विश्वासात न घेता सभा गुंडाळली-प्रफुल्ल गुडधे; mआरोप राजकीय -संदीप जोशी

महापालिकेच्या तहकूब सभेवरून विरोधक आणि सत्तापक्ष यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी उडाल्या. विरोधकांना विश्वासात न घेता भाजपने सभा गुंडाळली, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांनी केला, तर सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनी नगरसेवकाच्या निधनावर राजकारण करण्याची भाजपची संस्कृती नाही ती काँग्रेसची आहे, असा पलटवार केला.

दिवंगत कुंभारेच्याप्रती आमच्या काही भावना आहे, त्या मांडण्याचा आम्हाला अधिकार आहे. मात्र, त्यासाठी संधी देण्यात आली नाही. सत्तापक्षाची ही दडपशाही आहे. शहरातील पाणी टंचाईसह अनेक महत्त्वाच्या विषयावर चर्चा होणे आवश्यक असून त्यासाठी पुढची सभा केव्हा होणार हे महापौरांनी तात्काळ जाहीर करणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी तसे केले नाही. पाणी समस्येवर चर्चा व्हावी, यासाठी सकाळी महापौरांना स्थगन प्रस्ताव दिला होता. मात्र त्याचा विचार केला नाही. भाजपचा हा पळपुटेपणा आहे. कुंभारे यांचे निधन झाले त्या दिवशी महापालिकेला सुट्टी देणे आवश्यक होते, परंतु तोही निर्णय घेतला नाही असे गुडधे म्हणाले.

काँग्रेस, बसपा, राष्ट्रवादी काँग्रेससह सर्व गटनेत्यांशी चर्चा करून आणि त्यांना विश्वासात घेत शोकप्रस्ताव सभागृहात आणला होता, गुडधे यांचे आरोप राजकीय आहे. सभागृहातील सदस्यांचे निधन झाल्यावर भाषण करण्याची महापालिकेची परंपरा नाही आणि ते नियमात नाही. पुढची सभा केव्हा घेणार, या संदर्भात निर्णय घेतला जाईल. ज्या दिवशी कुंभारे यांचे निधन झाले त्याच दिवशी काँग्रेसने महापालिकेत मोर्चा काढून महापौरांचा निषेध केला. त्यावेळी महापौर नंदा जिचकार कुंभारे यांच्या निवासस्थानी होत्या. संवेदनशीलतेची भाषा काँग्रेसला शोभत नाही. नागनदीवर उद्या सामाजिक संस्थांची बैठक असून २२ ते २६ या कालावधीत महापौर नंदा जिचकार महापौर परिषदेला ग्वाल्हेरला जाणार आहेत. त्यामुळे २८ एप्रिलनंतर सभा घेण्यात येईल, पाण्याच्या समस्यांबाबत झोन पातळीवर बैठक सुरू आहेत, असे जोशी म्हणाले.

नीलेश कुंभारेंना श्रद्धांजली

भाजपचे नगरसेवक दिवंगत नीलेश कुंभारे यांना श्रद्धांजली अर्पण करून महापालिकेची सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात आली. सत्तापक्षाकडून शोकप्रस्ताव मांडण्यात आला. त्यानंतर सभा तहकूब करण्यात आली.