प्रकरणाच्या मुळाशी जाण्याची गरज

नागपूर : शहर बससेवेत अनेक प्रवाशांकडून पैसे घेऊनही त्यांना तिकीट उपलब्ध करून देण्यात येत नाही. यातून चालक, वाहक व काही गुंडांनी मिळून एक रॅकेट तयार केले. यातून दर महिन्याला महापालिकेला जवळपास दीड कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान होत आहे. या घोटाळ्यात महापालिकेतील काही कर्मचारी व अधिकारीही अडकू शकतात, अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे पोलिसांसमोर घोटाळ्याच्या मुळाशी जाण्याचे आव्हान आहे.

शहर बस चालवण्याचे कंत्राट डिम्प्ट्स कंपनीला देण्यात आला आहे. या कंपनीकडून चालक व वाहक नेमण्यात आले आहेत. या वाहक व चालकांकडून गैरप्रकार होऊ नये म्हणून तपासणीस नेमण्यात आले आहेत. गेल्या शुक्रवारी भारत चव्हाण, नीलय प्रजापती आणि राहुल येवले हे तपासणीस शुक्रवारी  दुपारी आपल्या एमएच-३०, एएफ-१३५४ क्रमांकाच्या कारने कॉटन मार्केट परिसरातील परिवहन भवनातून निघाले व इंदोरा चौकात पोहोचले. यावेळी त्यांच्यामागे एक दुचाकीस्वार होता. हा दुचाकीस्वार त्या कारच्या मागे वैशालीनगर आणि कामठीपर्यंत पोहाचला. त्याने तपासणीसचा रस्ता अडवून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी चौकशी करण्यात आली असून दुचाकीस्वार हा शहर बस सेवेतील प्रवाशांना तिकीट न देता पैसा घेण्याच्या रॅकेटचा एक सदस्य असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी चार जणांना पोलिसांनी अटक केली. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार यात महापालिकेचे कर्मचारी व अधिकारी अडकण्याची शक्यता आहे. त्याकरिता पोलिसांनी प्रकरणाच्या मुळाशी जाणे आवश्यक असून महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनीही यात लक्ष घालण्याची गरज आहे.

 

आयुक्तांमुळे गुन्हा दाखल

हा गैरव्यवहार अनेक वर्षांपासून सुरू होता. पण, तपासणीसांनी अनेकदा प्रशासनाला ही बाब लक्षात आणून दिली होती. पण, महापालिकेतील अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करीत होते. पण, तुकाराम मुंढे यांनी प्रकरण गांभीर्याने घेऊन पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्याशी संपर्क साधून गुन्हा दाखल झाला. शहर बसकरिता महापालिकेला दर महिन्याला ६ कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागते. या रॅकेटद्वारा महिन्याला दीड ते दोन कोटी रुपये चोरी होतात. तो पैसा महापालिकेला मिळाला तर नुकसान कमी होऊ शकते.

असा झाला गैरव्यवहार

शहर बसमधून दर दिवसाला महापालिकेला ३० लाख रुपयांचा निधी मिळणे अपेक्षित आहे. पण, दररोजचा निधी २२ ते २५ लाख रुपयांच्या घरात जमा होतो. यामुळे डिम्प्ट्स कंपनीच्या संचालकांना संशय आला. यापूर्वी त्यांनी एका कर्मचाऱ्याला कामावरून कमी केले. त्या कर्मचाऱ्याने चालक व वाहकांचा एक व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप तयार करून त्यांना अधिक कमाईचे प्रलोभन दिले. त्यांना प्रवाशांकडून पैसे स्वीकारणे व तिकीट न देण्यास सांगितले. रस्त्यामध्ये कुणी तपासणीस बस तपासत असेल तर त्यापासून सुरक्षेची हमी घेतली. सर्व तपासणीसाच्या मागे आपले काही दुचाकीस्वार साथीदार ठेवले होते. त्यांना केवळ चेकरचा पाठलाग करण्याचे काम होते.