पांढरकवडा परिसरातील वाघिणीला जेरबंद करण्यासाठी आणलेल्या हत्तीनेच मंगळवारी रात्री यवतमाळ जिल्ह्यात धुडगूस घातला. हत्तीच्या हल्ल्यात एक महिला ठार झाली असून एक जण जखमी झाला आहे.

पांढरकवडा परिसरातील वाघिणीला बेशुद्ध करून जेरबंद करण्यासाठी वनखात्याचे पथक मोहीम राबवत आहे. या मोहिमेकरिता मध्य प्रदेशातील चार हत्ती आणि महाराष्ट्रातील एका हत्तीची मदत घेतली जात आहे. या हत्तींना बेसकॅम्पमध्ये ठेवण्यात आले आहे. यातील एक हत्ती हा ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पातील आहे. गजराज असे या हत्तीचे नाव आहे. मंगळवारी रात्री साखळी निघाल्याने गजराज हत्ती कॅम्पमधून बाहेर पडला. बेफाम झालेला हत्ती कॅम्पपासून १५ किलोमीटरवर असलेल्या चहांद गावात पोहोचला. या गावातील घरांची हत्तीने नासधूस केली. यात एका महिलेचा मृत्यू झाला. तर आणखी एका गावातील एक व्यक्ती जखमी झाला.

वाघिणीला जेरबंद करण्यासाठी हत्तींची मदत का घेतली जाते?
तज्ज्ञांच्या मते हत्तीला वाघाचा विशिष्ट वास येतो. त्या दिशेने मग हत्ती धावतो. मध्यप्रदेशातील कान्हा व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांना व्याघ्रदर्शन करायचे असेल तर हत्तीची मदत घेतली जाते. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात नोव्हेंबर २०१६ मध्ये ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रात धुमाकूळ घालणाऱ्या वाघिणीला जेरबंद करण्यासाठी प्रथमच हत्तींची मदत घेतली जात होती.