शहरातील वोक्हार्ट रुग्णालयाकडून करोनाबाधित रुग्णांकडून जास्तीचे पैसे घेऊन होत असलेली लूट बघता महापालिकेने नोटीस दिल्यानंतर रुग्णालयाने रुग्णांचे साडेनऊ लाख रुपये परत केले. यापूर्वी सेव्हन स्टार रुग्णालयाला नोटीस देण्यात आल्यानंतर त्यांनी रुग्णाचे जास्त घतलेले पैसे परत केले होते. महापालिकेच्या या कारवाईमुळे आता शहरातील जादा शुल्क घेऊन नागरिकांची लूट करणाऱ्या खासगी रुग्णालयाचे धाबे दणाणाले आहे. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानंतर ही कारवाई सुरू करण्यात आली असून शहरातील आणखी चार रुग्णालयांना नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय , मेयो रुग्णालयासह अन्य शासकीय रुग्णालयात जागा नसल्यामुळे अनेक करोना रुग्ण खासगी रुग्णालयात जात आहेत. मात्र या रुग्णालयात रुग्णांकडून जास्तीचे पैसे घेतले असल्याच्या तक्रारी आहेत. वोक्हार्ट रुग्णालयात दाखल झालेल्या अनेक रुग्णांकडून पाच ते सहा लाख रुपये तसेच सेव्हन स्टार हॉस्पिटलमध्येही बाधित रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा पैसे घेतले जात असल्याचे पुढे आले होते.

राज्य सरकारने करोना रुग्णांसाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्काबाबत नियमावली जारी केली आहे. ही नियमावली खासगी रुग्णालयात पाळण्यात येत आहे की नाही, हे तपासण्यासाठी महापालिकेकडून अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांच्या नेतृत्वात एक पथक तयार केले आहे. महापालिकेच्या तपासणीतही ही बाब पुढे आली. यानंतर महापालिकेने तीन दिवसांपूर्वी नोटीस बजावत स्पष्टीकरण मागितले होते. वोक्हार्ट व्यवस्थापनाकडून कुठलेही उत्तर सादर करण्यात न आल्यामुळे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी वोक्हार्ट रुग्णालयाला दणका देत रुग्णांकडून लाटलेले पैसे परत करण्याचे आदेश दिल्यानंतर रुग्णालयाने गुरुवारी संबंधित रुग्णांच्या नातेवाईकांना त्यांच्याकडून घेतलेले साडेनऊ लाख रुपये परत केले.

दरम्यान, जगनाडे चौकातील सेव्हन स्टार हॉस्पिटलला देखील रुग्णांकडून घेतलेले अतिरिक्त शुल्क परत करण्याचे आदेश दिले आहे. पथकाकडून काही दिवसांपूर्वी सेव्हन स्टार हॉस्पिटलची आकस्मिक पाहणी करून अहवाल तपासण्यात आला. यातून सेव्हन स्टार हॉस्पिटलकडून शासन व महापालिकेच्या नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे समोर आले होते. याप्रकरणी आयुक्तांनी रुग्णालय व्यवस्थापनाला नोटीस बजावली होती.  त्यात आयुक्तांनी रुग्णालय व्यवस्थापनाने ज्या ज्या करोना रुग्णांकडून शुल्काच्या नावाखाली अतिरिक्त पैसे घेतले आहे ते त्या रुग्णांना परत करण्यात यावे, असे आदेश दिले आहे. मात्र रुग्णालय व्यवस्थापनाकडून महापालिकेला कुठलेही उत्तर दिले नसल्याचे सूत्रांनी सांगितले.