंश सेल्सिअसदरम्यान आले होते. त्यामुळे तापमान कमी झाले असल्याचे वाटत असले तरीही प्रत्यक्षात तसे नाही. गार वाऱ्याचा तो परिणाम आहे. शुक्रवार २७ डिसेंबपर्यंत ही स्थिती कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.