06 December 2019

News Flash

रस्त्यावर अडवून तरुणीचा विनयभंग

सप्टेंबर २०१८ मध्ये त्यांच्यात दुरावा निर्माण झाला. तेव्हापासून तो तिच्यावर रागावला होता.

प्रतिकात्मक छायाचित्र

नागपूर : भांगे लॉनचे मालक पुरुषोत्तम भांगे यांच्या मुलाने तरुणीला आडवे होऊन रस्त्यावर तिचा विनयभंग केला. ही घटना बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खामला चौक परिसरात घडली. विनय पुरुषोत्तम भांगे (२५) रा. महानंदा भवन, त्रिमूर्तीनगर असे आरोपीचे नाव आहे.  पीडित २५ वर्षीय तरुणी ही एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयात पॅरामेडिकलच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाला शिकत आहे. आरोपी व तिचे पूर्वी प्रेमसंबंध होते. मात्र, सप्टेंबर २०१८ मध्ये त्यांच्यात दुरावा निर्माण झाला. तेव्हापासून तो तिच्यावर रागावला होता. महाविद्यालयात जात असताना तिचा पाठलाग करायचा. ५ नोव्हेंबरला पीडित मुलगी कारने जात असताना आरोपीने तिचा पाठलाग केला व खामला चौकात एका खासगी रुग्णालयाच्या बाजूला तिच्या कारला आपली कार आडवी केली. त्यानंतर तिच्या कारचा दरवाजा उघडून तिचा मोबाईल हिसकावला. कारमध्ये बसून तिच्याशी असभ्य वर्तन केले. तिने मोबाईल परत मागितला असता त्याने तिला शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तरुणी घरी गेली व आईवडिलांना सर्व हकिगत सांगितली. आईवडिलांनी पोलीस तक्रार देण्याचे मार्गदर्शन केल्यानंतर तिने पोलीस ठाणे गाठले व तक्रार दिली. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेख यांनी विनयभंग, जीवे मारण्याची धमकी देणे आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी अद्यापही विनयला अटक केलेली नाही.

First Published on November 9, 2018 2:19 am

Web Title: woman molestation on the road in nagpur
Just Now!
X