हिवाळी अधिवेशन मुंबईतच होणार
नागपूर : एक डिसेंबरपासून नागपुरात प्रस्तावित विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आता सात डिसेंबरपासून मुंबईतच घेण्याचा निर्णय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत झाल्याने अधिवेशनाच्या तयारीत व्यस्त सरकारी यंत्रणा आणि पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. अधिवेशनाच्या निमित्ताने होणाऱ्या गर्दीमुळे करोनाची साथ पसरण्याचा धोका वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला होता, हे येथे उल्लेखनीय.
करोनासाथीच्या पार्श्वभूमीवर नागपुरात अधिवेशन घेऊ नये, असा सूर होता. साथ जोरात असताना राज्यातील सर्वाधिक बाधित शहरांमध्ये नागपूरचा समावेश होता. आताही साथ संपली नाही. ९ नोव्हेंबपर्यंत शहरात बाधित रुग्णांची संख्या १ लाख ५ हजार १४५ होती. अजूनही दिवसाला १०० ते २०० बाधित सापडत आहेत. मृत्यू दर २.९१ इतका आहे. या पार्श्वभूमीवर विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात घेतले तर कमी झालेला करोना संसर्ग आणखी वाढण्याचा धोका आहे, याकडे वैद्यकीय यंत्रणेने सरकारचे लक्ष वेधले होते. विधिमंडळ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या आढवा बैठकीतही ही बाब ठासून सांगण्यात आली होती.अधिवेशनाच्या निमित्ताने मंत्रालयाची संपूर्ण यंत्रणा नागपूरमध्ये हलवण्याचे मोठे आव्हान करोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनापुढे होते. मुंबईतून येताना कर्मचारी बाधित झाले तर? हा प्रश्न होताच. त्यामुळे सरकारचा कलही अधिवेशन मुंबईतच घेण्याकडे होता. स्थानिक यंत्रणेनाही अनुकूल नव्हती. या सर्वाचा विचार करून अधिवेशन मुंबईतच घेण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या कामकाज सल्लागार समितीने घेतला. अधिवेशन काळात मोर्चे, आंदोलने मोठय़ा प्रमाणात होतात. यानिमित्त संपूर्ण राज्यातील लोक नागपुरात येतात. यासोबतच अधिवेशनासाठी राज्यभरातील पोलीस आणि सरकारी कर्मचाऱ्यांना येथे बोलवले जाते. या सर्वाची करोना चाचणी करणे अवघड काम होते. त्याचा भार स्थानिक आरोग्य यंत्रणेवर आला असता.
सध्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका असून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. निवडणूक कार्यात संपूर्ण सरकारी यंत्रणा व्यस्त आहे. संपूर्ण सरकारच अधिवेशन काळात नागपुरात असल्याने व्हीव्हीआयपी बंदोबस्त आणि नेत्यांच्या सुरक्षेचा मोठा ताण पोलिसांवर येतो. आता यातून या सर्व संबंधित यंत्रणेची सुटका झाली आहे.
आमदार ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये न घेण्याचा निर्णय घेतल्याबद्दल काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत घ्यावे व त्यावर होणारा पन्नास कोटींचा खर्च करोना प्रतिबंध उपाययोजनांवर करावा, अशी मागणी ठाकरे यांनी सर्व प्रथम केली होती, हे येथे उल्लेखनीय.
देखभाल दुरुस्तीची कामे सुरूच
अधिवेशन मुंबईत घेण्याचा निर्णय झाला असला तरी यानिमित्ताने विधिमंडळ इमारत,आमदार निवास, रविभवनात सुरू झालेली देखभाल दुरुस्तीची कामे पूर्ण केली जाणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले. आज दिवसभर ही कामे सुरूच होती.
अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात घ्या – राऊत
करोनामुळे नागपूरमध्ये होणारे हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्यात येणार असेल तर अर्थसंकल्पीय(बजेट) अधिवेशन नागपुरात घ्यावे, अशी मागणी ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केली आहे.करोनाचे संकट असल्यामुळे अधिवेशन मुंबईतच घेण्याच्या सरकारच्या निर्णयाचे आपण स्वागत करतो, मात्र विदर्भातील प्रश्नांना सोडवण्यासाठी आणि विदर्भातील विविध मुद्यांवर चर्चा करण्यासाठी नागपूर येथे अधिवेशन होणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात घ्यावे, असे राऊत यांनी त्यांच्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 11, 2020 12:40 am