भाजप आमदारांची पोलीस आयुक्तांकडे मागणी

नागपूर : अयोध्येत राम मंदिर भूमिपूजनाचा कार्यक्रम सुरू असताना नागपूर शहरात विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांना पोलिसांनी नोटीस दिली आहे. ही नोटीस मागे घेण्यात यावी, अशी मागणी भाजपने पोलीस आयुक्तांना भेटून केली.

माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात भाजप आमदारांच्या शिष्टमंडळाने सोमवारी पोलीस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय यांची भेट घेतली. यावेळी दिलेल्या निवेदनात त्यांनी पोलिसांनी ५ ऑगस्टच्या कार्यक्रमावर हरकत घेतल्याबद्दल टीका केली. महाराष्ट्रात राम मंदिर भूमिपूजनाशी संबंधित कार्यक्रमांना परवानगी दिली जाणार नसेल तर कोणत्या कार्यक्रमाला दिली जाईल, असा सवालही त्यांनी केला.

५ ऑगस्टला शहरात लोकांनी उत्स्फूर्तपणे कार्यक्रमात भाग घेतला. त्यांनी करोना काळातील नियमांची  खबरदारी घेतली होती. परंतु पोलीस मात्र रामधून लावू नये, फटाखे वाजवू नये, श्रीरामाचे फलक चिपकू नये, अशा सूचना देत होते. राम नाम पठणाची परवानगी दिली जात नव्हती. शहरात वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित कार्यक्रमानंतर १४९ कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीस बजावली.

काही कर्त्यांना तीन -तीन ठाण्यातून नोटीस पाठवण्यात आली. अशाप्रकारे पोलीस प्रशासन कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करण्याचे काम करीत आहे.

केवळ हिंदू सणांना ध्वनिक्षेपाची (साऊंड) परवानगी घ्यावी लागते, हे प्रशासनाचे पक्षपाती धोरण आहे, असेही निवेदनात म्हटले आहे. यावेळी आमदार कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, गिरीश व्यास, प्रवीण दटके उपस्थित होते.

आम्ही सर्व धर्माचा आदर करतो. परंतु पोलीस प्रशासन केवळ हिंदू धर्माच्या कार्यक्रमांना अडथळा निर्माण करते. त्यांची काय अडचण आहे, हेच आम्हाला कळत नाही.

– प्रवीण दटके,  शहराध्यक्ष, भाजप.