महाधिवक्ता अणे यांच्या वक्तव्याने खळबळ; शिवसेना आक्रमक

स्वतंत्र राज्य झाल्याशिवाय विदर्भाचा विकास अशक्य असल्याचे प्रतिपादन राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी रविवारी ‘लोकसत्ता’शी बोलताना केले. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच स्वतंत्र विदर्भाची मागणी महाधिवक्ता पदावरील व्यक्तीने केल्याने खळबळ उडाली असून, शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि परिवहनमंत्री दिवाकर रावते रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन राज्याच्या महाधिवक्त्यांची नेमकी भूमिका काय, याचे स्पष्टीकरण घ्यावे, अशी मागणी केली. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आतापर्यंत अनेकदा स्वतंत्र विदर्भाची भूमिका मांडली आहे. त्यामुळे सत्तेवर असताना ते कोणती भूमिका घेतात, याबाबत उत्सुकता आहे.

केंद्र सरकारने स्वतंत्र विदर्भाच्या मागणीवर सार्वमत घ्यावे, अशी मागणीही अणे यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. ज्येष्ठ विधिज्ञ अणे हे गेली अनेक वष्रे स्वतंत्र विदर्भ आंदोलनात सहभागी आहेत. फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते विदर्भातील असले आणि विदर्भाला झुकते माप देत असल्याचे बोलले जात असले, तरी वस्तुस्थिती तशी नाही. ते राज्यातील सर्व विभागांना समान न्याय देत आहेत,’ असे अणे यांनी सांगितले. विदर्भाचा विकास करायचा असेल, तर स्वतंत्र राज्याखेरीज पर्याय नाही. सरकारचा निधी सर्व विभागांमध्ये समन्यायी पद्धतीने द्यावा लागतो, असेही ते पुढे म्हणाले.

शिवसेनेचा स्वतंत्र विदर्भाला कायम विरोध असून, अणे यांची भूमिका आमच्यासमोर जाणून घ्यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे रावते यांनी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस हे अखंड महाराष्ट्राचे असून महाधिवक्त्यांनीही ते भान ठेवले पाहिजे, असे खासदार संजय राऊत यांनी सांगितले.

अणे यांचे भाषण रद्द
सोमवारी उभय सभागृहांतील सदस्यांपुढे अणे यांचे विशेषाधिकार आणि हक्कभंग या विषयावर व्याख्यान होणार होते. मात्र ते रद्द करण्यात आल्याची माहिती विधिमंडळ सचिवांनी रात्री उशिरा दिली.

मुख्यमंत्र्यांचे सोयीस्कर मौन
महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी केलेल्या वक्तव्याबाबत मला काही माहीत नाही, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना बगल दिली. मात्र ‘मी माझे वैयक्तिक मत व्यक्त केले आहे. महाराष्ट्राचा महाधिवक्ता म्हणून राज्याच्या हिताची बाजू मांडतच राहीन,’ असे वक्तव्य अणे यांनी केल्याचे मुख्यमंत्र्यांनी निदर्शनास आणले.

महाराष्ट्राचे नुकसान नाही -अणे
महाधिवक्ता पदावर असताना हे मत व्यक्त करणे उचित आहे का, या प्रश्नावर अणे म्हणाले, की ‘मी गेली अनेक वष्रे ही भूमिका मांडत असून महाधिवक्ता होण्याआधीपासून म्हणजे वर्षभर पुस्तक लिहीत होतो. स्वतंत्र विदर्भाच्या भूमिकेमुळे महाराष्ट्राचे कोणतेही नुकसान नाही. मी माझे मत मांडले आहे.’