राज्यातील राष्ट्रपती राजवट मागे घेण्याच्या प्रक्रियेला विलंब झाल्यास डिसेंबर महिन्यात नागपुरात होणारे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन लांबणीवर पडण्याची शक्यता विधिमंडळ सचिवालयाने व्यक्त केली आहे.

१३ व्या विधानसभेचा कार्यकाळ ९ नोव्हेंबर २०१९ ला संपुष्टात आला. त्यापूर्वी राज्यात लोकांनी निर्वाचित केलेले सरकार सत्तारुढ होणे अपेक्षित होते. मात्र विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाकडे सत्तास्थापनेसाठी पुरेसे संख्याबळ नसल्याने राज्यपालांच्या शिफारसीवरून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. मात्र यानंतरही विविध राजकीय पक्षांना पुरेसे संख्याबळ जमवून सत्तास्थापनेची संधी आहे. त्यादृष्टीने सेना-काँग्रेस व राष्ट्रवादीचे तसेच भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रक्रियेला महिन्या अखेपर्यंत यश आल्यास नागपुरातील विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे, मात्र सत्तास्थापनेला विलंब झाल्यास राष्ट्रपती राजवट कायम राहून अधिवेशन लांबणीवर पडू शकते, असे विधिमंडळ सचिवालयाचे उपसचिव सिद्धदर्शन साठे यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले.

राज्यात सध्या राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. त्यामुळे नागपूरचे हिवाळी अधिवेशन केव्हा होईल हे सध्या सांगता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. विधिमंडळाची दरवर्षी तीन अधिवेशने होतात. त्यापैकी पावसाळी आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत तर हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये होते. दोन अधिवेशनात सहा महिन्यांपेक्षा अधिक काळाचे अंतर नको असा नियम आहे. नागपूर करारानुसार विधिमंडळाचे एक अधिवेशन नागपूरमध्ये घेणे बंधनकारक आहे. २०१८ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी ऐवजी पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये घेतले होते. मात्र यावेळी हिवाळी अधिवेशन नागपूरमध्येच होणार असे चित्र होते. त्यानुसार विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यावर प्रशासनाने नेहमीप्रमाणे अधिवेशनाच्या प्राथमिक तयारीला सुरुवात केली होती. मात्र अधिवेशनाबाबत अधिकृतरित्या प्रशासनाला अद्याप काहीही कळवण्यात आले नाही. आता राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने अधिवेशन होणार किंवा नाही, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे.

  • नागपूर करारानुसार एक अधिवेशन नागपूरमध्ये घेणे बंधनकारक
  • विसर्जित १३ व्या विधानसभेचे गठन २१ ऑक्टोबर २०१४ रोजी करण्यात आले होते.
  •  ९ नोव्हेंबरला १३ व्या विधानसभेचा कार्यकाळ संपला.
  • २००८ मध्ये मुंबईत झालेल्या अतिरेकी हल्ल्यामुळे नागपूर अधिवेशनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती.

‘‘राज्यात सध्या राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. त्यामुळे नागपूरचे हिवाळी अधिवेशन केव्हा होईल, हे सध्या सांगता येणार नाही. – एस. साठे, उपसचिव, विधिमंडळ सचिवालय.