वोक्हार्ट रुग्णालयात नातेवाईकांचा गोंधळ
शहरातील वोक्हार्ट रुग्णालयात उपचारादरम्यान रुग्णाचा मृत्यू झाला. शुल्क भरण्याकरिता नातेवाईकांकडे पैसे नसल्याने डॉक्टरांनी एक दिवस मृतदेह रोखून धरला. मृताच्या संतप्त नातेवाईकांनी यावरून रविवारी रुग्णालयात गोंधळ घातला. डॉक्टरांनी उपचारात हयगय केल्याचा आरोप नातेवाईकांनी केल्याने रुग्णालय प्रशासन हादरले. शेवटी प्रशासनाने नातेवाईकांसोबत मध्यस्थी करीत मृतदेह त्यांना सोपवल्यावर तणाव निवळला.
दयानंद मेटे (वय ३५, रा. अदिलाबाद, तेलांगणा) असे मृताचे नाव आहे. नातेवाईक शंकरराव वानखेडे म्हणाले, दयानंदच्या घशात गेल्या काही दिवसांपासून त्रास होत होता. त्याला १०जून रोजी यवतमाळच्या एका खासगी रुग्णालयात सकाळी दाखल केले. संध्याकाळी त्याला तेथून नागपूरच्या वोक्हार्ट रुग्णालयात हलविले. ११ जून रोजी उपचार सुरू केले. संध्याकाळी अचानक त्याची प्रकृती खालवली. डॉक्टरांनी त्वरित त्याला जीवनरक्षण प्रणालीवर टाकले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
डॉक्टरांच्या हलगर्जीपणाने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घातला. उपचारादरम्यान रुग्णालय प्रशासनाच्या सूचनेवरून नातेवाईकांनी शुल्क म्हणून १ लाख २५ हजार रुपये भरले होते. त्यातच रुग्णाचा मृत्यू झाल्यावर रुग्णालय प्रशासनाने नातेवाईकांना शनिवारी आणखी १ लाख ११ हजार रुपयांची मागणी केली. नातेवाईकांकडे पैसे नसल्याने रुग्णालयाकडून मृतदेह एक दिवस रोखून धरण्यात आला.
रविवारी मृतदेह मिळत नसल्याचे बघत संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घातला. शेवटी प्रशासनाने मध्यस्थी करीत मृताचे शुल्क माफ करण्यासह त्याला घरी जाण्याकरिता रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. दुपारी शंकरराव वानखेडे, प्रभू तायवाडे, उषा अडागडे, प्रभाकर शिंदे मृतदेह घेऊन त्यांच्या गावाकडे रवाना झाले.

‘मृतदेह रोखला नाही’
उपचार घेणाऱ्या दयानंद मेटे यांना हृदयासह श्वसनाशी संबंधित त्रास होता. त्यावर उपचार सुरू असतांना अचानक त्यांची प्रकृती खालावली. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. रुग्णाची माहिती वेळोवेळी नातेवाईकांना दिली जात होती. उपचार शुल्काची माहिती नातेवाईकांना दिली जात असल्याने त्यांनी त्यातील बरीच रक्कम भरली. मृत्यूनंतर भरायचे शुल्क नातेवाईकांकडे नसल्याने प्रशासनाकडून त्यांना मदत करण्यात आली. मृतदेह रुग्णालयात रोखून धरण्यात आला नाही.
– डॉ. तुषार गावड, वोक्हार्ट रुग्णालय, नागपूर</strong>